महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,786

सेऊणचंद्र द्वितीय | यादवकालीन खानदेश भाग ७

By Discover Maharashtra Views: 1458 12 Min Read

सेऊणचंद्र द्वितीय | यादवकालीन खानदेश भाग ७ –

सेऊणचंद्र द्वितीयेचा वाघळी शिलालेखात एका मौर्यकूलप्रदीप गोविंदराजाचा उल्लेख आहे. त्याने सेउणचंद्र द्वितीयेला आपला महामंडलनाथ म्हटले आहे. कदाचित ह्या मौर्यकुलाला वेसूगिनेच  शासन करून यादवांचे अंकित केले असावे आणि याच पराक्रमाचा उल्लेख हेमाद्री यांनी,” संहृतप्रोद्धमुद्दामधामसामंत संतति: ” या ओळीने केला आहे. यानंतर भिल्लम चतुर्थ याचे नाव येते. त्याला हेमाद्रीने समरांगणातील भीम म्हटले आहे. पण त्याची फारशी माहिती उपलब्ध नाही.सेऊणचंद्र द्वितीय.

सेऊणचंद्र द्वितीय ह्याचे हेमाद्री प्रशासनात तसेच देवळाली ताम्रपट वसई येथील ताम्रपट आणि वाघळी येथील शिलालेख यात उल्लेख सापडतात. देवळाली ताम्रपटावर ग.ह. खरे यांनी, all Indian history Congress च्या १९५५ अधिवेशनात वाचला होता. हा ताम्रपट शके ९७४ चा असून त्यात सेऊणचंद्र द्वितीय याने  “देवलवल्ली” हा गाव आपला दंड नायक “श्रीधर” या दान  दिल्याचा उल्लेख आहे. हा सर्वात आधी उल्लेख आहे.  दुसरा उल्लेख आहे तो वाघळी येथील सिध्देश्वर मंदिरात असलेल्या शिलालेखात, वाघळी हे गाव खानदेशातील चाळीसगाव जवळ पूर्वेस सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि येथील एका शिवालयात शिलालेख कोरलेला आहे. संपादक डॉक्टर कीलहार्न यांनी तो वाचला आहे. यात  महामंडलनाथ सेउणचंद्र ह्याची प्रशस्ती व त्याचे सामंत कूल असलेल्या सौराष्ट्रातील वल्लभीवरून आलेल्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे. वसई ताम्रपट  वसई येथे सापडला, जो डॉक्टर भाऊ दाजी  यांनी बर्जेस यांच्याकडे दिला आणि तो भगवानलाल इंद्रजी यांनी इंडियन ॲंटीक्वेरी यात छापला आहे. सेऊणचंद्र द्वितीय विषयी राज्यप्रशस्तीतील श्लोक,

तत: समरमेदेनीपतिपतंगभंगव्रत:
प्रतापशिखिलंधितस्रिजगंगण: सेऊण:

असा आहे याचा अर्थ सेऊणचंद्राने अनेक राजांचा पराभव केला आणि त्याच्या पराक्रमास जणू तीनही  जगांचे अंगण उणे पडले.

तसेच वसई आणि आईरमदेवाच्या अश्वी ताम्रपटातील श्लोकात भिल्लम चतुर्थ नंतर यादव राजेवंशाला  दुर्दशेचे दिवस आले आणि पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या महावराहाप्रमाणे सेऊणचंद्राने आपल्या राज्याचा  या आपत्तीतून उद्धार केला अशा अर्थाने आहे.

या दुर्दशेला कारणेही तशीच होती, कारण उत्तरेतील राजकारणात परमार विरुद्ध त्रिपुरीचा कर्ण कलचुरी आणि गुजरातचा चालुक्य भीम एकवटले आणि त्यांनी त्याचा पराभव करून थेट धारा नगरी पर्यंत चाल केली. मालव देश कलचुरी अश्वारोहिंनी उडवल्यावर या प्रांतात दक्षिणेत असलेल्या सेऊण प्रदेशावर त्यांची दृष्टी पडली आणि त्यात नाशिक जिल्ह्यातील काही भाग भोजाचा   उत्तराधिकारी यशोवर्मा यांच्या अधिकारात होता. हे त्याच्या कळवण ताम्रपटावरून लक्षात येते. कर्ण कल्चुरीच्या  रीवा शिलालेखात त्याने कुंतलपल्लव जिंकीत कांचीपुरम पर्यंत आपली विजय सेना नेली, असे वर्णन आहे. अर्थात ही अतिशयोक्ती आहे.

दक्षिणेत चालुक्य आणि चोल या़चा संघर्ष पराकोटीला पोचला होता. यात चालुक्यांच्या पराभव झाला आणि याचा फायदा कलचुरींनी घेतला. चालुक्य घराण्यातील भाऊ भाऊ  सोमेश्वर द्वितीय आणि विक्रमादित्य सहावा हे परस्परांविरूध्द ठाकले. सेऊणचंद्राने विक्रमादित्य सहावा याची बाजूला उभा राहिला. याचा उल्लेख हेमाद्री यांनी प्रशस्तीत केला आहे. त्यामुळे साहजिकच सोमेश्वर द्वितीय आहवमल्ल हा यादवावर चिडला. त्याच्या विचपल्ली जिल्हा मेहबूबनगर येथील शिलालेखात त्याने सेऊण राजाचा  पराभव केल्याचा उल्लेख येतो. तो म्हणजे सेऊणचंद्र द्वितीय असावा. तसेच त्याला विक्रमादित्य सहावा यांचेकडून भूप्रदेश ही मिळाला असावा.  नाशिकच्या पूर्वेस वाघळी सारख्या प्रदेशात सापडतात हे विशेष.

वाघळी शिलालेखात मौर्य कुलप्रदीप गोविंदराज हा स्वतःला सेउणचंद्र द्वितीय याचा सामंत म्हणतो, हे कुळ सौराष्ट्र प्रदेशातील वलभी येथून या गावात येऊन खानदेशात स्थायिक झाले होते हे दिसते. ते केव्हा खानदेशात आले हे मात्र कळत नाही,  पण हा शिलालेख महत्त्वाचा वाटतो; यावरून की या शिलालेखात  सापडणारी  मौर्य वंशावळ आणि त्यांची बावीस राजांचा उल्लेख आहे. वंशावळ जी सोम यापासून सुरू होऊन सर्वशूर ते गोविंद राजाची येते. या गोविंदराजाने वाघळी येथे सर्वांग सुंदर शिवालय निर्माण केले आणि त्याचे समोर जलपूर्ण वापी बांधली, या शिलालेखात या वास्तूचे खुप सुंदर वर्णन केले आहे ते असे,

सर्वैषां पार्थिवानां त्रिदिवपतिपुरारोहनि: श्रेणिभूतं,
गोविंदो भूमिपालत्स्वमलनृपगुणैरन्वित: कीर्तिकाम:।।

वापी चकार सुविमलोपलगाढबध्दा,
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा,
शंखोज्वलोर्मिवबहूशुभ्रजलप्रवाहा,
संस्नापिताभीशपनामधुनाशदक्षां।।

गोविंद राजाने देवाचे मंगल, भोग गंध, धूप, दीप तसेच शास्त्र, गीत, नृत्य यांचेसाठी नर्तिकांच्या उपजीविकेसाठी, ब्राम्हणांच्या भोजनासाठी अन्नछत्र चालावे म्हणून आणि वेदाभ्यास विद्वानांचे भोजनासाठी काही भुमी दिली तिचे वर्णन असे आहे, १.  वगलुकम्मत   भुमी:   याचे पूर्वेस  भंभि ( बहुतेक भामेर) व दक्षिणेस देवल क्षेत्र ( देवळाली) पश्चिम व उत्तरेला कारकगांव  याची ओळख पटत नाही. २. वखुली क्षेत्र याचे पूर्व पश्चिम-दक्षिणेला मार्ग कम्मत व सिद्धेश भूमी व उत्तरेला वह ३. वनकुटक भूमी: याचे पूर्व आणि उत्तरेला  नदी आणि दक्षिणेला वह  आणि पश्चिमेला ग्रामभू ४. पुर्वेला कार्पटिकाचे क्षेत्र, दक्षिणेकडे देवाचे शेत, पश्चिमेला ढोरे जाण्याचा मार्ग म्हणजे गोपथोवधी आणि उत्तरेला वटकूप म्हणजे वडाचे झाड आणि बारव. कम्मत हा नदीकाठचे गाळाचे शेतासाठी उपयोगी येणाऱ्या शब्द यादवकालीन अभिलेखात आणि महानुभाव साहित्यात वारंवार दिसतो तर वह किंवा वाही म्हणजे लहान नाला होय. ही दाने  सोळा विद्याभ्यासी पंडितांना गोविंदराजा व त्याची राणी नायकी यांनी दिली. वाघळी शिलालेखात गोविंद राजाची दान देण्याची तारीख २० जुलै १०६९ आणि १३ ऑगस्ट १०६९ ही आहे, या तिन्ही ताम्रशासनावरून सेऊणचंद्राचा काळ म्हणजे इसवी सन १०४८-१०७८ असा आहे. या शिलालेखातून आपल्याला खानदेशातील मांडलिक घराण्यांची म्हणजे खानदेशातील राज्यांची माहिती मिळते, हे मौर्य घराणे  कधी आले ? याबद्दल विशेष चर्चा नाही. परंतु पाटणे या परिसरात असलेले पितळखोरा लेणी आणि मौर्यांच्या पाटलीपुत्र राजधानी काळापासून येथे मौर्य होते का? की गुजरातच्या पाटणा वरून येथील प्रदेश पाटणे म्हणून ओळखला जाऊ लागला?  मौर्यांच्या राजधानी वरून पाटणे नाव असणे, यावरून या प्रदेशात मौर्य काळापासूनच मौर्य वंश लोक राहात असावेत असा अंदाज येऊ शकतो. हे मौर्य म्हणजे कोण? खानदेशातील मुळ लोक हे कोळी आणि भिल्ल होते यावरून साहजिकच माधांता हा जो मुळ पुरुष सांगितला जातो, याची सविस्तर चर्चा खानदेशाचा प्राचीन काळ यात करू या.

चर्चा –

सिध्देश्वर मंदिर  जे गोविंद राजाने  १०६९ मधील बांधले आहे. मंदीरातील शिलालेखातून कळते.  पत्नी मौर्य मांडलीक महामंडलनाथ सेऊणचंद्र यादव यांची मुलगी आहे. यांनी सभामंडप बांधण्यासाठी तर दान दिले आहे. तिथल्या वितानावर असलेला वेणूगोपाळ हा सील आणि नाण्यांवरही दिसतो. असाच वेणूगोपाळ हा लोणार येथील दैत्य सुदन मंदिरातील छतावर आहे.  ए.व्ही. नाईक यांनी ते शिलालेख वाचला आहे. जे सिध्देश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. (व्ही, व्ही, मिराशी.) वाघळी येथील सुर्यवंशी कुटुंब सिध्दनाथ नायकी विहिर प्रपा मौर्य राज्यांच्या नंतर बृहद्रथ घराणे सत्तेवर आले का? वाघळी लहान राज्यांतील गोविंदराजा निकुंभ राजा आहे का?  नाशिक जवळ सापडलेली नाणी जी चौथ्या शतकातील उत्तरार्थात आहेत. यावरून अहिर राजा मानसनृप ( Bombay gazetteer page 240) पुराणांमध्ये अहिर राज्य हे तापी आणि देवगड मध्ये आहे. हे पण अहिर आहेत का?

महामंडलेश्वर सेऊण याने मंदिर इ. स. १०६९ मध्ये बांधले असा शिलालेखात उल्लेख आहे. यादव राजा सेऊण याचा मौर्य मांडलिक गोविंद आणि त्याच्या पत्नीने हे मंदिर उभारले. खूप पडझड झाली आहे. तरीही मंडप सोडल्यास बाह्य भाग कळत नाही. मंडपाच्या तीनही बाजूंनी प्रवेशद्वार असावे. चांगदेव आणि चारठाणे येथील मंदिरासारखे असू शकेल. दुसऱ्या मुखमंडपाच्या विरूद्ध बाजूला गाभारा असणार. मंडपातील खांबावर दोन प्रकारचे शिर्ष आहे. मधल्या स्तंभांच्या शिर्षावर किचक, तर बाजूच्या खांबावर नागशीर्ष दिसते. मंडपाच्या छतावर कृष्ण आणि गोपींचे शिल्प आहे.

सेऊणचंद्र द्वितीय याचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात असलेल्या सिध्देश्वर मंदिर जे आता महानुभाव पंथाचे मठ आहे. तिथल्या शिलालेखाने बराच प्रकाश पडतो. याच मंदिराच्या आवारात चक्रधरस्वामींचा निवास घडला होता. लिळाचरित्रात वागुळीए वयति अशी नोंद आहे. लेखाचे वर्णन केले तर तो बराच मोठा ४२ ओळींचा आहे. भाषा संस्कृत लिपी दाक्षिणात्य वळणाची नागरी आहे. लेख पुर्ण पद्यात आहे. लेखाचे संपादन किलहॉर्न यांनी केले आहे. काळ इ. स. १०८० आहे. लेखात महामंडलनाथ सेऊणचंद्र याचा निर्देश आहे. हा भिल्लम चतुर्थ याचा पुत्र सेऊणचंद्र द्वितीय इ.स. १०५०-१०८० हा होय. याच नृपतीचा वसई ताम्रपट प्रसिध्द आहे तो इ. स. १०६९ मधील आहे. या लेखात सामंत गोविंदराज याचे वर्णन आणि वीस पुर्वजांची यादी येते. ती अशी, सोम, मांधात, कीकट, तक्षक, भीम, सर्वशूर, गोविंद राज प्रथम, साध्वासिक प्रथम, झंझराज, देवानासिन्, मुंज, पद्माकर, वापैय, वालपराज, साध्वासिक द्वितीय, शांतीराज, प्रवरसुकर, भाईलेक, भीमराज, गोविंदराज द्वितीय ही होय.

याच गोविंदराजाने हे मंदिर निर्माण केले आणि वापीही बांधली शिलालेखात वास्तूचे वर्णन सुंदर रितीने केले आहे.

वापी चकार सुविमल्लोपलगाढबध्दा।
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा।
शंखोज्वलोर्म्मिबहुशुभ्रजलप्रवाह।
संस्थापिताभिशमनामघनाश दक्षां।

गोविंद राजने हे दान त्याची राणी राजाई नायकी हीच्या सोबतीने दिली. यात संगमी आणि मधुवाटीका ही गावे, देवपुजेला मला, दिवाबत्ती साठी लाकडी  तेलघाणे, वाडा, इमान शेत भोग आणि गच्छकांना भूमी ब्राम्हण आणि विद्याभ्यास करण्यासाठी अन्नछत्र होय.  भुमीदानाचा तपशील दिला आहे. दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणजे महानुभावांचे कृष्ण मंदिर, जे सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. महानुभव यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी तेथे कृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि ते मंदिर कृष्ण मंदिर किंवा महानुभव मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या मोठ्या दगडांवर दुर्वाच्च अशी संस्कृत अक्षरे आहेत. मंदिराजवळच एक प्राचीन विहीर आहे. मंदिर सुमारे साडेचारशे वर्षापासून महानुभव यांच्या ताब्यात आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर यादव नृपती सेउनचंद्र द्वितीय याचा 11 व्या शतकातील देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहे. त्याची तिथी आषाढ अमावस्या सूर्यग्रहण म्हणजे साधारण इसवीसनाच्या १०६९ ही आहे.

