महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,539

सेऊणचंद्र द्वितीय २ | यादवकालीन खानदेश भाग ८

Views: 2506
3 Min Read

सेऊणचंद्र द्वितीय २ | यादवकालीन खानदेश भाग ८ –

चालुक्य साम्राज्य खिळखिळी होत असल्याच्या अवस्थेत असतांना कल्याणी नगराचा अधिपत्य मिळवण्याचा प्रयत्न होयसाळ आणि यादव या दोघांनी केला आणि त्यांच्या सैन्यात एक निकराची झुंज सोराटूर या  ठिकाणी झाली या युद्धात यादवांचा पराभव झाला आणि म्हणूनच होयसाळ नृपती द्वितीय वीरबल्लाळदेव द्वितीय याच्या आणि त्याच्या वंशजांच्या शिलालेखातून या युद्धाची लांबलचक अतिशयोक्त वर्णने मिळतात. (संदर्भ: ओ.पी. वर्मा यादव अँड देअर टाईम)(सेऊणचंद्र द्वितीय २)

द्वितीय सेऊणचंद्रानंतर हेमाद्री आईरमदेव याचे नाव येते. त्याच्या राज्यकाळातील अश्वी ताम्रपट सापडला आहे. नाशिक जवळील गोंदेश्वर मंदिराजवळच ऐश्वरेश्वर मंदिर आहे जे आयेश्वर म्हणून ओळखले जाते. ते आईरमदेव याने बांधले असा कयास आहे. आईरमदेवाच्या वर्णनासाठी हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत आणि अश्वी ताम्रपटात जे वर्णन येते, त्यात पहिल्या श्लोकाचा अर्थ असा की जे राज्य चालुक्य राजा भुवनैकमल  याला जिंकता आले नाही ते आयरमदेवाने जिंकले आणि तिला सेवावृत्तीने देऊन टाकले. यात स्पष्ट होते की सोमेश्वर द्वितीय या चालुक्य राजा आणि विक्रमादित्य सहावा यांच्या यादवी युद्धाच्या वेळेस आयरमदेवाने विक्रमादित्य सहाव्या याच्या बाजूने भाग घेतलेला दिसतो. तसेच  या ताम्रपटतील श्रीनगर २५०० या प्रदेशातील संगमनेर ८४ ह्या भागात असलेले कोकणेग्राम हे ब्राह्मणांना दान दिले. या विषयी लेख आहे. यावेळी राजा नर्मदापूर येथे नामक गावात राहत होता हे लक्षात येते. सिन्नर येथील आयरेश्वर हे देवालय आयरमदेवाने बांधले. आयरमेश्वर याचा आयेश्वर असा अपभ्रंश होत ऐश्वरेश्वर असा झाला असे म्हणता येते.

आयेश्वर –

सभामंडपातले स्तंभ नक्षीदार. सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात. शालभंजिका, गंगा, कर्पुरसुंदरी,बलराम, विष्णू द्वारपाल, स्तंभ, युगल स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात.

गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते, नटराज शिव. मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत,  मधेच शरभादिल प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय. ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही कहई शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा बाह्यभाग, मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्‍यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.

मंदिराचा पार्श्वभाग अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर, स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच. हा यक्ष एका हाताने तो भिंत तोलून धरतोय त्याचे वेळी तो वाहनावर चाबूकही उगारतोय. साधक आणि मातृका, मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही. हे इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे. सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची सभामंडपाच्या स्तंभांवरच शिल्पे येथे आढळतात.

संदर्भ:
शं. गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख.
ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव.
भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन.

@ सरला भिरूड

Leave a Comment