राजनीतिज्ञ शहाजी महाराज –
शककर्ते, स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री व राजमाता जिजाबाई यांचे सौभाग्य म्हणजेच राजे शहाजीमहाराज होय. स्वतंत्र राज्य संकल्पनेचा प्रयत्न यशस्वी करून हिंदवी स्वराज्याचा व नैतिक राजनीतिचा पाया घालणारे शहाजी महाराज. त्याकाळी शे-दोनशे वर्षांच्या इतिहासात *मोगल, आदिलशहा व कुतूबशहा या महाभयंकर शत्रूंच्या विरूद्व बंड पुकारण्याचे अचाट धाडस दाखविणारे, संपूर्ण हिंदूस्थानातील एकमेव धैर्यवान सेनानी, स्वातंत्र्याच्या ध्येयाने पेटून उठलेला पहिला राष्ट्रवीर म्हणजेच राजनीतिज्ञ शहाजी महाराज.
संस्कृत पंडीत, काव्यकार व मोठ्या मनाचा रसिक राजा. तसेच मराठी, संस्कृत, कन्नड़, फारसी, अरबी, तेलगू व तमिळ आदि भाषांचे उत्तम ज्ञान असणारा महाराजा म्हणजे शहाजी महाराज. बाणेदार विचारांची राष्ट्रभक्त पत्नी जिजाबाई सुपुत्र शिवाजी आणि संभाजी यांसह स्वतःला हिंदवीस्वराज्य निर्मितीच्या कार्यात झोकून देऊन एक नवी सृष्टी उभारण्यासाठी झटणारे हे आख्खे कुटुंब म्हणजे जगाच्या इतिहासातील एक आदर्श व दुर्मीळ असे उदाहरण म्हणावे लागेल.
*राजा हा सत्तेपेक्षा सत्याचा पुरस्कार करणारा असावा लागतो. त्यासाठी तो स्वत: चारित्र्यवान व स्वत:पेक्षा रयतेचा, आपल्या सैन्य-दलाचाही विचार करणारा असावा लागतो. तसेच तो सुशील आणि वीर असावा लागतो आणि तो दातृत्व जपणाराही असावा. तेव्हाच त्याच्याकडून राजधर्म पाळला जातो. आणि असा राजधर्म पाळणारा राजा म्हणजेच “राजनीतिज्ञ शहाजी महाराज” होय.*- राजेंद्र घाडगे.
खरं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजीमहाराजांनी केली. असे असता, जिजाबाई व बाल शिवबास पुण्यास पाठवून शहाजीराजांनी कर्नाटकांत राहून काय केले ? की ते तिकडे केवळ चैन, विलासात दंग होते? असा प्रश्न काशीच्या पंडितांनी कवींद्र परमानंद यास विचारला होता. तेव्हा परमानंदाने शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्वत: लिहिलेले “शिवभारत” हे काव्य त्या पंडिताना ऐकविले. तो म्हणाला:
*”शहाजीराजांनी षाडगुण्याचा प्रयोग यशस्वी करून,आपल्या विश्वासातील साथीदारांसोबत सल्लामसलत करून कर्नाटकाचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.”*
परमानंद पुढे लिहितो:
*”बेदनूरचा महान तेजस्वी वीरभद्र, वेलूरचा प्रसिद्ध राजा केंगनायक, कावेरीपट्टणचा महाबाहू जगददेव, इक्केरीचा केंगनायक, तंजीचा प्रौढ वेंकट नाईक, मदुरेचा गर्विष्ठ त्रिमल नाईक पिलंगुडचा राजा उध्दट वेंकटप्पा, विजयनगरचा श्रीरंगराजा, होस्पेटचा तम्मगौडा या सर्वांना शहाजीराजांनी आपल्या अंमलाखाली / अंकित केले. आणि रात्रंदिवस युध्द करून अनेक वीरांचा संहार करून किपगौंडाकडून बेंगलोर हे रमणीय शहर जिंकून घेतले! बेंगलोर ही शहाजीमहाराजांची वैभवशाली व संपन्न राजधानी होती. त्या नगरीत वास करणारा इंद्रासमान नृपश्रेष्ठ शहाजीराजा आपल्या परिजनांसह नानाप्रकारचा आनंद अनुभवीत असे.” पुढे बेंगलाेरचा स्वतंत्र कारभार ज्येष्ठ सुपुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू ) जे सर्व लढायांमध्ये सामील झाला होता यांच्या ताब्यात दिला.*
शहाजी महाराजांच्या पदरी असलेला कवी जयराम पिंड्ये हा आपल्या “राधा-माधव विलासचंपू” या काव्यग्रंथात लिहितो:
*”संभाजीराजा हा योवराज्याभिषेक- पवित्रगात्रो राजपुत्र शहाजीराजांची सर्व कामे पार पाडीत होता!* म्हणजेच स्वतंत्र राज्याचे शहाजीराजांचे स्वप्न दूरवर कर्नाटकात आकारास आले होते! थोरले संभाजीराजे संस्कृत पंडीत होते. आणि ते स्वतः विद्वान पंडितांना समस्या घालीत होते वा त्या पूर्ण करीत होते !
शहाजीराजांचा हा भीमपराक्रम पाहून बादशहाने शहाजीराजांना *रूक्न-दौलतुल* (आदिलशाहीच्या दौलतीचे आधारस्तंभ) हा किताब देऊन गौरविले. शहाजीराजांचे वार्षिक उत्पन्न 64 लाख होन म्हणजे दोन-अडीच कोटींचे आसपास होते, असे पोर्तुगीज अधिकारी लिहितो.
इतके साम्राज्य शहाजीराजांनी उभे केले, पराक्रम गाजविला आणि इकडे महाराष्ट्र देशी जिजाऊ व शिवबाने स्वराज्य उभारणी सुरू केली. तेव्हा आदिलशाही सरदार बिथरले आणि त्यांनी कपटनीतिने शहाजीराजांना कैद केले. बेंगलूर व स्वराज्यावर फौजा पाठविल्या. मात्र शिवाजी व संभाजींनी त्यांची धुळधाण उडविली! त्यामुळे व जिजाऊंच्या मुत्सद्दी खेळीने शहाजीराजांची सुटका करणे आदिलशहास भाग पडले. पुढेही आदिलशहावर अप्रत्यक्ष वचक ठेवणे शहाजीराजांनी सुरूच ठेवले.
उत्तरेकडील प्रतिभावंत कवी सुबोध्दिराय लिहितो, ‘ शहाजीराजांनी दक्षिणेतील सर्व हिंदूंची बूज राखली. तर म्हैसूर सरकारने सुध्दा शहाजींना गौरवताना म्हटले आहे की:
*”शहाजी महाराजा हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटणारा पहिला थोर राजपूरूष होय.”*
डॉ. एस्. एल्. करंदीकर हे ‘ Rise and Fall of Maratha power ‘ या ग्रंथात लिहितात:
*”His( Shahaji’s) Karnataka jagir was almost his Swarajya with this limitation that his subject were not Marathas.”*
सारांश, शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत करीत असतानाच त्यांनी सोसलेल्या वेदना, गाजविलेला महापराक्रम, त्यांची राष्ट्रभक्ती, बुध्दिकौशल्य पाहता एक प्रेरणादायी, महापराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून इतिहासकारांनी शहाजीमहाराजांचा केलेला गौरव हा उचितच ठरतो. भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान असे शहाजीमहाराजांचे जीवनचरित्र आहे. जे एखाद्या दीपस्तंभा प्रमाणे आपणास मार्गदर्शक ठरते.आज शहाजीमहाराजांची पुण्यतिथि. त्यांच्या पवित्र स्मृतीस हे शब्दरूप अभिवादन 🙏
(c) लेखक : राजेंद्र मा. घाडगे सातारा)
संदर्भ :
शिवभारत : कवींद्र परमानंद
राधामाधव विलासचंपू : जयराम पिंड्ये
राजनीतिज्ञ शहाजीमहाराज :राजेंद्र घाडगे
Rise and fall of Maratha Power:
Dr. S. L. Karandikar
मालोजीराजे आणि शहाजी महाराज:
वा. सी. बेंद्रे