शहाजीराजेंची महाराष्ट्र भेट…
राजमाता जिजाऊसाहेब ग्रंथमाला भाग २०…
शिवाजीराजांचे पराक्रम एकामागून एक महाराष्ट्रात चालू होते. शिवाजीराजांनी आदिलशहाच्या सरदारांचा केलेला पराभव, सिद्धी जोहरचा पराभव ,आदिलशहाला कोकणात बेदम मार देऊन संपूर्ण भूप्रदेश शिवाजीमहाराजांनी जिंकला होता. आपल्या मुलाचा एवढा मोठा पराक्रम आपले पती शहाजीराजांनी पहावयास यावे अशी जिजाऊंची खूप इच्छा होती. शहाजीराजांना ही आपली पत्नी मुलगा व जन्मभूमी यांची आठवण येतच होती.शहाजीराजांनाही आपल्या अद्वितीय पराक्रमी पुत्राची भेट घेण्यासाठी १६६२ मध्ये पत्नी तुकाबाई व पुत्र व्यंकोजी यांच्यासमवेत शहाजीराजे आदिलशहाच्या खास परवानगीने महाराष्ट्रात आले(शहाजीराजेंची महाराष्ट्र भेट).
शहाजीराजे महाराष्ट्रात येणार म्हणून शिवाजीराजांनी प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात चोख करून ठेवली होती. ही भेट जेजुरीच्या सूर्यदेवता श्री. खंडेरायाच्या मंदिरात होणार होती. शहाजीराजांच्या भेटीसाठी स्वागतास शिवरायांनी आपली फौज, हत्ती, घोडेस्वार ,कारकून वगैरेसह सरनौबत यांना सामोरे पाठवले. शहाजीराजे लवाजम्यासह मंदिरात आले. देवाची यथासांग पूजा करून शहाजीराजांनी जिजाऊ शिवराय व सुना या सर्वांच्या विधीपूर्वक भेटी घेतल्या.”एक मोठे काशाचे ताट आणून त्यात तूप घातलेले. त्यामध्ये ह्या चौघांचे मुख म्हणजे जिजाऊ ,शिवाजीराजे व सोयराबाई राणी साहेब यांचे शहाजी राजांनी एकसमयावच्छेदे करून अवलोकन केले .या विधीनंतर शिवरायांनी परमपुज्य पित्याचे चरणी मस्तक टेकवले. शहाजीराजांनी शिवरायांना उचलून धरून प्रेमालिंगन दिले. दोघांच्याही नेत्रांमधून प्रेमाश्रू ओघळू लागले.मग शहाजीराजांना पालखीत बसवून शिवराय स्वतः त्यांची पादत्राणे हाती धरून मोठ्या मर्यादेने पालखीबरोबर अनवानी चालले.”
राजे आपल्या पित्याबरोबर चालत होते. शहाजीराजे बोलले आमच्या राजे शिवबाचे राज्य उभे राहू दे .मी सोन्याच्या मूर्ती घडवण्याचे जेजुरीच्या खंडोबाला नवस बोललो आहे .तुमचे राज्य उभे राहील्याची खात्री झाली आहे.आम्हाला शिवाजीराजे म्हणाले, ” राज्य झाले आहे ; परंतु ते सुरक्षित नाही. शाहिस्तेखान ,आदिलशहा हात धुऊन मागे लागले आहेत. शहाजीराजे आपल्या शिवबाला खूप धीर देतात.” ते म्हणाले ” बाळ राजे जेव्हा राज्य उभं राहत , तेव्हाच ही परचक्र येत असतात . नाही तर आदिलशाहीला, मोगलाईला तुमची दखल घ्यायचे काय कारण ? जी थोर माणसे राजकारणी, मुत्सद्दी माणस असतात , त्यांची सदैव दूरदृष्टी असते. औरंगजेब त्यातलाच एक आहे .जेव्हा कोणाचे लक्ष तुमच्याकडे नव्हते ,तेव्हा औरंगजेबाने दक्षिणचा सुभेदार म्हणून असताना तुमच्यावर नजर ठेवली होती. एवढेच नव्हे तर आदिलशाहीला तुमच्या पासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता .शाहिस्तेखान येवो किंवा अफजलखान आपण घाबरणार नाही. या संकटातून पार पडाल. कारण माँ साहेबांचे संस्कार व शिक्षण आहे. हा भरवसा आहे आम्हाला .आमचे स्वप्न परमेश्वराने तुमच्या माँसाहेबाकडून साकार केले आहे .तुमचे यश, कीर्ती पाहून परमेश्वराने आमचे आयुष्य दहा वर्षानी वाढवले आहे “.एक थोर मुत्सद्दी पिता आपल्या मनीचे गुज आपल्या शूर पुत्राला ऐकवत होते.आपल्या मुलांमध्ये पराक्रमाबरोबर आदर्श राजांचे गुण पुरेपुर उतरले आहेत.हे शहाजीराजे पुरते ओळखून होते. शहाजीराजांनी शिवबांच्या कपाळाचे चुंबन घेऊन त्यांची पाठ थोपटली. गळ्यातला अत्यंत तेजस्वी असा मोत्याचा कंठा काढून शहाजीराजांनी आपल्या पुत्राच्या गळ्यात घातला.
