सती –
विवाहाच्यावेळी अग्नीला साक्ष ठेवून वधू-वरांनी आमरण एकमेकांबरोबर जगण्याची शपथ घेतलेली असते. अशा श्रद्धेतून पतीच्या निधनाबरोबर पत्नीने सहगमनाचा मार्ग स्वीकारून सती जाण्याची प्रथा रूढ झाली असावी. सतीप्रथा हे समाजातील पुरूषप्रधानतेचे उदाहरण आहे. पति-निधनानंतरही त्याचा पत्नीच्या देहावरचा आणि जीवनावरचा हक्क संपत नाही, हेच या प्रथेतून सूचित होते. “योनिशुचिता” ही पुरुषप्रधान संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली गेल्याने, विधवा स्त्रीचे शील संरक्षितच राहावे, म्हणून ती पतीच्या चितेवरच सती गेलेली बरी, परलोकातही पतीशी पुनर्मीलन व्हावे, ती सती न गेल्यास विधवा स्त्रीने विकेशा व्हावे, वीरक्त जीवन जगावे, तसेच तिला पुनर्विवाह करण्यास बंदी असे.
विधवा स्त्रीला ती मरेपर्यंत पोसायचे त्यापेक्षा ती मेलेलीच बरी, असाही एक दृष्टिकोन होता. त्यामुळे अशा मरणप्राय जिण्यातून सुटका व्हावी, या अपेक्षेतून ती सती जाण्याचा मार्ग स्वीकारत असावी. सती गेल्यामुळे स्त्रीला मोक्ष मिळतो, अशीही समजूत आढळते. पतीला परमेश्वर मानून त्याच्यावरील निस्सीम प्रेम, निष्ठा, कृतज्ञता इ. व्यक्त करण्याची प्रतीकात्मक कृती म्हणजे सती जाणे होय, असेही म्हटले जाते. वीरपतीची वीरपत्नी घराण्याची प्रतिष्ठा उंचावते, या समजुतीतून क्षत्रियांमध्ये सतीची प्रथा रूढ झाली असावी.
बंगाल प्रांतात स्त्रियांना कुटुंबाच्या मिळकतीच्या मालकी हक्कात जास्तीत जास्त वाटा देण्याची पद्धत आहे. हा त्यांचा हक्क डावलण्यासाठी व त्यांचा अडसर दूर करण्यासाठी तेथे सतीची प्रथा सुरू झाली असावी. अरबांची आणि तुर्कांची आकमणे सुरू होताच व नंतर मोगलकाळात सतीप्रथेला जोहारचे स्वरूप प्राप्त झाले. हिंदू स्त्रियांवर विशेषत: राजपूत स्त्रियांवर जे अत्याचार होत, त्यांच्या भीतीतून जोहार करण्याची म्हणजे सती जाण्याची प्रथा दृढ झाली असावी.
महत्त्वाचा विषय येतो हा की प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा…
ते दाखविण्यासाठी / सिद्ध करण्यासाठी आपलाही जीव द्यावा हे मनाला न पटण्यासारखं आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. सतीची ही प्रथा स्त्रीच्या वैयक्तिक इच्छेनुसार स्वीकारली गेली की, पुरूषप्रधान समाजव्यवस्थेच्या दडपणामुळे अनुसरली गेली, यांबाबत निर्विवादपणे काही सांगता येणे कठीण आहे. मात्र विधवा स्त्रियांची मानसिकता आणि अवस्था बदलण्याचा व सुधारण्याचा प्रयत्न परंपरागत पुरूषप्रधान समाजव्यवस्थेने कधीही केला नाही.
परंतु आजच्या काळात सतीप्रथा जरी बंद झाली असली तरीदेखील दुर्दैवाने समाजाचा विधवा स्त्रियांकडे पाहायचा दृष्टिकोन मात्र असामाजिक, अमानवी व अत्यंत हीन प्रवृत्तीचा, जशाचा तसाच आहे…