मराठेशाहीतील स्त्री सैन्याची सेनानाययिका –
मराठेशाहीत अनेक सरदार होते. आपल्या पराक्रमाने किंवा कृतीने चांगला-वाईट लौकिक ह्या सरदारांनी मिळविलेला होता. पण ह्याच मराठेशाहीत पेशव्यांच्या पदरी एक स्त्री सरदार होती. ही स्त्री अधिकारी महिलांच्या तुकडीची प्रमुख सेनानाययिका होती. युरोपियन असलेली ही स्त्रीची इटली ही मायभूमी. मराठेशाहीतील पेशव्यांच्या पदरी महिलांची पलटण तयार करणाऱ्या ह्या स्त्रीचे नाव होते मिसेस जेम्स हॉल. मुळच्या सध्याच्या इटलीतील फ्लॉरेन्स ह्या शहरातील असलेल्या ह्या महिलेने मद्रास येथील जेम्स हॉल नावाच्या युरोपियन बेरिस्टरशी लग्न केले. पुढे आपल्या पतीशी भांडण झाल्याने तीने शिपाईगिरीचा स्विकारली.
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात ही महिला पुण्यास आली. पेशव्यांकडे येऊन मिसेस हॉलने महिलांची एक पलटण उभारायचे ठरवले व तसा प्रयत्न तीने सुरू केला. पेशव्यांपुढे वेगळ्या प्रकारची संकल्पना ठेवणारी ही स्त्री मोगल सरदाराप्रमाणे पोशाख करीत असे. डोक्यावर पीसांचा तुरा असलेले शिरकाण ती घालत असे. पाश्चात्य उच्चारांचा अपभ्रंश करून अनेक नावे हिंदुस्थानात घेतली जायची (जसे- अँडसर्न – इंद्रसेन ई.). त्याचप्रमाणे हिच्याही नावाचा अपभ्रंश झाला असावा. हिंदुस्थानात ह्या बाईला जमालखान किंवा जमाल सरदार म्हटले जायचे.
मिसेस जेम्स हॉल उर्फ जमालखान ही स्वभावाने अत्यंत कडक होती. तीच्या हाताखालच्या एका ब्राह्मण नोकराने तीचा अपराध केल्यावर तीने नोकराला मरेपर्यंत चोप दिला. म्हणून नाना फडणीसाने तीला कैदेत ठेवले. ७ वर्षे कैद भोगून पुढे शिंद्यांच्या फ्रेंच सेनापति मनसूर पेरू ह्याने मध्यस्थी करून तिची सुटका केली. ती पुण्याहून निघून मुंबईला आली आणि तेथेच इ. स. १७९८च्या सुमारास ती वारली.
तत्कालीन काळात मराठेशाहीतील पेशव्यांपुढे एक वेगळी संकल्पना मांडणारी मिसेस जेम्स हॉल उर्फ जमालखान. हिचा महिलांच्या तुकडीचा मानस सिध्दीस गेला असता, तर एक वेगळी क्रांति घडून आली असती. पण अखेर तिच्या नशिबी कैद आल्याने तिचा पराक्रम लोप पावला.
संदर्भ –
इतिहाससंग्रह
मराठी रियासत खंड ६
The Hindu Pantheon – Edward Moor
(सदर चित्र काल्पनिक आहे.)
© अनिकेत वाणी