स्वराज्यसंकल्पक श्री शहाजी महाराज भोसले!!
(पुस्तक लेखमाला क्रमांक २२)
अखंड हिंदुस्थानात सुमारे तीनशे वर्षे जुलूम अत्याचार करून ठाण मांडून बसलेल्या परदेशीय इस्लामी सत्तेला उलथवून टाकून स्वतःचे स्वराज्य उभे करण्याचे आणि दिल्ली पर्यंत धडक मारून या हिंदुस्थानाची सीमा अटकेपार नेण्याचे कसब दाखविले ते या मराठी मातीतील शूर वीरांनी. आणि हे स्फुल्लिंग त्यांच्याच चेतवण्याचे काम केले हे भोसले घराण्यातील वीरांनी!! महाराज शहाजी राजे यांनी “पाया” घडविला, छत्रपती शिवरायांनी त्यावर “स्वराज्याचे मंदिर” सजविले आणि छत्रपती संभाजी राजेंनी त्यावर “कळस” वसविला. शिवचरित्राचा अभ्यास करताना स्वराज्यसंकल्पक श्री शहाजी महाराज भोसले आणि आऊसाहेब जिजाऊ साहेब भोसले यांच्या संदर्भाशिवाय आणि अभ्यासाशिवाय हे “शिवचरित्र” अपूर्णच आहे.
शहाजी महाराज यांचा जन्म १८ मार्च १५९४ या वर्षी वेरूळ इथे झाला.डिसेंबर १६०५ मध्ये त्यांचा विवाह सिंदखेडच्या श्री लखुजीराव जाधव यांची कन्या सौ जिजाबाई साहेब यांच्याशी जाहला.शहाजी महाराज यांना एकूण दोन मुले थोरले संभाजी यांचा जन्म १६२४ आणि धाकटे शिवराय(जन्म -१६३०)! थोरले संभाजी हे नेहमीच शहाजी महाराज यांच्या सोबत कर्नाटक बंगळूर भागात कार्यरत असल्याचे दिसते. याउलट धाकटे शिवाजी महाराज हे पुणे आणि दक्खन प्रांतात कार्यरत होते. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून इथल्या रयतेच्या मनातले स्वराज्य आणण्याच्या संकल्पनेला शहाजी महाराज कारणीभूत असल्याचे दिसते. जिजाऊ साहेब यांच्याशी ते नेहमीच सल्लामसलत करून बाल शिवाजींच्या मनात स्वातंत्र्य कसे मिळविता येईल याच्याच विचारत ने नेहमीच असत. शहाजींची संस्कृती थोर होती.त्यांच्या मनावर लहानपणापासून झालेले संस्कार त्यांना हिंदवी स्वराज्याच्या उद्दिष्टकडेच नेत असत.शहाजी महाराज हे मराठी, फारसी,संस्कृत आणि कानडी अशा चारही भाषा बोलू तसेच लिहू शकत होते.दानधर्मचे बाळकडू तर त्यांना जन्मल्यापासूनच मिळाले होते.देव आणि देवळांना जसे दानधर्म केला तसेच आपले सण ही मोठ्या औंदर्याने साजरे केले.त्यांचे पिता श्री मालोजीराजे यांनी सुरू केलेले शिखर शिंगणापूर येथील तलावाचे काम शहाजी महाराजांनी बांधून पूर्ण केले. हा सर्व त्यांचा आचारधर्म त्यांच्या श्रेष्ठ विद्वता आणि सतप्रवृत्तीचेच द्योतक आहे.
हिंदवी स्वराज्य उभारणी साठी त्यांचा ही छुपा सहभाग असावा असे काही इतिहासकारांचे यांचे मत आहे. त्यांनी त्या काळाच्या नुसार आदिलशाही, निजामशाही यांच्यासोबतही अनेक स्वाऱ्या आणि लढाया केलेल्या होत्या. आदिलशाही कडून १६४६ ला शहाजी राजांना “महाराज फर्जंद शहाजी भोसले” हा किताब दिला गेला होता.
२१ जानेवारी १६६४ ला शहाजी महाराज यांचा होदेगिरी इथे शिकारीवरून परतताना मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.
शहाजी महाराज यांच्या विषयी च्या या लढाया आणि त्यांचे कर्तृत्व यावर महत्वाची माहिती आणि सखोल माहिती मिळते ती त्यांच्या समकालीन असणाऱ्या कवी जयराम पिंडे यांच्या “राधामाधवविलासचंपू” या संस्कृत ग्रंथात.यात शहाजी महाराज यांनी भोसले कुळ, तसेच त्यांनी बंगळूर प्रांतात केलेल्या लोक विधायक कार्यांची अत्यंत योग्य माहिती आहे. तसेच त्या भागात त्यांनी केलेल्या करार, तहनामे यांचीही अत्यंत महत्वाची माहिती आपणास या ग्रंथात अभ्यासायला मिळते.
पण शहाजी महाराज यांच्यावर सखोल चरित्र लिहिलंय ते “श्री वा. सी.बेंद्रे” यांनी.या विचिकित्सक चरित्रात त्यांनी अनेक अप्रसिद्ध प्रकरणे हाताळली आहेत. तसेच शहाजी महाराज , जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखलेल्या हिंदवी स्वराज्याच्या आराखड्याची माहिती दिलेली आहे.आदिलशाही,निजामशाही,सासरे लखुजी जाधवराव,रण दुल्लाखान, मलिक अंबर ,तसेच मोगल बादशहा यांच्या विषयीची अनेक सखोल माहिती आपल्याला या अनमोल ग्रंथातून वाचायला मिळते.बेंद्रे सर यांच्या म्हणण्यानुसार शहाजी महाराज यांनी मोठमोठे मावळे सरदार गोळा करून त्यांच्यजवळून स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या कार्यात मदत करायची आज्ञा केली होती. त्यांना आणाभाका घेऊन शिवरायांकडे रवाना केले होते.हीच सरदार मंडळी शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या १२-१४ वर्ष्यात उपयोगात आलीत.
“शहाजी महाराज यांच्याविषयी माझ्या वाचनात आलेले हे एकमेव सखोल आणि अभ्यासात्मक असलेले एकमेव चरित्र आहे!!”
त्यांनतर अजून व्यवस्थित माहिती “श्रीशिवछत्रपतींची ९१ कलमी बखर” यात आलेली आहे. या बखरीत शहाजी महाराज आणि सिद्धी सैफ याच्या सोबत विजापूर ला झालेल्या तुंबळ युद्धाचे सविस्तर वर्णन आहे. तसेच परेंडा वेढा, म्हैसूर ची लढाई आणि जिंकलेला प्रदेश, दौलताबाद ची लूट यांचीही अधिक माहिती आहे.यात दिलेली “शहाजींची शकावली” ही अतिशय महत्वाची आहे.
तसेच “सप्तप्रकारणात्मक चरित्र” आणि “मराठी दफ्तर” (शेडगावकर बखर) या बखरींमध्ये शहाजी महाराज यांच्या विषयी कनकगीरी युद्ध आणि खंडागळे हत्ती प्रकरण याची अजून माहिती उद्घोदित केलली आहे.
यावरूनच आपल्या लक्षात येते की हे भोसले घराणे अतिशय शूर, पराक्रमी असलेले आणि या मराठी मातीला लाभलेले वरदान आहे. स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ करून मराठा दिल्लीपती ला ही साम्राज्य विस्तार करण्यासाठी यांनी अतोनात परिश्रम घेतले. ते साकारूनही दाखविलेच.शहाजी महाराजांचे चरित्र अनुभवताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की शहाजी राजे हे स्वतंत्र बाण्याचे आणि स्वाभिमानी वृत्तीचे महापुरुष होते, शहाजी महाराजांनी तिन्ही शाह्यांमध्ये सैन्याचे नेतृत्व केले, त्यांना ठाऊक होते के हे मुघलशाहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि निजामशहा यांच्या सैन्यात जवळ जवळ पाऊण सैन्य हे मराठी सैन्य होते, ते आपल्या साम्राज्य विस्तारा साठी ह्या मराठी सरदारांना बढती चे आमिष दाखवून एकमेकांनाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करीत! त्यांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. असे म्हटल्यास त्यात वावगे ते काय?
शहाजी महाराज यांच्या चरित्रांचा अभ्यास करताना मला हे महत्वाचे संदर्भ ग्रंथ इथे आपणासाठी उधरोत करावेसे वाटतात.आपणही अजून काही महत्वाचे संदर्भ ग्रंथ असल्यास त्यातून माहिती मिळवून अभ्यास करत राहावे हाच या लेखमागील उद्देश.
पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या संबंधित असलेल्या महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!
बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.
किरण शेलार.