महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,16,071

वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !

By Discover Maharashtra Views: 1353 5 Min Read

वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !

जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांखाली कधीकाळी एक गुप्त नगर वसलेले होते, अशी नवीच माहिती समोर आली आहे. या नगरवासियांना हवा, पाणी व प्रकाश मिळावा यासाठी केलेली व्यवस्था अाजही काही प्रमाणात उपलब्ध आहे. लीळाचरित्र तसेच पाश्चात्त्य तज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांतही या गुप्त नगरीचा उल्लेख आढळला आहे. शत्रूंपासून लपण्यासह मौल्यवान खजिना दडवण्यासाठी तसेच कारागिरांच्या निवासासाठी याचा वापर होत असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या नगरीवर आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !

जर्मन पत्रकार अाणि कैलास लेणीच्या अभ्यासिका क्रिस्टल प्लित्झ यांनी वेरूळच्या लेणीखाली गुप्त शहर असल्याचा दावा केला आहे. याबाबत यू-ट्यूबवहि काही संशोधकांनी व्हिडिओ अपलोड केले अाहेत. या दाव्याची सत्यता पडताळली. संशाेधकांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे दिले आहेत. कैलास लेणीत एक अायताकृती बाेगदा आहे. काही अंतर पार करून गेल्यावर ती ९० अंशात वळते आणि पुढे निमुळती होत जाते. यापुढे ती कोठे जाते याची कोणालाच माहिती नाही. काहींच्या मते ती पुढे ४० फूट खोल अशा ठिकाणी घेऊन जाते. हेच ते नगर होते. काही भुयारी मार्ग अत्यंत निमुळते आहेत. तेथे माणूसही जाणे अशक्य आहे.

कोणालाच जाता येत नव्हते तर ही भुयार कशासाठी तयार केली, असा संशोधकांपुढचा प्रश्न आहे. लेणीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची छिद्रे आहेत. काहींच्या मते यात बांबू रोवून वरचे काम केले जात असावे. काहींना तेव्हाचे लोक मसाले कुटण्यासाठी याचा वापर करत असावेत असे वाटते. काहींना हे पाणी साठवण्याची सोय वाटते. परंतू काही छिद्रे खूप खोल आहेत. ती आता बुजवण्यात आली आहेत. संशाेधकांना ही छिद्रे खालच्या नगरीत हवा, पाणी आणि प्रकाश पोहचवण्यासाठीची सोय वाटते. लेणीत अनेक गुप्त रस्ते आहेत. परंतू ते पर्यटकांसाठी ३५-४० वर्षापासून बंद करण्यात आले आहेत.इतिहास व पुराणातील दाखले असे..

१. महानुभव पंथाच्या चक्रधर स्वामींचे ११ महिने लेणीत वास्तव्य. लीळा चरित्रातील कवनात “हा अवघाची डोंगर पोकळू असे, एेणीच जाणीचे रिग्ने कोणी नाही’ (अर्थ : वेरूळचा डोंगर अत्यंत पोकळ आहे. यात कोणी गेले तर तो परत येण्याची शाश्वती नाही. तो अनाकलनीय आहे.) असा लेणीसंबंधी उल्लेख आहे.

२. चक्रधर स्वामींचे भक्त वेरूळ मुक्कामी असतांना रात्री घाबरून उठत. त्यांना विभिन्न आवाज येत असत. यावर चक्रधर स्वामींनी त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. हा आवाज या नगरातील जनतेचा तर नसावा?

३. इतिहास आणि पुरातत्व शास्त्रातील बायबल मानले जाणारे जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसन यांनी १८६०मध्ये लिहीलेल्या “दि केव्ह्ज ऑफ इंडिया’ या पुस्तकात वेरूळच्या लेण्यांमागे काही लेण्या असल्याचा उल्लेख आहे. या लेण्या शंकराचे गुरूच्या भूमिकेतील रूप म्हणजेच लकुलीशाच्या होत्या. मात्र, नंतर कोणालाच त्या सापडल्या नाहीत. दबलेले शहर या लेण्या तर नसाव्यात?

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाचे संस्थापक डाॅ. गुप्ते यांनीही जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसनने बघितलेल्या लकुलीशाच्या लेण्यांचा उल्लेख केलाय.

तुर्कस्थानात लेणीखाली भूमिगत शहर तुर्कस्थानमध्ये डेरींकूयू लेण्यांखाली एक भूमिगत शहर सापडले आहे. विशेष म्हणजे हे शहर ८ मजली आहे. येथे २० हजार लोक रहात असावे, असा अंदाज आहे. अनेक वर्षे दबून राहिल्यानंतर १९६३ मध्ये ते जगासमोर आले. अशाच पद्धतीने वेरूळ परिसरातही उत्खनन करून भूमिगत शहराची माहिती जगासमोर आणण्याची गरज संशोधक व्यक्त करतात.

अधिक संशोधन व्हावे !

कधी खूप खोदल्यावर खराब दगड लागतो. मग काम अर्धवट सोडावे लागते. कदाचित वेरूळ खालील शहर अशा पद्धतीने अर्धवट सोडून दिलेले काम असावे. त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी दाखले आहेत. या मार्गावर व्यापार करणारे व्यापारी मौल्यवान ऐवज आणि पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठी अशा गोपनीय जागांचा आधार घेत असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही. तथापि, यावर संशाेधन, उत्खनन व्हावे.

– डॉ.दुलारी कुरेशी, इतिहास तज्ज्ञ आणि वेरूळ लेणीच्या अभ्यासिका

हा उल्लेख आधीच्या वेरूळचा !

आताचे वेरूळ हे तिसरे वेरूळ आहे. पहिले वेरूळ डोंगराच्या पायथ्याशी महानुभवांच्या आगमनापूर्वीचे होते. मात्र, प्लेगच्या साथीमुळे हे गाव ओस पडले आणि नदीपल्याड वसले. नंतर ते गावही गायब झाले आणि आताचे वेरूळ तयार झाले. कदाचित पाश्चात्य संशोधक जुन्या वेरूळचा उल्लेख करत असावेत.

– मधू कृष्ण जोशी, निवृत्त उपअधिक्षक, पुरातत्वविद्

शक्यता नाकारता येत नाही !

राष्ट्रकूटांच्या काळात अरबांचे आक्रमण होत होते. राष्ट्रकूटांनी ते थोपून धरले होते. पुढील धोके टाळण्यासाठी अशा प्रकारची सुरक्षित नगरी वसवली असण्याची शक्यता नाकारत येत नाही. लीळाचरित्रात याचा उल्लेख आढळतो. याबाबत आणखी अभ्यास व्हावा.

-डॉ.वि.ल.धारूरकर, वेरूळ लेणीच अभ्यासक

उत्खननात अवशेष आढळले होते..

गुप्त शहर होते किंवा नाही हा आत्मानुभूतीचा विषय आहे. काही पुरावे दुजोरा देणारे आहेत. काहींना छिद्रे किंवा भुयारी मार्ग हे जल व्यवस्थापनाची सोय वाटते. काही वर्षांपूर्वी कैलास लेणीसमोरील उत्खननात गावाचे अवशेष आढळले हाेते. कदाचित हे गाव लेण्यांखालपर्यंत असावे.

-मधुसूदन पाटील, वेरूळ लेणीचे गाईड व अभ्यासक

Leave a Comment