महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,884

खानदेशातील सविनय कायदेभंग

By Discover Maharashtra Views: 2487 5 Min Read

खानदेशातील सविनय कायदेभंग –

सत्याग्रहासाठी मीठाचा कायदेभंग हे जरी प्रतिक असले तरी भारतीय दृष्टीने भारतात तयार होणाऱ्या मिठाची इंग्लंडमधून आयात आणि मिठासारख्या जिवनावश्यक गोष्टींवर कर, त्याच्या निर्मितीवर निर्बंध हे जुलमी सत्तेचे प्रतिकच होते. भारताच्या अधोगतीला इंग्रज कसे जबाबदार आहे असे पत्र गांधींजींनी लाॅर्ड आयर्विन यास पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. एका प्रकारे कापडाची इंडस्ट्री, लाकडाची इंडस्ट्री, कारखाने आणि कारागिर हे निकामी करून फक्त कच्चा माल तयार करून, फोडा आणि तोडा ही निती अवलंबून भारताला पराबलंबी करण्याचे धोरणाचा अतिरेक व्हायला लागला होता. त्यासाठी गांधीजींनी अकरा सूत्री मागण्यांचा पाठपुरावा करून पूर्ण स्वराज्याची मागणी केली.(खानदेशातील सविनय कायदेभंग)

सत्याग्रहाचे पडसाद इंग्लंड अमेरिका येथे उमटले मग खानदेशातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या मनात उमटले  यात काय मोठे नवल. आंदोलनाच्याज्ञ पूर्व तयारी साठी पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र कायदेभंग मंडळाच्या बैठकीत काँग्रेसचे दास्ताने आणि ठकार हे पुर्व खानदेशातील प्रतिनिधी म्हणून गेले होते. महात्मांनी १२ मार्च १९३० ला साबरमतीहुन दांडीसाठी  प्रयाण करताच खानदेशातही आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

सहा एप्रिल रोजी पुर्व  खानदेश युध्दमंडळ कार्यरत झाले होते. अमळनेर येथील हरीभाऊ मोहनी गांधीजींच्या दांडीयात्रेत सत्याग्रही म्हणून सहभागी झाले होते. पिंपराळे आश्रमाचे सत्याग्रह शिबिरात रूपांतर करण्यात आले शिबिरात स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी मार्च महिन्यात सुरवात झाली होती. प्रौढ आणि तरूणांसोबत शाळकरी मुले सुध्दा शिबिरात यैत असत. कायदेभंग प्रचारासाठी ना.मा. गोखले, वि.ग. कुलकर्णी, रामचंद्र धोंडो भोगे आणि पुण्याचे सदाशिव श्रीकृष्ण चिटणीस तथा झिपरूबुवा यांची नियुक्ती करण्यात आली. १९३० च्या बालवीरांमध्ये भादलीचा सुभानराव पाटील, चहार्डीचा माधव झिपरू सोनार, चोपड्याचा परमानंद मयूर व बाबू कोठारी यांचा समावेश होता. बालवीरांच्या सेनेला माकडसेना असेही म्हणत. मिरवणुकीत स्वयंसेवकांच्या शिस्तबध्द रांगा प्रेरणादायी राष्ट्र प्रेमाची गीते सादर करत. अर्थातच साने गुरुजी यांनी रचलेली ही गीते असत. वीर वामनराव जोशी यांचे रणदुंदुभी हे नाटक रंगमंचावर सादर करून देशप्रेमाने वातावरण भारून टाकत असत. वि.ग.कुलकर्णी तसेच दु.आ. तिवारींनी स्फूर्तीगीते रचून या आंदोलनात हातभार लावला आहे. तिवारीच्या काव्याचा प्रभाव किर्तनकार लोकांनी जनतेपर्यंत पोहचवला.

गुप्तचरांच्या अहवालावरून चाळीसगाव शाळेच्या मुख्याध्यापक नारायण कृष्णा गोखले यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहन देत असत. काँग्रेससभा आणि व्याख्याने आयोजित करत आणि जनमानस जागृत करत. बेकायदेशीर मीठ विक्री, विदेशी कापडाच्या दुकानासमोर निरोधने,मद्य दुकानासमोर निरोधने आणि खादीचा प्रसार करण्यात येई. बरेच कार्यकर्ते विलेपार्ले येथील शिबिरात जाऊन प्रशिक्षण घेत असत. जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा जामनेर इत्यादि ठिकाणी काँग्रेसच्या सभा वारंवार घेत असत. सत्याग्रहासाठी स्वयंसेवक आणि निधी जमा करीत असत. जवाहरलाल नेहरू यांना अटक झाल्यानंतर हरताळ पाळण्यात आला. साने गुरूजींनी पोटतिडकीने प्रचारकार्य आणि २९ एप्रिल १९३० मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि पुर्णवेळ स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. ( बाँबे प्रेसिडेन्सी पोलिस  ऍबस्ट्रॅक्ट ऑफ इंटलिजन्स मे-जून १९३०, के.के चौधरी source of material for history of freedom movement volume 11)

पिंपराळे आश्रमात आंदोलनाचे केंद्र होते आणि गोखले यांच्या जागी आसोद्याचे सुकाभाऊ चौधरी हे काम पाहू लागले. सुकाभाऊ हे जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील वजनदार व्यक्तिमत्त्व होते.  कानपुर येथील शिवप्रसाद शर्मा हे अमळनेर येथे सभा घेत असत. १९३० नंतर मात्र आंदोलनात कुणबी, मारवाडी, वाणी, मराठे, लेवा पाटीदार अशा अठरापगड जातींच्या लोकांनी सहभागी व्हायला सुरुवात झाली. आसोदा, फतेहपूर, पिंपळगाव, धरणगाव, अक्कलकुवा, चहार्डी, शेंदुर्णी, शिंदाळ, बहाळ,  खेडगाव,  कुर्का, भोटे, एदलाबाद, बोदवड, कळमसरे, पारंबी, रांजणगाव, करजगाव, निमखेडे, इच्छापूर बोरखेडे, राजुरे, परूंबे, कु-हे, खिरोदे,  रोझोदे, विरोदे, न्हावी, चिनावल मस्कावद, चिंचखेडे, वडोदे, भालोद, चिखलटण, लोणजे, पिंपराळे, नांदेड,  बहादुरपुर, तरोडे,  यासारख्या लहान गावात सभा, बैठक आणि प्रभातफेरी झाल्याच्या नोंदी सापडतात तर प्रत्येक तालुक्यात भाषणे, सभा, प्रभातफेरी आणि निदर्शने, सरकारी कृत्यांचा निषेध शाळा आणि सरकारी इमारतींवर ध्वजावरोहण असे कार्यक्रम झाल्याच्या नोंदी गुप्तचर अहवालात आहे.(कित्ता या ग्रंथात या अप्रकाशित गुप्त अहवालातील उतारे दिलेल्या आहेत)

या आंदोलनात विदेशी कापडाच्या बहिष्कारावर भर देण्यात आला.  वासुदेवराव वि. दास्ताने, मीर शुक्रुल्लाह खान, देवकीनंदन नारायण, शंकर मोतीराम काबरे, प्रभाकार केशव सोनाळकर, जी.बी.भुतेकर, निळकंठ गणेश साने, रिसबुड यांचे सारखे काँग्रेस जन बहिष्कार आणि निरोधन पथके आयोजित करत असत तर भुतेकर यांनी चाळीसगाव तालुक्यातील आंदोलनात हातभार लावला. बरेच कापड दुकानदार यांनी विदेशी कापडाच्या विक्री बंद केली तर काहींनी स्टाक संपल्यावर नवीन विदेशी कापड न आणण्यासाठी हमी दिली.  जरी हे आंदोलन हे इंग्रज्यांच्या विरोधात होते तरी खरी लढाई आपल्याच मानसिकतेविरोधात लढाईत होती.

सोनाळकर आणि त्यांचे बंधू वसंत यांनी युसुफ मेहेर अलींच्या युथ लीगची शाखा जळगावात स्थापन केली आणि तरूणांना संघटीत करून स्वदेशी, बहिष्कार, मद्यपान निषेध, स्वयंसेवकांचे संघटन,  खेड्यातील जनजागरण प्रभातफेरी असे उपक्रम सुरू केले. या सारख्या युथ लीग अमळनेर, एरंडोल, पाचोरा, येथेही  यूथ लीग कार्यरत झाल्या. कायदेभंग प्रचारासोबत स्वदेशी आणि स्वराज्य यासोबत मद्यपान बंदीसाठी या काळात बरेच प्रयत्न केला कारण की मद्यपान विक्रीतून सरकार बराच मोठा महसूल गोळा करत होते. तालुक्यातील गावात मद्यपान विक्री करणाऱ्या दुकानासमोर ठाण मांडून बसत आणि आंदोलन करीत असत. गावकरी सुध्दा त्यामुळे बहिष्कार टाकत.(खानदेशातील सविनय कायदेभंग)

माहिती साभार –

Leave a Comment