महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,109

तळ्यातला गणपती, सारसबाग

By Discover Maharashtra Views: 1405 4 Min Read

तळ्यातला गणपती, सारसबाग –

नानासाहेब पेशवे हे पुण्याचे खरे शिल्पकार. पुण्याच्या भरभराटीसाठी जी अनेक कामे झाली,त्यांतील बहुतांश कामांच्या योजना नानासाहेब पेशव्यांनी आखलेल्या होत्या.त्यांचे द्रष्टेपण आजही जाणवत राहते.त्यांच्या कारकीर्दीत पुणे शहराचा वेगाने विकास झाला. या काळात शहरातील लोकवस्ती झपाट्याने वाढू लागल्यामुळे विहिरी व नदीतील पाणीपुरवठा अपुरा पडू लागला.शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता इ.स.१७५० मध्ये कात्रजचे धरण बांधण्यात आले. कात्रजच्या तलावातून दगड़ी व खापरी नळांद्वारे शहरात पाणी पुरविण्यात येऊ लागले. कात्रजच्या पाण्याला पर्याय असावा म्हणून नानासाहेबांनी पर्वतीच्या परिसरात,२५ एकर जागेत इ.स.१७५१-५२ मध्ये एका तलावाचे बांधकाम केले. या तलावाच्या मध्यभागी २५ चौरस फुटाचे बेट राखून त्यावर सुंदर बाग तयार केली. ब्रिटिश गॅझिटियरमध्ये कमळांनी फुललेल्या या तलावाचा व बेटाचा उल्लेख आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर इ.स.१७७४ मध्ये सवाई माधवरावांनी एक लहानसे गणेश मंदिर (तळ्यातला गणपती) बांधले. या जागी फक्त नौकेनेच जाता येई. तळ्यात कमळे फुललेली असत. त्यातून पेशवे नौकाविहार करत. सवाई माधवरावांनी येथील तलावात विहार करण्याकरिता सारसपक्षी आणून सोडले. या बेटावरील बागेस सारसबाग हे नाव देण्यात आले.

सवाई माधवरावांनंतर दुसऱ्या बाजीरावाच्या काळातही या तलावाची व बेटाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. पेशवाईनंतर इंग्रजांच्या काळात या तलावाच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या तलावात गाळ साठून डबकी तयार झाली. तसेच तलावातील पाणीही आटले. कालांतराने सारसबाग, पर्वतीचे तळे ही नावे पुणेकरांच्या स्मरणातून गेली व तळ्यातला गणपती हे नाव रूढ झाले. तलावातील डबकी व चिखलामुळे मंदिराकडे जाणे जिकिरीचे काम होते. इ.स.१९३६-३७ मध्ये न्यायाधीश रा.ब. कोंडो महादेव कुमठेकर यांनी देवळात जाण्याकरिता संगमरवरी पायऱ्या बांधून गणपती मंदिरासमोर पत्र्याचा सभामंडप बांधला. इ.स.१९६८-६९ मध्ये पुण्याचे तत्कालीन आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांनी तलावाच्या उरलेल्या जागेत सुंदर उद्यान करण्याची योजना आखली. पुणे महानगरपालिकेने हा प्रकल्प नियोजनपूर्वक राबवला. सुंदर उद्यान तयार करून रस्ते बांधण्यात आले. या बागेस सारसबाग हे मूळ नाव देण्यात आले. येथे उद्यान झाल्यानंतर मंदिरात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने मंदिराचा सभामंडप व मंदिराची पुनर्रचना करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पुढाकार घेऊन मंदिराची नूतन वास्तू व बागेभोवती भिंत बांधण्याचा ठराव मंजूर करून,या नियोजित मंदिराचा आराखडा वास्तुरचनाकार उ.म.आपटे यांच्याकडून करून घेतला.

मंदिराच्या नव्या वास्तूचा कोनशिला समारंभ पुण्याचे तत्कालीन महापौर वि.भा.पाटील यांच्या हस्ते ३ डिसेंबर १९६९ मध्ये करण्यात आला. या मंदिराचा आराखडा तयार करताना मराठा स्थापत्यशैलीचा विचार करण्यात आलेला आहे. मंदिराचा सभामंडप पूर्वाभिमुख असून ४०’ रुंद व ४८’ लांब आहे. या सभामंडपाच्या उत्तरेस व दक्षिणेस थोडे लहान मंडप आहेत. या मंडपाभोवती धनुष्याकृती कमानीदार महिरपी असून,पेशवाईतील दिवाणखान्यातील नक्षीकामानुसार येथील शिल्पांचे कोरीवकाम केलेले आहे. मुख्य सभामंडपातील कमी उंचीचे कोरीव कठडे व त्यावर असलेले लहान लहान पितळी कळस मराठा शैलीतील आहेत. या मंदिराचे शिखर मात्र महाराष्ट्रातील मंदिरांच्या शिखरासदृश नसून, उत्तर भारतातील हिंदू शैलीनुसार उभे,निमुळते व चौकोनी आहे.

माधवरावांनी स्थापन केलेली मूळ गणेशमूर्ती काही कारणास्तव इ.स.१८८२ मध्ये भंगली,तेव्हा मूळ मूर्तीप्रमाणे नवीन मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा श्री. रावबहादूर कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आली. याही मूर्तीची झीज झाल्यामुळे २८ मे १९९० मध्ये नवीन मूर्तीची स्थापना श्री. मनोहर य. जोशी व सौ. मंजिरी म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. या मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, साधारण २’ उंचीची, चतुर्भुज आणि पद्मासनात बसलेली आहे. गणपतीच्या उजव्या हातात परशू असून दुसरा हात मांडीवर ठेवला आहे. डाव्या हातात मोदक असून दुसऱ्या हाती कलश आहे. मूर्ती अत्यंत तेजःपुंज व रेखीव आहे.

सारसबागेच्या आवारात सुंदर उद्यान असून येथील हिरवळ, फुलझाडे, रोपवाटिका, कलात्मक दिवे, कारंजी यांमुळे बागेच्या सौंदर्यात भर पडली आहे. बागेभोवती असलेल्या उतारावर दाट झाडी आहे. या बागेच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात व पश्चिमेकडे पेशवे पार्कजवळ ऐतिहासिक बांधाच्या भिंतींचे अवशेष आहेत. मंदिराच्या आवारात सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, ध्यानमंदिर इत्यादी कक्ष आहेत. येथे गणेशमूर्तीचे प्रेक्षणीय संग्रहालय असून या संग्रहालयात लाकूड, दगड, हस्तिदंत, कागद, धातू, शिंपले यांपासून बनविलेल्या अनेक रूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आहेत.

संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन

पत्ता :
https://goo.gl/maps/WezWvRVpuR993C5GA

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment