सतीशीळा –
जुन्या काळी पत्नीने पती निधनानंतर सती जाण्याची म्हणजेच जिवंतपणी अग्निदाह करवून घेण्याची प्रथा होती. अशी पतिव्रता स्त्री देवपदाला पोहोचते, अशी त्या काळी जनमानसात समजूत असे. दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत सतीशीळा घडवल्या गेल्या.
विरगळी प्रमाणेच उभ्या दगडात कोरलेल्या सती शिळा सर्वत्र बघायला मिळतात, मुख्य शीळेवर आकाशाकडे पाचही बोटे केलेला काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा व चुडा भरलेला हाताचा पंजा ही सतिशीळा किंवा सतीचा दगड ओळखण्याची महत्वाची खूण आहे.
मुरबाड मधील किल्ले गोरखगडाच्या पायथ्याला असलेल्या #डेरमाता मंदिरासमोरच अश्या दोन सतिशिळा बघायला मिळतात.
सतीशिळा क्रं. १. मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजुला असलेल्या या सतीशिळेवर सर्वात खालच्या कप्यात चिता पेटलेली दाखवली आहे, चिते वरती विराचं शव असून त्याच्या शेजारी वीराच्या पाच पत्नी दाखवलेल्या आहेत. दुसऱ्या भागात सतींची घोड्यावरून मिरवणूक काढलेली आहे. वीराच्या पाच पत्नी प्रत्येकी एका घोड्यावर आरूढ आहेत असं दाखवलेलं आहे. तिसऱ्या भागात पाचं सतींचे हात कोपऱ्यातून दुमडलेले दाखवलेलं आहे. चौथ्या भागात वीर आपल्या पाच पत्नीसह शिवलिंगाची पूजा करत आहे, सोबत स्वर्गाचा प्रतिनिधी पुरोहित देखील आहे.
सतीशीळा क्र.२. सर्वात खालच्या भागात मृत वीर आणि त्याची पत्नी दाखवलेली आहेत. दुसऱ्या भागात घोडयावर आरूढ झालेली स्त्री बसलेली दाखवलेलं आहे व तिचा हातात सतीचे वाण दिसत आहे. त्यावरच्या भागात सतीचा हात स्वर्गा च्या दिशेनं दाखवलेला आहे . कोपरापासून दुमडलेल्या हातात बांगड्या आहेत. सगळ्यात वरच्या भागात वीर सपत्नीक नमस्कार मुद्रेत बसलेला आहेत बाजूला शिवपिंडी त्या खाली नंदी व पुरोहित पूजा करताना दाखवलेले आहेत.
©श्रद्धा हांडे