सरसेनापती बापू गोखले –
पेशव्यांचे अखेरचे सरदार सरसेनापती बापू गोखले यांचे आष्टी येथे झालेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या घनघोर लढाईत वीरमरण ! (१९ फेब्रुवारी १८१८)
बापूंचें मूळ गांव तळेखाजण हें होय. जवळच्या पिरंदबण गांवीं बापूंनीं मलिकार्जुनाचें देऊळ बांधलेलें आहे. तळेखाजणास हल्लीं बापूंच्या वाड्याच्या फक्त चौथरा शिल्लक आहे. बापू यांचें नांव बापूजी असेंच आजपर्यंत समजत असत परंतु रा. गोविंदराव आपटे यांनीं नाशिकच्या तीर्थोपाध्यायांच्या वहींतून त्यांचें खरें नाव नरहर गणेश असल्याचें प्रसिद्ध केलें आहे. यांचे चुलते धोंडोपंत ह्यास प्रथम परशुरामरावभाऊ पटवर्धनांच्या हाताखालीं सरंजाम मिळाला. नंतर ते बदामीच्या लढाईंत प्रख्यातीस आले. टिपूवरील लढाईंतहि त्यांनीं तरवार गाजविली होती (१७९०). त्यामुळें पेशव्यांनीं त्यांनां कांहीं दिवसांनीं स्वतंत्र सरदार बनवून दक्षिणेंत धारवाडच्या सुभ्यावर नेमलें. यांनीं धोंडजी वाघाचा ब-याच वेळां पराभव केला होता; कित्तुरकर देसायांचें बंड मोडलें होतें व सुरापूरकर नाईकाचा मोड केला होता.
कोल्हापूराकडील रत्नाकरपंत राजाज्ञा यानें पेशव्यांच्या हुबळी, सावनूर वगैरे प्रांतांवर स्वारी केली असतां धोंडोपंत दादा यांनीं कारडगी येथें त्याचा पराभव करुन तोफा, साहेबी नौबत, जरीपटका वगैरे त्यांचा सारा सरेजाम लुटला. ही मोहीम दोन अडीच महिने चालली होती. धोंडोपंतास या लढाईंत जखमा लागल्या होत्या (१७९८ आक्टोबर). टिपूवर दाब राखण्यासाठीं धोडोंपंतास कर्नाटकांत ठेविलें होतें. शिंद्यांच्या बाया व कोल्हापूरकर हे एक होऊन पेशवाई प्रांत लुटीत असतां परशुरामभाऊंच्या हाताखालीं धोंडोपंतांनीं सौंदत्ती येथें त्यांचा पराभव करुन बराच मुलुख सोडविला (१७९९). यापुढें टिपूचा नाश झाल्यानंतर धोंडोपंतांनीं सोंधे व बिदनूर इकडील प्रांत काबीज केला याच सुमारास धोंडजीचा उपद्रव पुन्हां सुरु झाला. तेव्हां पड्डण जवळ धोंडोपंतानें त्याचा पराभव केला (१७९९).
वेलस्कीनें वाघाचा पराभव करुन त्यास तुंगभद्रापार हांकल्यानें. त्यानें मराठ्यांच्या राज्यांत धुमाकूळ घातला. तेव्हां त्याच्यावर धोंडोपंत व बापू हे चालून गेले; कित्तूरजवळील हालिहाल येथें त्याच्याशीं तोंड देण्याचें त्यांनीं ठरविलें, पंरतु कित्तूरकर देसायानें वाघास फितूर होऊन धोंडोपंतांस वाट चुकवून झाडींत नेलें व वाघास खबर दिली. त्यानें येऊन अकस्मात हल्ला केला. धोंडोपंतांचीं फौज पुढें निघून गेली होती; जवळ फारच थोडे लोक होते. नाल्यांत अडचणींत सांपडले असतांहि त्यांनीं शौर्यानें वाघावर चाल केली. परंतु अखेरीस धोंडोपंत या लढाईंत कामास आले. पुढें बापू यांस धोंडोपंतांची सरदारी मिळाली. हे मराठी राज्याचे शेवटचे सेनापती होते. यांचा एक भाऊ आप्पा हाहि वाघाच्या वरील लढाईंतच मरण पावला होता. बापूंनां दोन पुत्र होते. पैकीं एक लहानपणीं वारला व दुसरा इंग्रजांच्या अष्ट्यावरील मोहिमेंत कामास आला.
बापूंचे वडील गणेशपंत हे विजयदुर्गास दप्तरदार होते. धोंडोपंत हे कर्नाटकांत असतांना बापू हे पुण्यास दरबारांत त्यांचे वकील म्हणून असत. हुनगुंदकडे असदअल्लीच्या बंडावा मोडण्यांस धोंडोपंताबरोबर बापूहि होते. रत्नाकरपंत राजाज्ञानें कर्नाटकांत धुमाकूळ घातला त्यावेळच्या लढायांतहि बापू हजर होते. आप्पासाहेब पटवर्धनांची करवीर वरील स्वारी चालू असतां बापू व धोंडोपंत त्यांच्या मदतीस गेले होते (१८००). त्यावेळीं बापूंची पहिली स्त्री आनंदीबाई वारली. हालिहाळच्या लढाईंत बापूहि होते; त्यावेळीं त्यांनां जखमा झाल्या होत्या. शेवटीं त्यांनीं इंग्रजाच्या मदतीनें धोंडी वाघास ठार मारिलें. पुढें नगरप्रांतीं बारभाई व बावनपागे यांचें बंड बापूनीं मोडलें व कित्तूर, नवलगुंद, सुरापुर इकडीलहि बंडे मोडून पेशव्यांच्या आज्ञेनें पटवर्धनांच्या सावनुर तालुक्यावंर हल्ला करुन पटवर्धनांचा मोड करुन तो तालुका काबीज केला. शेवटीं पेशव्यांनींच पटवर्धन व बापू यांचा समेट केला. नंतर बापू हे प्रतिनिधीवर जाऊन व ताई तेलीण हिचा पराभव करुन (१८०६) पुण्यास गेले. तेथें पेशव्यांनां कोणी चहाडी सांगितल्यावरुन त्यांनीं बापूस त्यांच्याकडील सरंजामी प्रांताच्या सोडचिठ्ठ्या मागितल्या असतां, त्यांनीं त्या ताबडतोब दिल्यामुळें पेशवे खूष होऊन त्यांनीं बापूस १२ लाखांचा सरंजाम दिला व त्यांनां लढाईचें झालेलें १८ लाखांचें कर्जहि फेडलें.
