महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,041

सरदार कदम ईंद्रोजी

By Discover Maharashtra Views: 4262 3 Min Read

सरदार कदम ईंद्रोजी

कदम घराण्यातील एका शाखेत कंठाजी कदमांच्या काळात सरदार कदम ईंद्रोजी नावाचा एक प्रख्यात मराठा सरदार होऊन गेले. हे सरदार सातारा जिल्ह्यातील साप गावचे राहणारे असून, आपल्या पराक्रमाच्या जोरावर फार योग्यतेस चढले होते. छत्रपती शाहूमहाराज दक्षिणेत येऊन त्यांनी सातारा येथील छत्रपतीच्या गादीवर आरोहण केले त्यावेळी इंद्रजीत कदम यांचे प्राबल्य महाराष्ट्रामध्ये इतके होते की त्याचे नाव केवळ कर्दन काळासारखे वाटत होते. त्यांच्या शौर्यप्रभावाप्रमाणे त्यांचे वैभव व थाटही फार मोठा होता.

त्यांच्याजवळ सातशे निवडक सैन्य होते व घोडेस्वारही बरेच होते. ते आपल्या शौर्याप्रमाणे ईतके गर्विष्ठ व प्रमत्त झाले होते की, त्यांना आपल्यापुढे सर्व जग तुच्छ दिसत असे. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या पागेतील खाशा घोड्यास रुप्याचे नाल लावून, असा हुकुम सोडला होता की, हे रुप्याचे नाल पागेतील लोकांनी न घेता शत्रूच्या हद्दीत पडू द्यावे व ते परक्या लोकांनी पाहून आपल्या वैभवाचे कौतुक करावे.

एके दिवशी छत्रपती शाहूमहाराजांच्या कानावर इंद्रोजी कदमाच्या गर्विष्ठपणाची हकीकत सादर झाली. तेव्हा शाहूमहाराजांनी मुद्दाम त्यास निमंत्रण करून सातार्यास बोलावले. ईंद्रोजी कदम मोठ्या थाटाने आपल्या सैन्यानिशी सातारा येथे आले व आदितवार पेठेतील माळावर तळ देऊन राहिले .त्यांनी छत्रपती शाहूमहाराजांना असा निरोप पाठवला की,” तुमचे पेशवे, मुख्य प्रधान तुम्हास भेटावयास आले म्हणजे लष्करच्या नौबती व नगारे बंद करतात, त्याप्रमाणे मी करणार नाही. मी माझ्या सर्व इतमामानिशी डंका,नौबती वाजवीत तुमच्या भेटीस येईन.” छत्रपती शाहूमहाराजांनी त्याप्रमाणे त्यास परवानगी दिली व त्यांची रंगमहाल राजवाड्यातील मुख्य दरबारात भेट घेण्याची योजना केली. इंद्रोजी कदम यास आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याची फार हौस असल्यामुळे तो आपल्या सर्व सैन्यास कडीतोडे घालून व आपण स्वतः नाना प्रकारचे रत्नालंकार परिधान करून छत्रपती शाहूमहाराजांच्या भेटीसाठी नगारे व नौबती वाजवीत राजवाड्यात आले.

छत्रपती शाहूमहाराजांना त्यांचा हा डामडौल पाहून फार तिरस्कार वाटला. परंतु त्यांनी तो व्यक्त न करता मुद्दाम त्याचे गर्वहरण करण्याच्या उद्देशाने आपले स्वतःचे जडजवाहीर अलंकार आपल्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर घातले आणि आपण अगदी साधा सफेद पोशाख घालून दरबारात आले. इकडे ईंद्रोजी कदम मोठ्या थाटाने व दिमाखाने आपल्या रत्नालंकाराचे प्रदर्शन करीत छत्रपती शााहूमहाराजांच्या भेटीस आले.त्याची अशी कल्पना होती, की छत्रपती शााहूमहाराजांच्या दरबारातील अष्टप्रधान व उमराव हे माझे बहुमूल्य जवाहीर पाहून दिपून जातील व खाली मान घालतील. परंतु दरबारात प्रवेश करताच सर्व सरदार लोक व खुद्द छत्रपती शााहूमहाराज यांचा साधेपणा व शुभ्र पोषाख पाहून ईंद्रोजी कदमांना फार आश्चर्य वाटले .

खंड्या कुत्र्याखेरीज दुसऱ्या कोणाच्याही अंगावर अलंकार नसलेले पाहून ते मनात फार ओशाळले व लज्जीत झाले.आणि शाहूमहाराज छत्रपती हे केवळ अवतारी पुरुष आहेत ,त्यांचा मी विनाकारण अपमान करण्याची पापबुद्धी मनात धरली.असा पश्चाताप पाहून त्याने छत्रपती शााहूमहाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांची क्षमा मागितली. छत्रपती शााहूमहाराजांनी क्षमा करून त्यांचा योग्य आदर सत्कार केला. इंद्रोजी कदम यांनी छत्रपती शााहूमहाराज यांना सोन्याच्या मोराचे सिंहासन करून त्यावर बसवले व आपल्या जवळचे जडजवाहीर त्यांना अर्पण केले. महाराजांनी त्यास व त्याच्या पदरच्या लोकांना मोठी मेजवानी व पोषाख बक्षीस दिले. तेव्हापासून इंद्रोजी कदम याचे नाव सातारच्या दरबारात फार प्रसिद्धीस आले.

Credit – Suvarna Naik Nimbalkar

Leave a Comment