शहाजीराजे पुण्यात दोन महिने राहिले .एवढ्या लहान वयात आपल्या पुत्राने एवढा मोठा पराक्रम केल्याबद्दल ,राजाला साजेशी संपत्ती मिळवल्याबद्दल शहाजीराजांनी त्यांचे गौरवपूर्ण कौतुक केले. स्वराज्याचा जिजाऊंनी केलेला विस्तार पाहून शहाजीराजे धन्य धन्य झाले. यावेळी शहाजीराजांनी शिवरायांना तलवार भेट दिली. आपल्या वडिलांनी दिलेल्या या अलौकीक भेटीबद्दल शिवाजीराजांनी या तलवारीचे नाव ‘तुळजा’ असे ठेवले. कारण ती तलवार त्यांच्या प्रिय पित्याची यशस्वी तलवार होती. शहाजीराजांनी आपल्या सर्व सुनांना मौल्यवान भेटी दिल्या.आपला एकुलता एक नातू बाळ संभाजीराजे यांना रत्नजडित खंजीर बहाल केला .जिजाऊ- तूकाईंनीही एकमेकींची गळाभेट घेतली .त्यांनीही एकमेकींना मौल्यवान भेटी दिल्या. शिवाजीराजे यांनी आपल्या आई तुकाई माँसाहेबांची हरतरेने सेवा केली. व्यंकोजीराजांना रत्नाने मढवलेली कट्यार शिवाजीराजांनी भेट दिली. शिवाजीराजे व्यंकोजीराजांना म्हणाले, “तुम्ही बेंगलोरचे राजे आहात. धाकटे आहात .पित्याची पराक्रमाची परंपरा प्रज्वलित ठेवा. भविष्यात आम्ही आपणाकडे आलो तर आम्हाला आपण विसरू नका.
शहाजीराजे दोन महिनेपर्यंत शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या सहवासात राहिले .जाताना जिजाऊंना म्हणाले,” राणीसाहेब तुमच्यावर आम्ही टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवला .स्वराज्याच्या कामी आपण नातेसंबंधाने अनेक सरदार घराणी जोडलीत. शिवबांची आठ लग्न करून आपण नाईक निंबाळकर, राजेशिर्के मोहिते ,जाधवराव ,इंगळे ,पालकर, विचारे ,गायकवाड ही मातब्बर मराठा सरदार घराणी आपण स्वराज्यासाठी एकत्र जोडलीत. शहाजीराजे पुढे म्हणाले ,आपली गरीब रयतेबद्दल ची करूणा इतकी मोठी आहे की, वेळ प्रसंगी हीच जनता आपल्यासाठी प्राणाची बाजी मारायलाही तयार आहे. हेच आपले खरे यश आहे. शिवाजीराजांनी शहाजीराजांना राहण्याविषयी खूप आग्रह केला; परंतु भेटी झाली हाच मोठा लाभ मानला.
पुढे शहाजी राजांना पोहोचवायला जिजाऊसाहेब व शिवाजीराजे वारणेपर्यंत गेले. शहाजीराजे व जिजाऊसाहेबांची ही भेट अखेरची ठरली .त्यानंतर त्यांच्या नशिबात पुन्हा भेट नव्हती. शहाजीराजे गेले पण जाताना जिजाऊंच्या मनाला चटका लावून गेले. शिवाजीराजांचे राज्य सिद्धी जावे म्हणून एक लक्ष रुपयांच्या सोन्याच्या मूर्ती तयार करून शहाजीराजांनी कर्नाटकातून पाठवून दिल्या. शिवाजीराजांना पुढील राजकारणाची दिशा दाखवून व त्यांना प्रेमपूर्वक आशीर्वाद देऊन शहाजीराजे कर्नाटकाकडे निघून गेले.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे