स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजांची दिनचर्या –
स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजांची दिनचर्या कशी होती याबाबत समकालीन जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात आपल्या शब्दचित्राने रंगविलेली आहे . यावरून आपणास शहाजी महाराज यांना स्वत:च्या धर्माविषयी व धार्मिक रूढी , देवदेवता यांविषयी किती अभिमानयुक्त आदर होता त्याचा प्रत्यय येतो. वेद , संस्कृत भाषा , होम यज्ञ , शुभशकून यांच्याविषयीचा आदर त्यांच्या मनात होता . शहाजी महाराजांचे ऐश्वर्य व राजेशाही थाट हा एखाद्या सार्वभौम राजासारखा असे. राजसभेत अनेक नामवंत कवी , विद्वान ब्राम्हण , संस्थानिक , सरदार , परराज्यांचे वकील सल्लामसलतीसाठी हजर असत.
जगदीश वीरंचकू पुछत है कहो शिष्टी रची रखे कोण कहां /
कर जेरि कही जयराम विरंच्ये तिरीलोक जहां के तहां //
ससी वो रवि पूरब पश्चिम लों तुम सोय रहो सिरसिंधू महा /
अरु उत्तर दछन रछन को इत साहजु है उत साहिजहां //
भावार्थ :- परमेश्वर ब्रम्हदेवाला विचारतात कि तु हि सृष्टी रचीलीस तिचे रक्षण करण्यासाठी कोणास ठेवले आहेस ते तु मला सांग. तेंव्हा ब्रम्हदेव सांगतात कि पूर्वेचा रक्षक रवि ( सूर्य ) व पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे . तसेच उत्तरेचा लोकपाल शहाजहान पातशहा केला आहे व दक्षिणेचा रक्षक शाहजीमहाराज केले आहेत .
शहाजी महाराजांची दिनचर्या पुढीलप्रमाणे :-
पहाटेस शेजघराजवळ बाळसंतोष , कुडबुडे जोशी व शाहीरलोक भूपाळ्या वैगरेंचे मधुरलाप काढून राजाला सुखशय्येवरून उठवीत . इतक्यात विश्वनाथभट्ट उच्चस्वराने प्रात:स्मरण संस्कृत भाषेत करीत. कित्येक ब्राम्हण पुण्याहवाचनाचे म्हणजे राजाला सुखाचा दिवस जावो अश्या अर्थाचे मंत्र म्हणत. कित्येक विप्र ॐकारपूर्वक वेदपठन करीत. कित्येक स्वस्तिसाम्राज्यादी मंत्रांनी आशीर्वाद देत व कित्येक अग्निहोत्री वषटकारापर्णात गुंतलेले असत . मंत्रपठनाच्या भूपाळ्यांच्या व प्रात:स्मरणाच्या या धांदलीत राजा शेजे वरून उठून अंगणात येऊन आकाशाकडे पाहून अरुंधती , शची , देवसेना व आकाशगंगा इत्यादी तारांगणावर नजर फेकून आणि शिव , विष्णु , स्कंद उर्फ खंडोबा , ब्रम्हदेव ,लोकपाल , इंद्रादी देव , होमशाळेतील अग्नी इत्यादींचे दर्शन घेऊन दिशावलोकन करीत . ह्याच सुमारास जंगम शंख फुंकीत , गुरव शिंग वाजवीत व घडशी चौघडा सुरु करीत . ह्या मंगलध्वनींच्या निनादात तुफान ऐरावत , सवत्स गाय , पुत्रिणी ब्राम्हणी , वर्धमान मानुष म्हणजे विदुषक , ठेंगू ब्राम्हण व पाण्यातून नुकताच बाहेर निघालेला वराह हे शुभचिन्हक प्राणी राजापुढून जात.
नंतर वाड्याच्या समोरील पटांगणात हजार पाचशे घोडेस्वार किंवा पाईक कवायत करीत . त्यांची परेड दिल्लीदरवाजाच्याबाहेर येऊन पाहून रथ, पालख्या , शिबिका वैगरे वाहनांचे अवलोकन राजा करी . इतक्यात दरवेशी एखादा दुसरा सिंहाचा बच्चा व थट्टी कामगार एखादा माजलेला पोळ राजापुढे नाचत बागडत आणीत . नंतर हंस , चाप , मत्स्य यांचे शुभशकून घेत व दरवाजावरील तोरणाकडे पाहत वाड्यापाठी मागील अश्वत्थ, औदुंबर वैगरे शुभवृश व पारीजातकादी पुष्पवृक्ष यांच्या छायेखालुन राजा जाई . शेवटी दक्षिणावर्त शंखातल्या तीर्थांचा नेत्रांना स्पर्श करून व वेळूच्या लंबायमान दांड्याच्या अग्रावर लटकत व फडफडत असलेल्या जरीपटक्याकडे सकौतुक दृष्टीक्षेप चढवून राजा नाडीपरीक्षणार्थ आपला हात राजवैद्यांपुढे करी. सेवेचे एक ब्राम्हण एका हातात तेलाने भरलेली रुप्याची परात व एका हातात तुपाने भरलेली सोन्याची परात राजापुढे आणी. त्यात मुखाचे प्रतिबिंब पाहून व अष्टोदश मंगलांचा शुभशकून घेऊन राजा स्नानोपहारादि सेवन केल्यावर सभामंडपात प्रवेश करी. सभामंडपाला उर्फ दरबाराला ‘नवगजी’ असे नाव असे.
त्या नवगर्जीत राजे, उपराजे, संस्थानिक , परराष्टीय वकील व सरदार आधीच येऊन हजर असत. पंडित , कवी , शास्त्री , वैदिक इत्यादी सरस्वती पुत्रांचा हि समुदाय राजदर्शनाची उत्कठेने वाट पाहत असे. नंतर भालदारांच्या ललकाऱ्यात व जनसंमर्दामधून वाट काढीत येणाऱ्या चोपदारांच्या ठाणकाऱ्यात महाराज हातातील तरवारीचे अग्र जमिनीला टेकीत टेकीत ( कारण शहाजी महाराजांचे वय ह्या काळी साठीच्या पुढे गेले होते ) सभास्थानांत गंभीर रुबाबाने प्रवेश करून सिंहासनरूढ होत. हा प्रात:कालीन कार्यक्रम झाला. भोजनोत्तर दोन प्रहरानंतर हि कधीकधी स्वारी शिकार नसल्यास पंडित व कारभारी यांच्या सभेत बसून सायंकाळपावेतो राजकारण , ब्रम्ह्चर्या , काव्य – विनोद , दानधर्म , पंगुपरामर्श न्यायमनसुबी , जेठीमल्लयुद्धे इत्यादी लघु किवा जड व्यवहारात महाराज गुंतलेले असत. सायंकर्म आटोपल्यावर उपहारोत्तर खलबतखान्यात शेलक्या मुत्सद्यांच्या समवेत गुप्त कारवाई चाले.
शौर्याने पृथापुत्र अर्जुनासारखे , दातृत्वाने विक्रमादित्यासारखे व ज्ञातृत्वाने भोजराजासारखे शहाजीराजांचे दर्शन आपणास घडते. अशी हि शहाजी महाराजांची, शहाजीराजांची दिनचर्या जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात आपल्या शब्दचित्राने रंगविलेली आहे .
संदर्भ :- जयराम पिंडयेकृत राधामाधवविलासचंपू :- वि.का.राजवाडे
छायाचित्र :- साभार विकिपीडिया.
नागेश सावंत