शाहिस्तेखानाची फजिती –
शाहिस्तेखान शिवाजी महाराज्यांना दुर्बल समजे. एक्याण्णव कलमी बखरीत या विषयी उल्लेख आढळून येतो . शिवाजी महाराज्यांनचा अपमान करण्यासाठी शाहिस्तेखानने एक संकृत श्लोक एका पंडितामार्फत लिहून घेतला आणि तो दुताकरवी महाराज्यांना पाठवला.(शाहिस्तेखानाची फजिती)
वानरस्तवं वनेवासी पर्वतास्ते सदाश्रय: //
वज्रपाणिरहं साक्षात शास्ताखान मुपागत: //
अर्थ :- तू डोंगरात फिरणारा वानर आहेस तर पर्वताचे पंख कापणारा मी वज्रपाणी इंद्र आहे.
शिवाजी महाराज्यांनी ज्या संयमाने त्यास जे उत्तर दिले त्यातून महाराज्यांचा स्वत: वरील आत्मविश्वास दिसून येतो.
भाजिग्ये वज्रपाणी शिवोयो /
लंकानाथं वान्नर श्री हनुमान //
तयो राघवद्वर्ण शाली नृपोहं /
सीघ्रं शास्ताखान जेता भयं //
अर्थ :-एका वानराने लंका दहन केली होती हे विसरू नका.
५ एप्रिल १६६३ चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी मुसलमानी रमजान महिन्यात महाराज्यांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाच्या गर्वाचे दहन केले. खान घाबरून बायकांमध्ये लपून बसला . महाराज्यांनी खानावर वार केला त्यात खानाची बोटे छाटली गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले. परंतु या हल्यात खानाचे ४० सरदार, १२ बायका , १ मुलगा, १ जावयी, मारले गेले.
शाहिस्तेखानाच्या फजितीचे वर्णन समकालीन विजापूरचा उर्दू राजकवी मुहंमद नुस्त्रती आपल्या अलीनामा या काव्यात पुढीलप्रमाणे करतो.
जो शायिस्ताखां तब सहेलियांमे था
कर निहार सुख खुश रंगीलियां मे था
के थे घर कें चौघर निगहबान किते
हर यक ठार अंगे बका दरबां किते
न उस इब्लीसको था मजाल
किया वहां तलक भेस लहु का खिलाल
शाहिस्तेखान आपल्या जनानखाण्यात विलासात मग्न होता. त्याच्या वाड्याच्या भोवताली पहारेकरी तैनात होते. इतक्या कडेकोट बंदोबस्तात सैतानही जाऊ शकत नाही तेथे शिवाजीने हल्ला करून कापाकापी केली.
सोता था सो नींद जाने उचट
उचाया खड्ग आब अत मूह पे सट
न उसको मुकाबिल पे आने दिया
न हत्यार पर हात बहाने दिया
खपाखप किये चंद वारां पे वार
के घावा पे घावा लागे तन मंज धार
शाहिस्तेखानाला जाग आली. त्याने तोंडावर पाणी शिंपडले आणि आपली तलवार उचलली. पण शिवाजीने त्याला हत्यारावर हात ठेवू दिला नाही की त्याला पुढे येऊ दिला नाही. त्याने शाहिस्तेखानाला वारावर वार करून जखमी केले.
बहोत गचें घायल हो वाच्या जिया
जिय लग वले जीव की जखमा किया
शाहिस्तेखान जखमी होऊन का होईना वाचला खरा , पण शेवटपर्यंत त्याच्या हृदयात या गोष्टींचे शल्य डाचत होते.(शाहिस्तेखानाची फजिती)
के तिस सामने तिसके ज्या ज्या को काट
चल लूट, सब शर्म फिर अपनी बाट
गया देक यूं दाग शर्मिंदगी
के जीता है लग मौत हुयी जिंदगी
गया पल मे ऐसे का ले नंगोनाम
किया सबबिचार्या जो था दिल मे सब काम
वही शर्क ते गरद तक दम मने
पर हुयी बात मशहूर आलममने
शाहिस्तेखानाला आपले प्रियजन आपल्यासमोर मारले गेलेले पहावे लागले. शिवाजीने खानाची सगळी अब्रू घेतली आणि मग आपली वाट धरली. शाहिस्तेखानाला शरमेने जिवंतपणी मृत्यु आल्यासारखे वाटले. शिवाजीने क्षणात त्याचा मान हिरावून घेतला आणि आपली इच्छा पूर्ण केली. हां हां म्हणता ही गोष्ट पूर्वेपासुन पश्चिमेपर्यंत पसरली.
समकालीन कवी भूषण हे आपल्या काव्यात शिवाजी महाराज्यांच्या या पराक्रमाचे वर्णन करतात
सायस्तखां दछिन कौं प्रथम पठायो वह बेटा सौ समेत हाथ जाय कें गहायो है /
भूषन भनत ज्यो ज्यो भेज्यो उत औरो तिज बेही काज बरजोर कटक कटायो है //
शाहिस्तेखानाला पहिल्यांदा दक्षिण फत्ते करण्यासाठी पाठविले तर तो आपला मुलगा व हात गमावून बसला. भूषणजी म्हणतात, जोपर्यंतइतर कोणी ( सेनापती ) पाठवू तोपर्यंत त्याने बेकार, सेनाच कापून काढली.
पुनामध्य गगन महिल राति मगन व्हे राग रंग में नबाब सुख पावने लगे /
लाख असवारन कौं निदर शिवा के लोग चौकिन कौं चांपि जाय धांम धावने लगे //
भूषन भनत औ फिलतें मारि करि जब अमीरन पर मरहट्ट आवणे लगे /
सायस्तखां जांन राखिबे कौं निज प्रान तब गुनिन समांन बैठि तान गावने लगे //
पुण्यामध्ये गगन महालात , नबाब शाहिस्तेखान रात्री नाचगाण्यात मग्न राहून सुख आजमावीत होता. लाख स्वार असलेल्या लाल महालामध्ये चौक्या कापून शिवाजी महाराज्यांचे मावळे आत घुसले. भूषणजी म्हणतात, पाहरेकर्यांना मारून मराठे आमिरांच्यावर चाल करून आले. आपले प्राण वाचवण्यासाठी शाहिस्तेखान त्या गायकांमध्ये मिसळून तान गाऊ लागला.
कवि परमानंद श्रीशिवरायांच्या प्रराक्रमांची थोरवी गाताना लिहितात.
कलिकल्मषहारीणि हारीणि जनचेतसाम /
यशांसि शिवराजस्य श्रोतव्यानि मनीषिभि //
कलीयुगातील पापे नाहीशी करणारी आणि लोकांची चित्ते हरण करणारी श्री श्रीशिवरायांची यशोगीते आपण श्रवण करावीत.
संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १.
श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ :- सेतु माधवराव पगडी.
शिवराज भूषण :- केदार फाळके.
श्री. नागेश सावंत