पुन्हां (१८०७) प्रतिनिधीनें बंड केल्यानें बापूनीं तें मोडलें व प्रतिनिधीस थोडासा प्रांत ठेऊन बाकीची सर्व जहागीर त्यांनीं आपल्या ताब्यांत घेतली. याच्या पुढें चतरसिंगाचें बंड बंरेच वाढल्यानें बापूंची नेमणूक तें मोडण्यावर झाली व त्यांनीं तें सन १८१२ त मोडलेंहि त्यानंतर पेशव्यांनीं इंग्रजांशीं लढाईचें धोरण बांधलें. त्यावेळीं इंग्रजांचा लिंगो भगवान वकील बापूंना फितूर करण्यास आला असतां. त्यास बापूंनीं फारच बाणेदारपणाचें उत्तर देऊन प्राण जाईपर्यंत स्वामिद्रोह न करण्याचें ठरविलें. बापू हे पेशव्याचें मुख्य सेनापति होते. त्यांच्याशिवाय (आप्पा निपाणकर सोडल्यास) दुसरा कोणीहि शूर पुरुष पेशव्यांच्या पदरीं शिल्लक नव्हता. गणेशखिंडीच्या पहिल्या लढाईंत बापूंचा घोडा ठार झाला. तरी त्यांनीं शेवटपर्यंत पायउतारा होऊन तरवार चालविली. नंतर गारीवरावर लढाई झाली. तींत बापूंचे लोक व विंचूकरादि सरदार सुद्धां पळाले. तेव्हां श्रीमंतास सासवडास जाण्यास सांगून बापूहि सैन्याचा जथ कायम ठेऊन मागोमाग गेले. तेथून जेजुरी, देऊर, पंढरपूर, खेरी, ब्राह्यणवाडी या भागांत पेशवे जात असतां त्याच्या पिछाडीस वीस कोसांवर राहून न पिछाडी संभाळून बापू ठिकठिकाणीं इंग्रजाशीं लढाया देऊन त्याला थोंपवीत होते.
ब्राह्यणवाडीजवळ बापूंचा मुलगा बाबासाहेब वारला, तेव्हां त्याची बारा वर्षांची स्त्री सती गेली. पुढें कोरगांवतहि इंग्रजांशीं लढाई होऊन तींत दोहींकडील बरेच लोक कामास आले. पंढरपूरकडून एलफिन्स्टन व कर्नांटकांतून स्मिथ असे दोघे पेशव्यांवर चालून आले. त्या दोघांचेहि शह सांभाळून बापूनीं पेशव्यांनां साता-याकडे सुरक्षित पोहोंचविलें. पुढें तेथून फलटणवरुन परांड्याकडे पेशवे जात असतां, अष्टें गांवीं पेशव्यांचा व बापूंचा मुक्काम पडला. स्मिथ येणार हें ऐकून बापूंनीं श्रीमंतांस रात्रींच कूच करण्याचा सल्ला दिला. परंतु आप्पा निपाणकरानें दुस-या दिवशीं निघण्यास सुचविलें व हल्ला आल्यास आपण परतविण्याची हमी दिली. बापूंनीं फार आग्रह केला पण श्रीमंतांनीं आप्पांचेंच म्हणणें ऐकलें. दुपारींच फौज परांड्याकडे निघून गेली होती. बापूजवळ फार थोडे लोक होते.
दुस-या दिवशीं (२० फेब्रुवारी १८१८) श्रीमंत सकाळीं भोजनास बसलें असतां, स्मिथ चालून आला. त्यावेळीं बापूंनीं श्रीमंतास सावध केलें परंतु उलट पेशवेच त्यांनां टाकून बोलले तेव्हां बापू म्हणाले कीं ”दुस-याचें ऐकून कालचा बेत बिघडविला व आतां आमच्यावर रोष; आतां आम्हीं जातो, आपण सावकाश जेवावें जय झाल्यास भेटूं नाहीं तर हें शेवटचें दर्शन” असें म्हणून बापू स्मिथवर तुटून पडले. आप्पा निपाणकर झाड्यास जाण्याच्या निमित्तानें व आपला निभाव लागणार नाहीं असें म्हणून मागें पळाला. तेव्हां बापूंनीं फक्त पन्नास लोकांनिशीं स्मिथवर जबरदस्त हल्ला केला. त्यामुळें त्याची एक तुकडी हटली. शेवटीं दहा बारा लोक राहिले असतां बापूंची व स्मिथची गांठ पडून द्वंद्वयुद्ध झालें. त्यांत सरसेनापती बापू गोखले फार शौर्यानें लढले. परंतु शेवटीं रणांत ते कामास आले.
– प्रसन्न खरे
संदर्भ :
सरदार बापू गोखले.
लेखक – कै. श्री. सदाशिव आठवले