महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,628

राजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले भाग १

Views: 3885
3 Min Read

राजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले
भाग १

महाबली शहाजीराजे, महाबली शहाजीराजे हे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र त्यांचा जन्म उमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला. मालोजीराजे भोसले यांचा इंदापूरच्या लढाईत मृत्यू झाला. मालोजीराजे भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांची मनसब आणि जहागिरी निजामशाहने शहाजी महाराजांना दिऊन पुढे चालवली, शिवाय राजा हा किताब देखील बहाल केला.
शहाजीराजे यांचे चुलते विठोजीराजे भोसले यांनी शहाजी महाराजांची शिक्षण व्यवस्था केली, त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले गेले याविषयी इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे म्हणतात ” शहाजीच्या एकंदर नंतरच्या हालचालीवरून त्याला तत्कालीन रिवाजाप्रमाणे जसे क्षात्रवृत्तीचे शिक्षण दिले गेले, तसेच त्यास लेखन, वाचन, राज्यकारभारास आवश्यक असे सर्वसामान्य व्यवहारज्ञान देण्याची व्यवस्था झाली असली पाहिजे. जवळची उपाध्ये वैगरे मंडळीच सामान्यतः हे शिक्षण देत. ” शहाजीराजे सर्वप्रकारचे शिक्षण घेऊन मोठे झाले, तसेच लहानपणापासून त्यांचे दरबारात जाणे येणे असल्याने दरबारातील रीतिरिवाज, न्यायदान व युद्धतंत्र याविषयीचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले..
१६२४ साली भातवडीच्या युद्धात महाबली शहाजी महाराजांनी आपल्या शौर्य आणि धाडसाच्या जोरावर मोगल व आदिलशाही सैन्याच्या विरोधात मोठा पराक्रम गाजवला, याचे सविस्तर वर्णन शिवभारत या साधनात आलेले आहे..
१६२३ मध्ये आदिलशाहने निजामशाहीचा वजीर मलिक अंबर विरुद्ध मोगलांना लष्करी मदत केली होती, सरलष्कर मुल्ला महमद यास ५००० निवडक स्वारानीशी बऱ्हाणपूर येथे मोगलांच्या मदतीस पाठवले होते. मलिक अंबर यामुळे संतापला आणि कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि आदिलशाहीवर आक्रमण करून बेदरचा प्रदेश जिंकून घेतला आणि विजापूरवर चालून गेला. मलिक अंबरने विजापूरास वेढा दिल्याचे समजतास आदिलशाही सरदार मुल्ला महमद व मोगल सरदार सरलष्कर खान विजापूरच्या दिशेने निघाले, ही बातमी समजतास मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठवला व त्वरित आपल्या सैन्यानिशी अहमदनगरच्या दिशेने निघाला. त्याचवेळी मोगल-आदिलशाही या संयुक्त फौजेची आणि मलिक अंबरच्या सैन्याची गाठ भातवडी येथे पडली आणि युद्धास तोंड फुटले. या युद्धात महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे भोसले तसेच इतर मराठा सरदारांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या बळावर निजामशाहकडे विजयाश्री खेचून आणला..
भातवडीच्या युद्धात मोगल, आदिलशाही तसेच निजामशाहीच्या फौजेत कोणतेकोणते सरदार लढत होते त्यांची नावे तसेच युद्धाचे अतिशय अचूक आणि रसाळ वर्णन हे शिवभारत या समकालीन साधनात आलेले आहे. लेखनसीमे अभावी या युद्धात महाबली शहाजी महाराज आणि शरीफजीराजे भोसले यांनी गाजवलेल्या पराक्रम यांचे वर्णन अतिशय थोड्या शब्दात देणे योग्य राहील. शिवभारतकार नमूद करतात ” नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, सिद्दी, त्याचप्रमाणे हंबीररावप्रभूति इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे, घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेंव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली. “
Leave a Comment