ह्या लेखाचा सारांश खालील प्रमाणे आहे. गोविंदराजा मौर्य यादव नृपती येऊन याचा मांडलिक याने हा लेख असलेले मंदीर बांधले आणि त्यास बऱ्याच देणग्या दिल्या. शिवाय यादव नृपती सेऊणचंद्र याने सिद्धेश्वराच्या मंदीराला संगमी व मधुवाटिका ही गावे दान दिले. हा लेख तीन दगडावर तीन भागात आहे. तथापि तिन्ही भाग मिळून एकच लेख असल्याचे स्पष्ट आहे. या लेखात माधांता, यादवांचा मांडलिक मौर्य कुळाचा मूळपुरुष तसेच मौर्य वंशावळीतील किकट, तक्षक, भीम, सर्व शूर, गोविंद, साध्वासिक, झंझ, देवहस्ती, मुंज, पद्माकर, बप्पैय, बालपराज, साध्यसिक, शांतीराज,  प्रवरसुकर, भैलेक,  भीमराज, गोविंदराज, म्हणजे या मंदिर बांधणारा आणि दान देणारा होय तर नायकी जी मंदिर बांधण्यात सहभागी झालेली गोविंद राजाची राणी, सेऊणचंद्रद्वितीय  दान देणारा देवगिरीचा यादव नृपती  या व्यक्तींनामांचा  आणि वल्लभी सौराष्ट्रातील गाव संगमी मधू वाटिका आणि कारकग्राम या ग्राम नावांचा समावेश आहे.

सध्या हे मंदिर भग्न अवस्थेत असल्यामुळे मूळ विन्यासाची कल्पना येत नाही. तीन बाजूला कक्षासन असलेल्या मंडपाचा मंदिराचा मंडप वेगळा मोकळा वाटतो. मंदिराची खास विशेषता येथील स्तंभांची दोन प्रकारे शिर्षे होत. मंदिरातील मध्यभागी असलेल्या चार स्तंभांची सशिर्ष दोन आमलकात विभागले आहेत. वरच्या बाजूला चौरसाकृती पट्टिकांची योजना केली असून चारही कोपऱ्यांवर वेल सरी आहेत. प्रतीक आमलकात किचकाकृती  म्हणजे भारवाहक यक्ष कोरलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे स्तंभ महाराष्ट्रातील चारठाणा येथील भवानी मंदिरात जे मुक्ताईनगरच्या येथील मंदिरात दिसतात. त्या मंदिराचे गर्भगृह आणि सरी कोरलेल्या आहेत. त्यावर गोलाकृती नागफण्यांचे काठ असलेल्या स्तंभाधार सरी कोरलेल्या आहेत.

सर्वात विशेष म्हणजे या मंदिराचे छत नाविन्यपूर्ण आणि कलात्मक आहे. अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्यातील देवळाली तसेच लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात गोलाकार छतामध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवत असून त्याभोवती नृत्यतल्लीन आठ गोपिका दाखवलेल्या आहे. कृष्ण मंदिराला लागूनच एक भुयार आहे.

वाघळी गावात एका ओट्यावर गणेशाची मूर्ती असून कुठल्यातरी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा दगडी महिरपीचा भाग  आहे, ती म्हणजे गणेश मंदिराचा भाग असावा असे लोक म्हणतात. यादव काळातील स्थानिक राजे शिव मंदिरे बांधण्यास उत्तेजन देत असे दिसते. संस्कृत भाषा तेव्हा प्रचलित होती.

सिध्देश्वर मंदिर, वाघळी

  • संदर्भ: शं. गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख
  • ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव
  • भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन.

@ सरला

Leave a Comment