महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,714

पराक्रमी सरदार करांडे

By Discover Maharashtra Views: 3993 3 Min Read

पराक्रमी सरदार करांडे…

मराठेशाहीच्या काळातील पराक्रमी सरदार घराण्यांमध्ये पराक्रमी सरदार करांडे या घराण्याचेहि नाव आदराने घ्यावे लागते. या घराण्याचा मूळ पुरुष म्हणून शिवाजी करांडे या सरदाराचा उल्लेख करावा लागतो. हा शिवाजी करांडे हिंगणीकर बापुजी भोसले यांचा तिसरा पुत्र राणोजी भोसले यांच्या दिमतीला असे. शिवाजी करांडे यांना दोन पुत्र होते सटवाजी व रघुजी. याच शिवाजी करांडे यांच्या पथकात नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले एक बारगीर म्हणून नोकरी करीत होते. पुढे काही कारणाने रघुजी भोसले यांच्या ताब्यात भोसलेंच्या सरांजामापैकी बराच मोठा सरंजाम देण्यात आला.
भोसले रघुजीप्रमाणे करांडे बंधुतील रघुजीही पराक्रमी निघाला. व तो नागपूरकर भोसल्यांचा पहिल्या दर्जाचा सेनापती व प्रशासक बनला. रघुजी करांडे हा मल्हारराव होळकरांप्रमाणे दूरदृष्टीने पाहून आपले राजकारण ठरवीत असे. राघुजीच्या कर्तबगारीचा नागपूरकर भोसले यांना आपल्या साम्राज्य विसतार करण्याच्या कामी खूप उपयोग झाला. नागपूरकर रघुजी हे जेव्हा आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत होते. त्या दिवसात रघुजी भोसले यांना रघुजी करांडे यांचा खूप उपयोग झाला. शिरसघाटाच्या पहिल्या लढाईत रघुजी भोसले व राघिजी करांडे यांनी आपआपसांत सुरेख समन्वय साधत गनिमी काव्याचा उत्तम व कौशल्यपूर्ण नमुना दाखवत गोंडाचा फन्ना उडविला.
* त्यानंतर रघुजी करांडे यांनी भंडारा किल्ल्याला वेढा दिला व २२ दिवसात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. देवगडचे राज्य जिंकून घेताना राघीजीने हातातील तलवारीबरोबर मुत्सद्दीगिरीची तलवार कुशलतेने चालवत हा प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली आणला. १७४०-४१ साली राघिजी भोसल्यांनी कर्नाटकावर स्वारी केली. या स्वरीतही रघुजी करांडे यांनी आपल महत्त्वपूर्ण योगदान दिल. पुढील वर्षी म्हणजे साधारणतः १७४२-४३ साली मराठ्यांनी रघुजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली बंगालवर स्वारी केली. या बंगाल्वरील महत्त्वपूर्ण स्वारीत रघुजी भोसले सेनासाहेबसुभा यांचा मुख्य सहाय्यक म्हणून सरदार रघुजी करांडे यांनी काम पाहिलं.
भोसल्यांचा अंमल बंगाल ओरिसात ते बिहारपर्यंत बसविण्यात रघुजी करांडे यांचा सिंहाचा वाटा राहिला म्हणून तर मराठ्यांचा पहिला ब्रिटीश इतिहासकार ग्रा. डफ हा रघुजी करांडे यांना नागपूरकर भोसल्यांचा सेनापती संबोधतो. बंगालच्या स्वरीहून येताना रघुजी करांडे यांनी एक दुर्गा देवीची मूर्ती आणली होती. तिची पणज जि. अकोला येथे स्थापना केली होती. तेथे हल्ली जत्रा भरते. १७४६-४७ च्या बंगालच्या स्वारीतून परत आल्यावर रघुजी करांडे यांनी देवगड प्रांताचा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. या काळी त्यांच्या अंगचे उत्तम प्रशासकाचे गुणही दिसून आले. या संदर्भात पेशवे दफ्तर खंड २० मधील एक अस्सल पत्रच त्यांच्या द्रष्टेपणाची व योग्यतेची ग्वाही देते.
* मराठेशाहीच्या विस्तार करण्याच्या कामी ज्या पराक्रमी वीरांनी अपार कष्ट सोसले त्या पराक्रमी वीरांमध्ये रघुजी करांडे यांचे स्थान खूप वरचे होते. या पराक्रमी वीराने निजामादी मराठ्यांच्या प्रमुख शत्रूंवर जरब बसविताना अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजविला तर उत्तम प्रशासकाची कर्तव्य पार पाडत रयतेच्या मनांतही ठसा उमटविला. लढाईच्या अनेक कामांमध्ये त्यांना पुत्र बापोजी करांडे व पुतण्या राणोजी करांडे यांची खूप मदत झाली. रघुजीन्चा मृत्यू ऑगस्ट १७६८ मध्ये झाला.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे
सांभार :धनगरांच्या लष्करी परंपरा
Leave a Comment