सातपुते वाडा, भुईंज –
भुईंज आणि छत्रपतींचे नाते इतिहासात वरचे वर अधोरेखित होत आले आहे. भुईंजच्या जाधव-भोसले या प्रमुख रहिवाशांसोबतच इतरही अनेकांच्या छत्रपती शिवरायांपासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यातच हिंदपती छत्रपती थोरले शाहू महाराज आणि भुईंज हा बंध तर अतुट आहे.सातपुते वाडा, भुईंज.
भुईंजचे परंपरागत पुरोहित श्री.सातपुते कुटुंबाची शाहू काळातील अशीच एक नोंद शाहू रोजनिशी मध्ये सापडते. आजच्या दिवशी १२ जानेवारी १७०८ रोजी राजधानी अजिंक्यताऱ्यावर स्वत:ला अभिषिक्त करुन घेत शाहू महाराज छत्रपती झाले. पण पुढे अजिंक्यताऱ्याची जागा राजधानीसाठी कमी पडू लागली. त्यामुळे महाराजांनी गडाच्या पायथ्याशी “सातारा” शहराची १७२१ ला स्थापना केली. पुढे माची वरील अदालतवाडा, गुरुवार बागेतील तख्तवाडा, रंगमहाल इ. शाही इमारती बांधल्या गेल्या आणि शाहू देखील ‘सातारा शहराचे’ रहिवासी झाले.
इ.स. १७६२-६३ च्या नोंदीनुसार “राजश्री स्वामी गडावरुन उतरुन सिंहासनारुढ झाले तेसमयी ब्राम्हणांस इनाम जमीन….. वेदमूर्ती राजश्री जनार्दनभट बिन नारायणभट उपनाम सातपुत्रे (सातपुते) गोत्र वसिष्ठ सुत्र आश्वलायन ज्योतिषी ‘मौजे भुईंज’ व धर्माधिकारी वाई यांसी मजकूर चावर -||-, मौजे पांचवड -|-, मौजे कळंबे -|-, एकूण -||-” या मजकुराची ९ पत्रे रवाना झाली पैकी ३ सनदी पत्रे – १ मुख्य पत्र, २ मोकादमास; ३ चिटणीसी पत्रे – १ देशमुख व देशपांडे, १ राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान, १ राजश्री नारो पंडित प्रतिनिधी व ३ ब्राम्हणांस (भट व धर्माधिकारी).
भुईंज मधील परंपरागत पुरोहित वेदमूर्ती ज्योतिष जनार्दनभट नारायणभट सातपुते व वाईचे धर्माधिकारी यांना अनुक्रमे पांचवड आणि कळंबे (ता.वाई) या गावातील प्रत्येकी पाव चावर (३० बिघे) म्हणजे अंदाजे १७.६ एकर जमीन ब्राम्हणदान म्हणून इनाम दिली. आजही या सातपुते ब्राम्हणांचा वाडा कृष्णाकाठी भुईंज मध्ये अस्तित्वात आहे.
फोटो : सातपुते वाडा, भुईंज
स्वप्नील महेंद्र जाधवराव.