ज्ञानेश्वरीतील षड्भुज गणेश –
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सहा भुजांच्या गणेशाचे वर्णन आलेले आहे. षड् दर्शनांचे रूपक म्हणून या ओव्या आहेत असे मानल्या जायचे. पण गंगाधर मोरजे यांनी संशोधन पत्रिकेत एक लेख लिहून हे केवळ रूपक नसून अशी गणेश मूर्ती प्रत्यक्ष पाहूनच ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहील्या असणार असे प्रतिपादन केले. यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर असलेली अशी गणेश मूर्ती कामाची नसून प्रत्यक्ष महाराष्ट्रातच शोध घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने एक गणेश मूर्ती मोरजे यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली (संशोधन पत्रिका, इ.स. १९७२). परांडा किल्ल्यात षड्भुज गणेश ही मूर्ती सध्या स्थित आहे. ती नेमकी कुठली आहे सांगता येत नाही.
ज्ञानेश्वरीतील ओव्या अशा आहेत
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हाती ।।१०।।
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
आता या वर्णनाप्रमाणे परांडा किल्ल्यातील गणेश मूर्तीकडे आपण बघितल्यास हे वर्णन तिथे चपखल बसते. उजवा वरचा हात खंडित आहे. उजव्या खालच्या हातात भग्न दंत आहे. डाव्या वरच्या हातात कमळ आहे. डाव्या खालच्या हातात मोदकपात्र आहे.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे कमळ सांख्य दर्शनाचे प्रतिक, खंडित दात बौद्ध मताचे प्रतिक, न्याय दर्शनासाठी हातात परशु आहे (हा हात खंडित आहे), सिद्धांत भेदासाठी अंकुश आहे, उत्तर मीमांसेसाठी रसाळ मोदक आहेत, पूर्व मिमांसेसाठी वरद मुद्रा आहे (हा हातही खंडित आहे). मूर्ती १ मीटर २४ सेमी इतकी मोठी आहे.
नृत्य गणेश म्हणून स्थानिकांना परिचित असलेली परांडा किल्ल्यातील ही गणेश मूर्ती इतकी महत्वाची आणि मोलाची आहे. महाराष्ट्रात सहा हातांची गणेश मूर्ती अजून कुठे असल्यास जरूर कळवा. संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. होट्टलच्या नृत्य गणेशाला हे वर्णन जास्त लागु पडते कारण त्याचा अभय मुद्रेतील हात स्पष्ट दिसतो. पण दूसरी अडचण हातातील पद्माची येते. हा गणेशही सहा हातांचा आहे. पण बाकी वर्णन जूळत नाही.
परांडा किल्ल्यात या मूर्ती ठेवल्या त्या दालनात फारसे कुणी जात नाही. या किल्ल्याला आम्ही भेट दिली तेंव्हा या दालनात आवर्जून गेलो. या षड्भुज नृत्य गणेशाचे छायाचित्र घेतले. या लेखासाठी वापरलेले छायाचित्र मात्र किल्ल्याचा अभ्यास ज्यांनी सविस्तर केलेला आहे त्या अजय माळी या मित्राने पाठवले आहे. संदर्भ सौजन्य: संदीप पेडगांवकर, गणेश वाचनालय, परभणी.
ज्ञानेश्वरी भावदर्शन या शंकर महाराज खंदारकर यांच्या ग्रंथातून ओव्यांचे अर्थ घेतले आहेत.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद