महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,242

प्राचीन जलव्यवस्थापन – सप्तेश्वर !!!

By Discover Maharashtra Views: 2772 4 Min Read

प्राचीन जलव्यवस्थापन – सप्तेश्वर !!!

कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काहीतरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं, आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. सप्तेश्वरबद्दल पण असंच झालं. कसबा संगमेश्वर परिसरात अनेकदा फिरणं झालेलं पण त्याच्याच समोरच्या डोंगरावर हे सुंदर ठिकाण दडलेलं माहिती नव्हतं.सप्तेश्वर.

मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्रीनदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगली डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढ्यावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे.

जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्या समोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे. आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहात विभागून ते परत मोठ्या कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेल मधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’ सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशु कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागातून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे.. ३० फुट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते. आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढ्याला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.

सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग, आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा. इथून खरोखरच पाय निघत नाही.

Ashutosh Bapat

Leave a Comment