महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,320

सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी

By Discover Maharashtra Views: 1981 4 Min Read

सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी –

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी ह्या गावात सरदार जानराव वाबळे यांची सरदार वाबळे गढी म्हणजे तीन वाडे आहेत. हे गाव नगर – दौंड रस्त्यावर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील पाटसवरून ३५ कि.मी अंतरावर आहे. या तीनपैकी एका वाड्यात काही वाबळे कुटुंबीय राहतात. दोन वाडे अखेरची घटका मोजत आहेत. संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. गावाबाहेर एक वेस असून ती उत्तम स्थितीत आहे. तिला चिकटूनच बावळ्यांचे हैबत भैरवनाथ याचे अतिशय मजबूत आणि देखणे असे मंदिर आहे. या मंदिरात एक शिलालेख आहे. त्याच्या मजकुरावरून हे मंदिर शके १६६४ म्हणजे सन १७४२ मध्ये बांधले आहे, हे लक्षात येते. शिलालेखाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे:

‘श्री म्हातार भैरवनाथ प्रसन्न । तयाचे चरणी दृढ भाव यमाजी वलद यशवंतराव पाटील बावळे मोकादम यांचे पुत्र संताजी व राणोजी व चापोजी व जानोजी यशवंतराव पाटील बावळे मीजे म्हातार पिंप्री सके काल १जु. सुभा सन ११४१ स. १६६४ दुंदुभी नाम संवत्सरे मार्ग शु।। त्रयोदशी देवालय बांधले असे. सामाजी गोधाजी बलद बाबाजी नजीक न.म. श्री. कुलकर्णी मौजे मदजे।।’

यातील यशवंतरावांचे पुत्र संताजी, राणोजी, चापोजी, जानोजी यांनी हे मंदिर बांधले असे उल्लेखावरून दिसते. यशवंतराव वावळे हे या घराण्याचे मूळ पुरुष आहेत. त्यांच्या घराण्यातील यमाजीराव हे मुंढाळे ता. बारामती येथून इ.स. १७३७ मध्ये श्रीगोंदा येथे आहे. त्यांनी तेथील पाटीलकी मिळविली. तेथे ते शिंद्यांच्या लष्करात सामील झाले. आपल्या कर्तृत्वावर त्यांनी शिंद्यांची मर्जी संपादन केली. सरदार राणोजी शिंदे यांनी श्रीगोंदा येथे भव्य वाडा उभा केला. त्यानंतरच म्हातार पिंप्री येथे वाबळ्यांनी आपल्या वास्तव्यासाठी गढी बांधण्यास प्रारंभ केला असावा. मढे वडगाव येथील पाटीलकी त्यांना प्राप्त झाली होतीच. पेशवे व राणोजी शिंदे यांची त्यांनी विशेष मर्जी संपादन केली. आपल्या निष्ठेचा आणि कामगिरीचा विशेष ठसा त्यांनी उमटविला. वाबळ्यांपैकी संताजीराव यांनी होळकरांच्या घोडदळात काम केले. ‘जानराव’ हे शिंद्यांच्या घोडदळात एक महत्त्वाचे लष्करी अधिकारी म्हणून प्रसिद्धीस आले. पानिपतच्या महासंग्रामात त्यांनी केलेली कामगिरी ही मराठ्यांच्या इतिहासात प्रकर्षाने नोंदविली जाते.

१० जानेवारी १७६० या दिवशी नजीबखानाचे लोक लहान टप्प्याच्या बंदुका घेऊन निघाले. दुराणी त्यांना मिळाले. हत्तीवर सोडण्याचे लहान जंबुरे त्यांच्याकडे होते. मराठ्यांजवळ भाले व तलवारीच होत्या. बंदुकांचा मारा चुकवत मराठे चिवटपणे लढत होते. जानराव वाबळे ४००० सैन्यानिशी यमुनेच्या पश्चिम तीरावर प्रचंड थंडीच्या कडाक्यात बुराडी घाटाचं रक्षण करीत होते. झाडाझुडपात दडलेले रोहिले अचानक मराठ्यांच्यावर बंदुकांच्या फैरी झाडू लागले. जंबुचाच्या आगीत माणसे भस्मसात होऊ लागली. दत्ताजी आणि जनकोजी, सावाजी, बयाजी शिंदे दीडत सुटले. जनकोजींची पाच हजारांची सेना जरीपटका घेऊन घाटाच्या पूर्वेकडे सरसावली. दत्ताजी वज्रहनुमानासारखे आपल्या ‘लालमणी’ या घोड्यावरून रणभूमीकडे झेपावले. तोफांचा मारा आणि बंदुकांच्या फैरीपुढे निभाव लागत नव्हता. तलवारी, भाले त्यापुढे हतबल झाले. भरपूर पडझड झाली. प्रेतांचा खच झाला. अशातच जनकोजी जरीपटक्यांचं रक्षण करीत आपली तलवार चालवीत असताना त्यांच्या दंडात गोळी घुसली आणि ते खाली कोसळले. येसाजी भोईटे आणि जानराव वाबळे यांनी ताबडतोब जनकोजींना बाहेर ओढले व घोड्यावर घातले. सगळे सैन्य वाट फुटेल तिकडे पळत सुटले. जनकोजीस शंभर मैलांवरील कोठपुतळी येथे जयपूरच्या हद्दीत आणले.

दत्ताजीराव लढत होते. यशवंतराव जगदाळे पडल्यावर त्यांचे प्रेत काढण्यासाठी दत्ताजी सरसावले आणि त्यांच्या उजव्या बरगडीस गोळी लागली. नजीबने त्यांच्या स्थूल, ठेंगू बांधा आणि कृष्णवर्ण यावरून त्यांना ओळखले. नजीबखान आणि कुतुबशहा यांचे शिर कापले. त्या वेळचे त्यांचे ‘बचेंगे तो और भी लढेंगे‘ हे उद्गार मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. जानराव बावळ्यांच्या पानिपतावरील कामगिरीमुळे त्यांचे नावही अमर झाले.

जानरावांचे पुत्र दौलतराव, मुकुटराव व मानाजीराव यांपैकी दौलतराव व मानाजीराव हे पुढे महादजी शिंदे यांच्या कारकीर्दीत त्यांच्यासोबत होते. जानराव इ.स. १८५५ मध्ये म्हातार-पिंप्री जहागिरीवर होते. त्यांच्या पुढील पिढ्यांनी सुद्धा शिंदे घराण्याबरोबर काम केले. वाबळे मंडळी मढे वडगाव, श्रीगोंदा, देऊळगाव सिद्दी,अंतरवेली ठिकाणी सध्या वास्तव्य करतात.

टीम – पुढची मोहीम

Leave a Comment