रणमार्तंड, रणवैभव, सरसेनापती संताजी घोरपडे –
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म २९ आॅक्टोबर १६६० रोजी झाला.
संताजी घोरपडे यांचे घराणे उदयपूर येथील शिसोदीया वंशापासून उगम पावले .छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली त्यावेळी संताजी घोरपडे यांच्या बरोबर होते .पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगड ,दत्तवाड ,कापशी , इत्यादी शाखा उत्पन्न झाल्या .संताजी घोरपडेना छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापती पद दिले .संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असत. तेथूनच ते चारही दिशेत विजेसारखे चमकत राहिले.बादशहाने जिंकलेल्या विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला.संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते . “बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानी ना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती ”
संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजी राव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते१६९७ या काळात सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली .त्याच काळातले संताजीराव घोरपडे व धनाजीराव जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजीराव घोरपडे यांची प्रचंड दहशत होती .संताजीच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या काळातील शत्रु पक्षीय मोगल इतिहासकारांनी लिहून ठेवली हे किती विशेष आहे.
अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी .जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तीर्ण प्रदेश संताजीराव यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठिक ठिकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी छत्रपती राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजीराव घोरपडे मोगली फौजेच्या हालचालींची व तिच्या सेनानीँच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत.
संताजीराव घोरपडे यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य याचा मोगल सरदारांना धाक आणि दरारा वाटत होता.मोठ मोठ्या शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे ,आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला तर एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे, किंवा त्याचा पराजय होऊन त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जात तिकडे त्यांचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. संपुर्ण साम्राज्यात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचले की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीच्या ह्रदयात धडकी भरत. संताजी आपल्या युद्धनितीने मोगलांना सळो की पळू करून सोडत.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर असताना मोगल सरदार झुल्फिकार खानाने किल्ल्याला वेढा घातला होता. त्यामुळे महाराज किल्ल्यावर अडकले होते. त्यावेळी महाराजांना सोडवण्याची जबाबदारी मराठा सरदार संताजी घोरपडेने स्वीकारलेली होती. त्या काळात संताजी आणि धनाजी असा काही पराक्रम गाजवत होते की, औरंगजेबानेही त्यांचा धसका घेतलेला होता. मोगल सैन्याला तर जळीस्थळी काष्ठी पाषाणी हे दोघे दिसायचे. घोडे जर पाणी प्यायले नाही तर त्याने दोघांचा धसका घेतला असावा, असे बोलले जायचे.
पुढे संताजी छत्रपती राजाराम महाराजांच्या संरक्षणासाठी जिंजिला जात आहे हे समजल्यानंतर औरंगजेबाने कपटी कासीमखानला मोठ्या फौजेसह पाठवले. कासीम राक्षसी महत्त्वाकांक्षेने आला होता. त्याच्याजवळ ६०हजारांचे सैन्य होते. पण संताजीच्या गनिमी काव्याने त्याला सळो की पळो करून सोडले. राजाराम महाराज जिंजिवरून सुखरुप सुटले. त्यानंतर जिंजिचा किल्ला झुल्फिकार खानाने जिंकला. परंतु छत्रपती राजाराममहाराज मात्र त्याच्या तावडीतून सहिसलामत सुटले. मराठेशाहीवर आलेले खुप मोठे संकट टळले.
संताजीना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने अनेक नामवंत सरदार पाठवले होते. त्यांच्या बरोबर तोफखाना, भरपूर धन, आणि सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. कासीमखानाने आपले सैन्य रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाच्या छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली.
मोगली सैन्य रणांगण सोडून पळत सुटले आणि दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोड्डेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकारांनी दिले आहेत.