महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,720

सरदेसाई वाडा, संगमेश्वर

Views: 2172
2 Min Read

सरदेसाई वाडा, संगमेश्वर –

संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा. ३ फेब्रुवारी १६८९ रोजी मोगलांनी छत्रपति संभाजी महाराजांना याच ठिकाणी कैद केले. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे. उन्हाळ्यात ते इकडे आल्यावर या सरदेसाईंच्या वाड्यात उतरत असत. विशाळगडाहून रायगडाला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी अर्जोजी व गिरजोजी यादव आपल्या वतनाच्या निवाड्यासाठी इथे संभाजीराजांकडे आले पण ते काम अर्धवट राहिले. अर्जोजी व गिरजोजी यादव वतनपत्रे छत्रपति शिवाजी महाराजांच्या वेळेपासून मागत होते, नंतर राजाराम महाराजांच्या काळात धामधुमीतही त्यांनी या वतनाचा सारखा पाठपुरावा केला, पुढे ताराराणींच्या काळात त्यांचे पुत्र दुसरे शिवाजीराजे यांच्याकडून ही वतनपत्रे यादवांना मिळाली. औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान कोल्हापूरहून सैन्य घेऊन जलदगतीने ३ फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केले. कैद कसे केले त्यावेळचे वर्णन साकी मुस्तैदखान, खाफीखान, भीमसेन सक्सेना इ. समकालिन मोगल लेखकांनी लिहून ठेवले आहे. ते सर्व वाचून खूप वाईट वाटते.

संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेखनिजामाने हा सरदेसायांचा वाडा जाळला आणि गावातली देवळे फोडली असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे (मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०, ले.२८९).

मेणवली दप्तरातील एका कागदात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्यासंबंधीचा उल्लेख आहे. त्यात संभाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी (पुन्हा) वाडा बांधला असा उल्लेख आहे.

संगमेश्वर येथील संभाजी महाराजांच्या वाड्याच्या चौथऱ्यावर सदाशिव दादाजी मावळंगकर याने हट्टाने बांधलेले घर मोडून ती जागा संभाजी महाराजांच्या बागेसह सवाई माधवराव पेशवेंनी सरकारात ठेवल्याचा उल्लेख सवाई माधवरावांच्या रोजनिशीत आहे. आज दिसणारा वाडा हा त्या मूळ वाड्याच्या जोत्यावर नंतर बांधलेला आहे.

कैदेत पडण्याच्या आधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा.

– प्रणव कुलकर्णी.

1 Comment