महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,233

सरदार रास्ते वाडा

By Discover Maharashtra Views: 4119 4 Min Read

सरदार रास्ते वाडा –

रास्ता पेठ, पुणे भाग – १

सरदार रास्त्यांच्या भव्य चौसोपी वाड्याचा जिना चढून मी त्यांच्या दिवाणखान्यात विसावले. दिवाणखान्याच्या डाव्या-उजव्या हाताच्या उंच खिडकीतून त्या प्रचंड वाड्याचा परीसर दृष्टीत सामावत नव्हता. बाजूच्या चौकातील महालांची नक्षीदार गवाक्षे आणि त्यावरील महिरपी डोळ्यांच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न मी करत होते.(सरदार रास्ते वाडा)

श्री. रास्ते सांगत होते, ” वेळणेश्वर हे आमचे मूळ गाव. वेळणेश्वर हे आमचे कुलदैवत तिथेच आहे. गुहागरजवळ समुद्राच्या किनाऱ्यावर हे अगदी लहानसं गाव आहे. आम्ही तिथले गोखले-रास्ते.’ “म्हणजे तुम्ही मुळचे गोखले, मग रास्ते ही तुम्हाला पदवी मिळाली की काय?” ” “होय, ती एक हकीगतच आहे मोठी!” ते पुढे सांगू लागले. “आमचे पूर्वज सावकारी करीत, अगदी विजापूरच्या अदिलशहापासून, कोकण प्रांताची रसद ते पोहचवीत. आमच्या घराण्यातील एका पुरुषाने वेळणेश्वर भागातील लाखो रुपये किमतीची बिनवारशी मिळकत जप्त करून विजापूरास बादशहाकडे पावती केली. त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ‘यह इसमे से दो-तीन लाख खा जाता, तो भी हमें मालूम न होता. इसलिये गोखले को रास्ते कहना चाहिए!’ त्याने रास्त काम केले अशा रीतीने बादशहाने रास्ते ही दिलेली उपाधी. मग गोखले ऐवजी ‘रास्ते’ हेच नाव रूढ झाले.

सरदार रास्ते वाडा – रास्ता पेठ, पुणे भाग -२

शाहूमहाराजांच्या काळात रास्त्यांच्या घराण्यातील भिकाजी नाईक व सदाशिव नाईक सावकारी करण्यासाठी साताऱ्यात आले. ते सावकारी करत म्हणून त्यांना नाईक म्हणत देवीघेवीच्या व्यवहारातून शाहूमहाराज व त्यांचा घरोबा झाला. त्यातूनच एकदा शाहूमहाराज दिवाळीत रास्त्यांकडे आले असता, त्यांनी भिकाजींची कन्या गोपिकाबाई पाहिली. त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्यासाठी शब्द टाकला. थोड्या दिवसांतच वाई येथे लग्न  थाटात पार पडले आणि रास्ते पेशव्यांचे आप्त झाले. भिकाजींना सात मुलगे, पैकी मल्हारराव रास्त्यांना पेशवे -दरबारी सरदारकी मिळाली, ते पेशव्यांच्या घोडदळाचे प्रमुख होते. त्यांच्या पश्चात आनंदराव भिकाजी, आनंदराव व त्यांच्या बंधूच्या कारकीर्दीत मोठी बांधकामे झाली, वाई येथे महालक्ष्मी, विष्णु, गणपती, काशी विश्वेश्वर. गंगारामेश्वर, पंचायतन ही देवालये, कृष्णा नदीस घाट, धर्मपुरी ही नवी पेठ वसवून ब्राम्हणांना त्यांनी तेथे घरे बांधून दिली. बोपर्डीचा रस्ता व सोनजाईचा मार्ग यांच्या दुतर्फा तीन मैलाच्या परिसरात आंब्याची झाडे लावली. अनंतपूर येथे किल्ला बांधला. याखेरीज नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगाव, अनंतपूर, अथणी, पंढरपूर, वाल्हे, मांडवगड, तालीकोट येथे वाडे बांधले. वाईच्या घाटावरील गणपातीची विशाल मूर्ती प्रेक्षणीय आहे. दक्षिण महाराष्ट्रात एवढी भव्य मूर्ती कोठेच नाही. शौर्याखेरीज रास्त्यांनी जी अफाट कामगिरी केली. त्याच्या या खुना आजही शिल्लक आहेत.

आनंदराव भिकाजी यांनी पुण्याच्या पूर्वभागात गणपतीचे देऊळ बांधून या भागात रास्ता पेठ वसवली. उत्तरेस आपली भव्य वास्तू बांधली. अकरा-बारा हजार चौरस मीटर परिसरात बाहेरून भक्कम तट असलेली ही वास्तू पेशवाईतील वैभवाची साक्ष देत आजही उभी आहे. तटाच्या दर्शनी भागासह पूर्णपणे शाबूत असलेली ही वास्तू म्हणजे पेशवाईतील आखीव-रेखीव बांधकामाचा, तसेच लाकडी कोरीव स्थापत्याचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.

उत्तराभिमुख प्रचंड दरवाजा असलेल्या या वाड्याला दोन मुख्य चौक असून, खेरीज दोन चौक आहेत. दिंडी दरवाजातून आत शिरताना दिसतो चहूबाजूंनी उंच तट या तटाभोवती आतून मोकळे आधार लागते. नंतर उजव्या बाजूने मुख्य वाड्याचा दरवाजा. मुख्य वाड्याच्या उंच दरवाजातून आत शिरताना गणेशपट्टीकडे लक्ष वेधल्यावाचून राहत नाही. दरवाज्याच्या उंबऱ्यातून आत आल्यावर लागतो चौसोपी चौक, सरळ चालत जाऊन चौकाच्या तीन पायऱ्या चढून ओसरीवर डाव्या हाताला घरातील शंकराचे देऊळ आजही नित्यनियमाने त्याची पूजा होते. चौकाच्या मध्यावर उभे राहून दृष्टिक्षेप टाकला तर तीन मजली भव्य वास्तूचे देखणेपण डोळ्यात भरते. खाली चारही बाजूंनी सोपे, माजघर, मुदपाकखाना, पाठीमागे कोठीची खोली, जाबता किंवा जामदारखानाही तळमजल्यावरच होता. शिवाय एक मोठेच्या मोठे दालनही. कदाचित येथे भोजनव्यवस्थेचा प्रबंध केला जात असावा. या याड्यात एकूण पाचशे लहानमोठी दालने होती म्हणतात. “घरात मंडळी तर खूप नाहीत, मग एवढे प्रचंड वाडे कशाला बांधत असावेत?” असे विचारता रास्ते म्हणाले, “हा वाडा काहीच नाही. वाईला यापेक्षा भव्य वाडा आहे.” -(डाॕ. मंदा खांडगे)

-वैभव पेशवेकालीन वाड्यांचे

फोटो – रास्ते वाडा, पुणे महानगरपालिका (विकास चौधरी)

Leave a Comment