शहाजीराजे व जिजाऊ सहजीवन
राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला – भाग १०
शहाजीराजे व जिजाऊ सहजीवन – लखुजीराजे जाधवरावांचा घात करून निजामशहाने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. लखुजीराजे यांच्या हत्येमुळे निजामशाहीला तडाखा देण्यास दुश्मनांनी सुरुवात केली होती.निजामशहाला पहिला तडाखा दिला तो स्वतः शहाजीराजे भोसले यांनी निजामशहाच्या अशा विश्वासघातामुळे शहाजीराजांनी निजामशाही विरुद्ध अघोषित लढा सुरू केला. निजामशाही मुलखात शहाजीराजांनी धुमाकूळ घातला. अनेक किल्ले ताब्यात घेतले. चौकी पहारे बसवले. संगमनेरवरून शहाजी राजे पुण्यात येऊन ते पुढच्या योजना आखू लागले. निजामशाही आणि आदिलशाहीची शहाजीराजांना कधीच भिती वाटत नव्हती.निजामशाही संपवण्यासाठी आदिलशाही मोगलात सामील झाली आणि शहाजीराजांनी देखील बचावात्मक पवित्रा घेतला व दोन पावले मागे घेतली.
शहाजीराजांनी थेट मोगलांसोबतच जाण्याचे ठरवले .हे करण्यामागे देखील एक राजकारण होते. निजामशाहीचा बराचसा भाग शहाजीराजांच्या ताब्यात होता. फौजेच्या खर्चाचे कारण दाखवून तो सरंजामापोटी मोगलांकडून कायम करून घेण्याचा त्यांचा हेतू होता.शिवाय संधी मिळताच आणखीन मुलूख ताब्यात घेऊन वेळप्रसंगी मोगलांना हात दाखवता येणार होता. मोगलांना देखील शहाजीराजांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी शहाजीराजांच्या सर्व अटी मान्य करून ,राजांना पंचहजारी मनसब, जेष्ठ पुत्र संभाजीराजांसाठी दोन हजारी ,आणि चुलतबंधु मालोजी यांच्यासाठी तीन हजारी असा दहा हजारांचा सरंजाम मंजूर करून घेतला. जिजाऊंनी शहाजीराजांच्या मनी स्वराज्याचे विचार बिंबवले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी शहाजीराजे झटत होते. जिजाऊंचे आणि शहाजीराजांचे दोघांचे एकच स्वप्न होते, आणि ते साकार करण्यासाठी दोघेही प्रयत्न करत होते.संधी मिळताच शहाजीराजे पुंन्हा आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी लढणार होते.पण यावेळी राजकारणात दोन पावले राजांना मागे घ्यावी लागली होती. याची राजांना खंत नव्हती; उलट ते पुन्हा मनात नव्या योजना अखित होते .
शहाजीराजांच्या या राजकीय धामधुमीच्या व राजकीय परिस्थितीतीच्या काळात शहाजीराजे अत्यंत व्यस्त होते.आणि या काळातच जिजाऊंना दिवस गेले होते .विवाह झाल्यापासून शहाजीराजांचे सर्व कुटुंब एकत्रच राहत. दौलताबादच्या पायथ्याशी वेरूळ हे शहाजीराजांचे मुळगाव.तेथेच शहाजीराजांची लष्करी छावणी होती.भोसल्यांचा जुना गढीवजा वाडा व पुण्याला वडिलोपार्जित शहाजीराजांची जहागिरी होती. १६२५ ते १६३६ पर्यंत त्यांना आपल्या जीवनात स्थैर्य असे कधीच लाभले नाही .शहाजी राजांचे जीवन खूप अस्थिर होते. या शाहीतून त्या शाहीत जाण्यामुळे त्यांना स्थैर्य असे कधीच लाभले नाही. अशा अस्थिर जीवनातच जिजाऊंनी आपल्या पतीला सुख -दुःखाच्या प्रत्येक प्रसंगातन खूप साथ दिली.
पुढे १६२५ च्या दरम्यान शहाजीराजे पुण्याच्या जहागिरीत आले.या सार्या धावपळीत त्यांना जिजाऊसाहेबांना प्रत्येक ठिकाणी बरोबर नेता येत नव्हते.अत्यंत धावपळीच्या जीवनात मुलाच्या जन्मप्रसंगीही उपस्थित राहता आले नाही. पुत्र जन्माचा आनंदही त्यांना आपल्या कुटुंबात राहून उपभोगता आला नाही.जिजाऊंना नेहमीच शहाजीराजांपासून दूर रहावे लागे. मोठ्या आनंदाने जिजाऊसाहेब सर्व काही सांभाळत होत्या.जिजाऊंचे वैवाहिक जीवन अत्यंत कष्टमय झाले होते. लखुजी राजांच्या वधामुळे संतापून शहाजीराजे निजामशाही सोडून मोगलांकडे गेले होते. जाधव-भोसले वितुष्ट आल्यामुळे जिजाऊंना खूप दुःख झाले होते.चुलत दिराकडून भाऊ मारला गेला,त्याचा सूड म्हणून वडिलांनी दिरास ठार मारले. प्रत्यक्ष पतिलाही वडिलांच्या तलवारीचा वार बसला. या सार्या भीषण प्रकाराचे पर्यवसान म्हणजे वडिलांनी रागावून मोगलांची सेवा पत्करली .संसारात जिजाऊंना फारशी स्वस्थता अशी लाभलीच नाही. त्यांचे संसारिक जीवन धावपळीत, गडबडीत, संकटात व कष्टात गेले होते.तरुणपणातील जबाबदारीच्या जाणीवामुळे जिजाऊसाहेब विचारी व समजूतदार होत गेल्या.त्यांना दोन्ही कुळाचा अत्यंत अभिमान होता. जिजाऊ शांत व विचारी होत्या. कोणत्याही व्यक्तीला त्या कधीच दुखवत नसत.
शहाजीराजे नेहमी राजकारणात व लढाईत दंग असत. शहाजीराजांचा सहवास जिजाऊंना फार कमी वेळा मिळे ,पण त्याबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. शहाजीराजांच्या सुखात त्या आपले सुख मानत. जिजाऊ अतिशय प्रेमळ, प्रसन्न वदन, व विनयशील होत्या. गृहिणी यानात्याने त्यांचे वर्तन आदर्श होते.जिजाऊ सर्व समाजात मिसळून लोकांचे दुःख समस्या ऐकून घेत.सर्व रयतेचे दुःख हालअपेष्टा पाहून त्यांना खूप वाईट वाटे. शहाजीराजे राज्यातील सर्व घडामोडी जिजाऊंना सांगत असत. दरबारातल्या गोष्टी, युद्धाचे प्रसंग सर्व काही ऐकून सारे राजकारण त्यांच्या लक्षात येत. सर्व परिस्थिती पाहून त्यांना दुःख होत व त्या विचार करायला लागत. सर्व राज्यकर्ते, गोर -गरिबांची काळजी न करता स्वतःचाच स्वार्थ का बघतात? रयतेची काळजी करायची नसेल तर हे लोक राज्य तरी का करताहेत?या शाह्या – पातशाह्यांना आमच्या गरीब रयतेची काळजी का वाटत नाही? आमच्या रयतेची काळजी नसेल तर येथे ते काय करतात? यांना काय अधिकार असे राज्य करण्याचा? या सरदारांचा अंमल एवढा कडक आहे की कोणीही येथे सुखी नाही. त्यांच्या हाताखाली, त्यांच्या राज्यात फक्त जमीनदार, जहागिरदार ,अमीर ,उमराव हेच सुखात आहेत .हे लोक आपल्या सुखापुढे रयतेची काहीच फिकीर करत नाहीत.यांच्यामुळेच आमच्या प्रजेच्या पदरी दुःखच दु:ख! हे शोषण कधी तरी थांबायला पाहिजे.आपलेच लोक या परकीयांच्या चाकरीत राहून आपल्याच लोकांना त्रास देत आहेत.लुटत आहेत ,लुबाडत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून जिजाऊ अत्यंत कष्टी होत. शहाजीराजांना जिजाऊंचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता.जिजाऊंचे व्यक्तिमत्व जगावेगळे होते. त्यांना या गुलामगिरीची, पारतंत्र्याची खूपच चीड येत असत.गोरगरिबांनाबद्दल कळवळा व रयतेचे दुःख त्या चांगलेच जाणून होत्या. त्यांच्यामध्ये स्वाभिमान व न्यायाची आस होती.अशा विचारांच्या पत्नी शहाजीराजांना लाभल्या होत्या.सर्वसामान्यापेक्षा आपली पत्नी काहीतरी वेगळ्या व्यक्तिमत्वाची व वेगळ्या विचारांची आहे हे शहाजीराजांना कळून चुकले होते.वेदना आणि असह्य यातना त्यांच्या काळजापर्यंत जात होत्या.
जिजाऊ आपल्या मनीचे दुःख आपले पती शहाजीराजे यांच्याकडे व्यक्त करत होत्या.जिजाऊंच्या वेदना ,आक्रोश, तळमळ, दुःख शहाजीराजेनाही जाणवत होते.शांतपणे राजे सर्व ऐकत होते. आज ना उद्या आपल्यावर देखील असेच प्रसंग येऊ शकतात हाच एक विचार दोघांच्याही मनात घोळत होता. जिजाऊंचा प्रत्येक शब्द राजांच्या कानात घणाचे घाव घालत होता.शहाजीराजे दिवस- रात्र झटत होते. शहाजीराजांचे आणि जिजाऊंचे एकच स्वप्न होते ते म्हणजे स्वतंत्र राज्याचे आणि ते साकारण्यासाठी राजाचे आटोकाट प्रयत्न चालले होते. जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरणार होते .या सर्व घडामोडीत शहाजीराजेनी एक निर्णय घेतला, आता काहीही करून त्यांना स्वतःचे स्वतंत्र राज्य हवे होते. शहाजीराजांना जिजाऊंनी आपल्या वैवाहिक जीवनात सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात अत्यंत खंबीरपणे साथ दिली. जिजाऊ याच शहाजी व शिवाजी राजांच्या प्रेरणा होत्या. जिजाऊंच्या साथीमुळेच तर शहाजीराजे आपल्या कार्यात यशस्वी होत होते.
शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न हळूहळू मूर्त रूप घेत होते. यातच शहाजीराजांनी मोहीत्यांची सोयरीक करण्याचा म्हणजेच स्वतःच्या दुसऱ्या विवाहाचा घाट घातला होता .कारण मोहित्यांची माणसे अतिशय शूर, न्यायी आणि स्वामीनिष्ठ होती. स्वराज्याला अशा व्यक्तींची खूप गरज होती.या मोहित्यांना आपल्या स्वराज्यासाठी बांधून ठेवणे अत्यंत आवश्यक होते. म्हणूनच शहाजीराजांनी तोडगा नामी तोडगा काढून मोहित्यांशी प्रत्यक्ष नातेच जोडले.तुकाईसाहेब व शहाजी राजांचा विवाह झाला तुकाऊपासून शहाजीराजांना व्यंकोजी नावांचे पुत्र होते.छत्रपती शिवरायांपेक्षा ते वयाने लहान होते.शहाजीराजांनी जिजाऊंवर स्वराज्य स्थापनेची सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे शिवबाला घेऊन पार पाडली होती.धन्यती आई आणि धन्यतो पुत्र.
लेखन – डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर