महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,514

सरदार वाघमोडे समाधी स्मारके

By Discover Maharashtra Views: 3506 3 Min Read

माळशिरसमधील ऐतिहासिक सरदार वाघमोडे समाधी स्मारके…

सरदार वाघमोडे घराण्यातील वीरपुरुषांची-

धनगरांच्या मौखिक परंपरांमध्ये वाघमोडे घराण्याची थोरवी अनेक ठिकाणी गायली गेलेली आहे. तत्सबंधीच्या नोंदी प्रा. बाळासाहेब बळे यांच्या ‘धुळु भिवाई’ या पुस्तकातून आणि डॉ. अ‍ॅनेफेल्ड हाउस यांच्या ‘Connected Places’ या इंग्रजी ग्रंथातून माळशिरस म्हणजेच आजच्या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व वाघमोडे घराण्याच्या असलेल्या पुरातन संबंधांवरती प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. अनेक धनगरांचे कुलदैवत असलेला धुळोबा उर्फ धुळीमहांकाळेश्वर हा माळशिरसच्या हिमू वाघमोडे नामक राजाच्या जावई असल्याचे प्रतिपादन साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासकांनी अनेक देशीविदेशी संशोधकांनी संशोधकीय लिखाणातून स्पष्ट केलेले आहे, हा झाला पौराणिक भाग.. मराठेशाहीच्या इतिहासातही हिंदवी स्वराज्याला वाघमोडेंची मोलाची मदत लाभलेली आहे.

स्वराज्यातील महत्त्वाच्या ३१ शिलेदारांची यादी देताना बखरकार कृष्णाजी आनंद सभासद यांनी सरदार जानराव वाघमोडे यांचा उल्लेख केला आहे. शिवपुत्र राजाराम छत्रपतींनी मराठ्यांची राजधानी जिंजी म्हणजे आजच्या तामिळनाडू राज्यात नेली असताना त्यांना त्यावेळी जिंजीच्या स्वसंरक्षणार्थ ज्या सरदारांनी कडक मेहनत घेतली. त्या सरदारांचे नामोल्लेख आलेले आहेत. त्या सरदारांमध्ये जानराव वाघमोडे हे देखील उपस्थित होते. उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रानुसार जानराव हे माण प्रांताच्या दहिगाव कर्यातीतील म्हणजे फोंडशिरस या गावाचे वतनदार पाटील असल्याचे नमूद आहे. याच कर्यातीतील माने, सलगर, लवटे, रुपनवर व पांढरे हि त्या काळातील मात्तबर सरदार घराणी होती. या सर्व सरदार घराण्यांनी स्वराज्याला महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यातील पांढरे हे तर बिनीचे सरदार होते, पांढरे सरदारांच्या लष्करात माळशिरसकर व भांबुर्डीकर वाघमोडे सरदारी करीत असत. यातील माळशिरसकर वाघमोडे यांना हिंदुराव तर भांबुर्डीकर वाघमोडे यांना यशवंतराव हि खिताब देऊन गौरविण्यात आले होते.

इ. स. सन १७०२ साली महाराणी ताराराणी यांनी सरदार यशवंतराव , सरदार हिंदुराव आणि राणोजी वाघमोडे यांना सरंजामाच्या सनदा तयार करून दिलेल्या होत्या या सनदांमध्ये बालाघाटातील लातूर परगणा परंडे प्रांतातील नेरळे हे गाव आणि मान प्रांताच्या अकलूज कर्यातीतील भांबुर्डी व पूरदंवडे हि दोन गावे सरंजामातून म्हणजेच जहागीर करून देण्यात आलेली होती. यांच्या संदर्भ प्रा. संतोष पिंगळे सर लिखित ‘सरंजामी मरहट्टे’ या ग्रंथात पान क्र. २३८ वर सापडतो. याचाच अर्थ छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावरील औरंगजेबाचे संकट हनन करण्यात सरदार वाघमोडेंनी मोलाचा वाटा उचलेला होता.

यापैकी सरदार यशवंतराव यांचे स्मारक भांबुर्डी गावी स्थित आहे.. तर सरदार हिंदुराव वाघमोडे यांचे स्मारक माळशिरस गावे असावे. इतर वाघमोडे सरदारांची समाधी स्मारके पूरदंवडे , फोंडशिरस, लासुर्णे (इंदापूर ता.) इत्यादी गावांमध्ये पाहायला मिळू शकतील. माळशिरस- अकलूज रोडच्या लगत असलेले घुमटाकार ऐतिहासिक समाधी स्मारके हि निश्चितच सरदार वाघमोडे घराण्यातील कोण्या एका वीरपुरुषाची असावी. कारण ३०० वर्षांपासून माळशिरस गावाचे वतनदार वाघमोडे घराणे असून या समाधी स्मारकाच्या भागालगतच्या शेतजमीनीचे मालकी हक्क हे वाघमोडे पाटील घराण्याकडे आहेत. अशी माहिती माळशिरसमधील सरदार वाघमोडे घराण्याच्यातील वंशजांपैकी श्री. मारुतीराव पाटील, अ‍ॅड. सुभाषजी पाटील, श्री. गजाननजी पाटील आणि श्री. अण्णासाहेब देशमुख, श्री. ज्ञानेश्वरजी वाघमोडे पाटील यांनी दिली आहे. याबाबतीत मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे या संस्थेतील श्री. संतोष पिंगळे सर आणि श्री. सुमितराव लोखंडे हे अभ्यास करीत आहेत.

लेखन साभार – सुमितराव लोखंडे – 8169141554

Leave a Comment