कुशावर्ताचे शिल्पंवैभव, त्र्यंबकेश्वर –
त्रंबकेश्वर गावाच्या मध्यभागी असलेले कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर मधील मुख्य तीर्थ मानलं जातं. हे तीर्थ गावाच्या मध्यभागी असून येथूनच गोदावरीला नदीचे रूप मिळालेले दिसते. पूर्वी हे तीर्थ अगदी लहान व साधे होते. होळकरांचे फडणवीस, रावजी महादेव पारनेरकर यांनी तीर्थाला शिल्पं वैभव दिले. या तीर्थावर स्नान, दान, श्राद्धादिक करणे अत्यंत पवित्र मानलं जातं. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर या ठिकाणी प्रकट होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
कुशावर्त तीर्थाची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरुन वारंवार लुप्त व्हायची. गोदावरीचे पलायन थांबविण्यासाठी गौतम ऋषींनी गोदावरीला कुशांनी अडविले म्हणून त्याला कुशावर्त असं नाव पडलं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी प्रथम कुशावर्तात स्नान करण्याची परंपरा भाविक आजही पाळतात.
सुंदर षटकोनी तीर्थाच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर चार देवालयं आहेत. ओवरी मधील देवकोष्टकातील शिल्पं हे आकर्षक असून त्यांच्यात भगवान विष्णूचे दशावतार, नृसिंह अवतार, गणेश सहपरिवार, भैरव, नंदीवर बसलेली शिवपार्वती, शेषशायी विष्णू या शिवाय प्रभू श्रीरामाचा अश्वमेधाचा प्रसंग ही शिल्पे अनोखी आहेत.
ओवरीतील सोहळा अनुभवून आपण डावीकडच्या शिवमंदिरात पोहोचतो. येथील नंदी सुरेख असून मंदिरात शिवलिंग आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. यात सुरसुंदरी, देव-देवता, मिथुन शिल्पे, गणेश, ब्रम्हदेव, अर्धनारी नटेश्वर, मत्स्य अवतार, लक्ष्मी-नरसिंह, कल्की अवतार हे शिल्पं थक्क करते. हा सर्व शिल्पसोहळा पाहताना आपले भान हरपून जाते. एवढं मात्र खरं की कुशावर्त कितीही वेळा पाहिले तरी त्याचे सौंदर्य खुलत जाते व प्रत्येक वेळी नवीन काही पाहायला मिळते.
संदर्भ – वारसायन, श्री. रमेश पडवळ
Rohan Gadekar