खानदेशातील सरंजामी समाजव्यवस्था –
अठराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकिय स्थितीचे प्रतिबिंब खानदेशातही उमटलेले दिसते. अर्धेअधिक शतक मुघलांच्या कमकुवत लष्करी शक्तीचे द्योतक आहे त्यामुळे स्थानिक राजेरजवाडे वर डोके काढायला लागले होते.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खानदेशातील जहागिरदार व सरदार वर्ग यांचा प्रभाव समाजावर वाढला. चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा सरदारांना शाहू महाराजांच्या कडून हक्क मिळाला. मुलकी तसेच लष्करी जबाबदारी सरदारांकडे आली. त्यामुळे विविध भागावर वाढलेला प्रभाव ही खानदेशातील मराठी प्रशासनाची महत्वाची बाब झाली.
सरंजामाचा गाव, परगणा, महाल याबाबत हाव वाढल्याने तसेच पेशव्यांच्या खानदेशातील प्रशासनात पेशवे सरकारची नोकरशाही तर सरदार किंवा सरंजामदारांची नोकरशाही अशी दुहेरी व्यवस्था तयार झाली. जी दोन्ही नोकरशाही होती. सरंजामाच्या मुलकी तसेच लष्करी प्रभावाचा परिणाम न्यायव्यवस्थेवर झाला. वतनदार वर्गावरही त्यांचे प्रभुत्व वाढले आणि या साखळीतील शेवटचा एकच घटक जो उत्पादन करणारा म्हणजे जनता, रयतेवर प्रचंड ताण आला.
सरंजामदार यांची प्रतिष्ठा वाढल्याने पेशवे, सरंजामदार आणि इतर घटकांना कर्जपुरवठा करणाऱ्या काही सावकार लोकांना पेशव्यांनी सरंजामी मुलूख, महाल, सरंजामे दिल्यामुळे सावकारांचे सरंजामदार बनले. खानदेशातील सावकारांचे वाडे आणि त्यातील लाकुड काम हे ज्वलंत पुरावे आहेत. अशी काही गावेच तयार झाली जी सावकारांच्या पेढ्यांसाठी प्रसिध्द आहे. सर्वात आधी सावदा फैजपूर, नशिराबाद, चोपडा, रावेर, यावल, नंदुरबार, सुलतानपूर, शिरपूर ही आहेत.
परकिय प्रवाशांच्या वर्णनातून कळते की सरंजामदार एक प्रकारे हुकुमशहा बनले. त्यामुळे राज्यकारभार तसेच न्यायदानात निःपक्षपाती पणाची अपेक्षा करणे अवघड होय. दोन वर्ग तयार झाले एक पेशवे, त्यांचे सरदार, सरंजामदार, धर्मपंडीत, व्यापारी वर्ग आणि सावकार तर दुसरा गरीब शेतकरी, शेतमजूर वर्ग, कारागिर, क्षूद्र, अतिक्षूद्र, गुलाम जो हालहलाखीचे जिवन जगत होता. हिंदू समाजातील जातीव्यवस्था जी ताठर होती. तिने सरंजामशाही वाढवण्यात तसेच त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यात हातभारच लावला.
खानदेशातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे समाजाची आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णता होती हे मागे दिलेल्या सरंजामाच्या आकडेवारी वरून लक्षात येते. उत्पादीत केलेल्या वस्तू व विविध वर्गांचे आर्थिक कामकाज हे मात्र बिना सरकारी हस्तक्षेपावाचून चाले. एका प्रकारे खेड्यातील जिवन तसेच सुरू होते जसे पुर्वी चाले. अठरापगड जातींच्या समन्वयाने होय. पण वर्णव्यवस्था मात्र तशीच होती जशी होती. अर्थात क्षत्रिय आणि ब्राम्हणवर्गाला बरीच प्रतिष्ठा होती आणि विविध पदे सुध्दा होय.
सरंजामदार वर्ग –
समाजातील प्रतिष्ठित वर्गांचे पुरावे हे त्यांनी बांधलेल्या भव्य वाडे आणि गढ्यांमधून मिळते. त्यात विंचूरकर, निकम, भोसले, भोईटे, कदमबांडे, राजेबहादुर, रामचंद्र पवार, साक्रिकर हे होय. कोपर्ली येथील गढी तसेच निवाइलाहनेर, कन्हा, पिंपळगाव, पिंपळनेर,राहुड, मळगाव, नेर, गाळणा, चोपडा या ठिकाणी गढ्या बांधलेल्या होत्या. विठ्ठल शिवदेव सरदारांच्या सरंजामाचे उत्पन्न हे सहा लक्ष तर तुकोजी होळकर यांच्या सरंजामाचे उत्पन्न दहा लाखाचे होते. गढ्या बांधण्यासाठी लागणारा खर्च सरकारच्या परवानगीने रयतेवर करपट्टीने वसूल केला जात असे.
सरंजामाचा उपसर्ग जनतेला सहन करावा लागे. गावात दहशत बसवत. मयत व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्यात येई. सरंजामदार यांची फौज स्थलांतर करतांना शेतची शेत नष्ट करीत उभ्या पिकात घुसून जनावरांना चारा म्हणून तोडून टाकत. मुक्काम शेकडो सैनिकांचा असल्याने शेतातील पिके भुईसपाट करीत.
सरंजामदार यांनी केलेली लूट –
एका सरंजामदाराने दुसऱ्या सरंजामदाराचा प्रदेश लुटालूट जाळपोळ करावी हा नेहमीचा खेळ होता. त्यामुळे शेतकरी शेती सोडून लष्करात भरती होत. इ.स. १७५७ मध्ये जळगाव जामोदच्या लढाईनंतर निजाम व मोगल सरदारांनी वऱ्हाडातील गावात बरीच मोठी लुट केली होती.सरदारांच्या फौजेच्या जाचाला कंटाळून दोन हजार बायकांनी जीव दिले होते. १७५१ मध्ये रघुजी भोसले यांची फौज गंगथडीच्या प्रांतातून गेली तेव्हा अशीच खराबी केली होती. घासादाणा करतांना मारझोड करून दहशत बसवत.
सरंजामदार सरंजाम महालांकडून रयतेकडून जाचक करांची वसुली करत असत. एरंडोल महालातील महसुलीव्यतिरिक्त दमाजी गायकवाड याने या परगण्यातून घासेदाणीचा ऐवज वसूल केला. खंडणीची रक्कम ही या मुलुखातून वसुली केली. दामाजी गायकवाड यांनी सोनगिरी मुलुखात येऊन खंडण्यांची वसूली केली. तुकोजी होळकरांकडील परगणे व सुलतानपूर व नंदुरबार महाल सरंजाम होते, त्या महखलातून घासदाणा, रयतपट्टी, शिबंदी खर्चाची पट्टी इत्यादि कर वसूल केले जात असत.
कर्जपट्टी –
परगण्यातील रयतेवर जहागिरदार अथवा सरकारचे अधिकारी कर्जपट्टीची वसुली करत असत. शहरातील आयात मालावर आकारावयाचा हासील कर जाचक होता. माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत जळगाव शहरात बंगालमधील व वराडमधील रेशमी कापड आयात होई. त्यावरील हासील एका बैलांच्या ओझ्यावर सत्तावीस रूपये आकारण्यात येई. त्यामुळे जळगाव शहरातील रेशमी कापडाची आयातच थांबली व कापडाचा व्यापार बुडाला.
हे शिवराम नारायण यांनी नाना फडणवीस यास पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. पेशवे सरकार वरील कर्जाचा बोजा वाढला की तो कमी करण्यासाठी खानदेशातील जमिनदारांकडून कर्जपट्टी वसूल होई. सरंजामातील न्हाव्यासारख्या कारागिराला वर्षाला चाळीस रुपये कराची वसुली करण्यात येई.
तसेच सरंजामदार यास रयतेकडून सायेर, आईमा, खंडीपलीरोई इत्यादि वसूली करण्याची मुभा होती.
ही सगळी व्यवस्था बघून प्रचलित म्हण, ” मोगलाई दाटली का” ही बदलून “मराठेशाही दाटली का” अशी करावी की काय अशी शंका येते.
सरंजामदारांचे चैनी जिवन, उत्सव, नाटकशाळा, मेजवानी, कुटुंबातील व्यक्ती यांचे थाटामाटात विवाह, मौल्यवान भेटवस्तू यात जनतेसाठी केलेले एकही काम दिसत नाही हे दुर्दैव आहे.
सामान्य रयतेची गळपेची आणि कुचंबणा होई कारण सरंजामी मुलूखात दुहेरी अंमल चाले. सरंजामाचा फौजेची दुष्कृत्ये इ.स. १७६० च्या फेब्रुवारी महिन्यात मुगल सरदार बसालत जंग यांने दुसऱ्या सरंजामाच्या मुलुखात शिरून त्या गावात खराबी केली.जिरायत पिकांची नासाडी करीत त्यांची फौज किन्ही गावात शिरली, घरे मालमत्ता लुटली, गुरेढोरे बायका बरोबर नेल्या.
रयतेची कर्जदारी व सावकारांची वतनदारी हा अजून दुसरा मासला आहे. कर्ज न चुकवल्यास मालमत्ता शेती घरे जप्त करण्यात येई.
खानदेशातील सरंजामशाही चे प्रतिबिंब वतनदारीवर पडले असे म्हणण्याऐवजी ते अविभाज्य अंग मानावे लागेल. गाव, परगणा, कसबा, पेठ या ठिकाणी वतनदार होते पाटील, कुलकर्णी चौगुले यांचा समावेश गावातील वतनावर तर देशमुख देशपांडे, सरदेशमुख सरदेशपांडे हे परगण्यातील वतनावर होते.शेटे, महाजन असब्यात तर अलुतेदार बलुतेदार यांनाही वतनदार म्हणत. गावच्या पाटीलकीचे वतन महत्त्वाचे होते. या व्यतिरिक्त सरकानगो व सरमंडलोई ही वतने होती.त्यांना रहाण्यासाठी गढी असे. गढीची जागा सरकार देई. त्यांच्याकडे जमीन महसूल कामकाज व गावच्या संरक्षणाची जबाबदारी असे. ही पेशव्यांनी सुरू केली होती.
राऊळकीची वतने ही आधीच्या काळातील होती. काही सुरू राहिली तर काही सरंजामदार यांनी जप्त केली.सुलतानपूर, थाळनेर भागात ही सारंगखेडा वतन केसरीसिंग यांच्याकडे होता तर थाळनेर परगण्यातील मौजे वनावळ, कुरखळी, टेकखेड,मौजे होळ, मौजे नांथे, करवंद, या गावात राऊळकीची वतने होती. चाळीसगाव तालुक्यातील वतनांपैकी एक काझी वतनदार होते. इ.स. १७६६-६७ यावर्षी मिठे खान काझी होता. तसेच काही यावल, चोपडा, नंदुरबार व रावेरलाही होते.
संदर्भ –
पेशवा डायरीज खंड २,३,४,५,६,७,८,९
पेशवे दप्तर संपादक गो.स. सरदेसाई खंड १०,२२,२५,३९
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग १,२
ऐतिहासिक पत्रव्यवहार गो.स. सरदेसाई व काळे
चंद्रचूड दप्तर
पेशवे कालीन महाराष्ट्र, वा.कृ.भावे
ऐतिहासिक मराठी साधने संपादक ग.ह. खरे