शाहू महाराजांचे औदार्य –
राजाला आपल्या शिरावर मुकुटा बरोबर लक्षावधी लोकांची सुखदुःखाची जबाबदारी घ्यावी लागते. त्यांचे उच्चपद सूर्यासारखे असते. इतरांना प्रकाश देण्याकरिता स्वत: जळत राहणार्या सूर्याचं मोठेपण औदार्याच्या महान तत्त्वावर अवलंबून आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या अंगी असलेली उदारता व सर्वांभूती समभाव हे एखाद्या नरशार्दुलाला शोभावे असेच होते. हे मोठेपण मिळवण्यासाठी चारित्र्यात सूर्याची तेजस्विता व अंत:करणात चंद्राची शीतलता असावी लागते. हे महान गुण छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी वास करत होते. शाहू महाराजांचे औदार्य त्याचा प्रत्यय खालील दोन उदाहरणावरून दिसून येतो.
प्रसंग एक –
एके दिवशी शाहू महाराज अंबेरीच्या कुरणात शिकारी साठी आले होते. नेमके त्याच वेळी उदाजी चव्हाण हे आपल्या ठाण्यात वास्तव्य करून जवळपास च्या प्रदेशावर पुंडाई करून खंडणी वसूल करीत होते. शाहू महाराजांना छळणार्या अनेक शत्रूंपैकी उदाजी चव्हाण हे एक होते. शाहू महाराजांच्या प्रदेशावर धाडी टाकून त्यांनी महाराजांना नकोसे करून टाकले होते. अथणी प्रांतात पुंडाई करून खंडणी वसूल करण्यासाठी चव्हाण हे येथे आले होते. त्यावेळी शाहू महाराजांच्या कडे अवघे हजार पाचशे फौज होती. सेनापती सोबत होते. त्यांनी महाराजांना सांगितले की आपण आज्ञा करावी मुसक्या बांधून उदाजी चव्हाण यांना आपल्या पुढं हजर करतो. त्यावर महाराज म्हणाले की तो काही स्वत: हून आमच्या कडे मसलती साठी आला नाही किंवा आम्हालाही त्यांच्या कडे मसलती साठी जायचे नाही. तो केवळ खंडणी वसूल करण्यासाठी इकडे आला आहे. अशा अवस्थेत त्याला पकडून आणण्यात असा कोणता पुरूषार्थ आहे?
महाराजांचे हे उदात्त विचार ऐकून सेनापती वरमले. महाराजांनी आपला कारकुन पाठवुन चव्हाण यांना निरोप दिला की आपण नि:संकोचपणे शिकारीस यावे आपण मिळुन शिकार खेळू व कार्यभाग उरकल्यावर आपापल्या मार्गाने परत जाऊ. एवढे बोलून कारकुन सोबत मुद्रा, अंगठी व काही सेवेकरी यांना उदाजी चव्हाण यांच्या कडे पाठवले. दहा वीस स्वार बरोबर घेऊन चव्हाण महाराजांच्या कडे आले. दोघांनी मनसोक्त शिकार केली. त्यानंतर विडे देऊन त्यांना निरोप दिला. एक शत्रु ज्याने शाहू महाराजांच्या कार्य क्षेत्रात धाडी घालून महाराजांना अस्वस्थ करुन सोडले होते, अशा एका वैर्या बरोबर उदात्त भावनेने वागुन त्याला आपला चांगुलपणा दाखवून दिला.
प्रसंग दुसरा –
एके दिवशी शाहू महाराज सकाळी लवकरच उठून शिकारीसाठी निघाले. सोबत त्यांचा लवाजमा होताच. जंगलात गेल्यावर आपल्या सोबत कुणालाही न घेता हातात काठी घेऊन एकटेच जंगलात निघाले. सकाळची शांत वेळ. झाडाझुडुपांमध्ये पक्षांचा किलबिलाट सुरू होता. इतक्यात त्यांचे लक्ष एका फांदीवर बसलेल्या सुंदर पक्षावर गेले. त्या पक्षाला पकडण्यासाठी जेंव्हा महाराज त्या झुडपाच्या जवळ गेले तेंव्हा अचानक दोन बंदुकधारी त्यांच्या नजरेस पडले. महाराज मोठ्या हिमतीने त्यांच्या पुढे ऊभे राहिले. महाराजांना समोर बघून बंदुकधारी लटपटत त्यांच्या समोर उभे राहिले. अन् म्हणाले आम्ही मारेकरी आहोत.
महाराजांनी त्यांना विचारले की मग गोळी का घातली नाही ?
भीतीने थरथर कापत ते मारेकरी म्हणाले महाराज आपणास पाहताच आम्ही घाबरलो व आपणावर गोळ्या चालवण्याचे धाडस झाले नाही. त्यानंतर महाराजांनी त्यांना अभय देऊन बंदुका ठेवा व निघून जा अन्यथा कारभारी व श्रीपतराव तुम्हाला खतम करतील असे सांगितले. त्यांनी बंदुका ठेवल्या व ते निघून गेले.
महाराजांनी त्यानंतर लोकांना बोलावून बंदुका स्वारीत जमा केल्या व झाला प्रकार सर्वांना सांगितला. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा असताना धीरोदात्तपणे उभे राहून मारेकऱ्यांनाही उदार अंतःकरणाने क्षमा करणारे मराठेशाहीतील हे छत्रपती महानच समजले पाहिजे.
आपल्या वडिलांच्या गुणांचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारे थोरले शाहू महाराज –
16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. पण त्यापुर्वी त्यांनी एक चांगले कार्य केले. झाले गेले सर्व विसरून त्यांनी राजद्रोहाच्या शिक्षेत असणार्या सर्व प्रधानांना व अधिकार्र्यांना मुक्त करून त्यांना सन्मानाने परत अधिकाराच्या जागांवर नेमले. मोरोपंत पेशव्यांचा कैदेत असतानाच मृत्यू झाला होता. त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलास निळोपंतास पेशवाई दिली. अण्णाजी दत्तो यांना सन्मानपूर्वक अमात्य पद बहाल केले गेले. अण्णाजी दत्तो यांचे सचिव पद अगोदरच रामचंद्र पंडित यांना दिल्याने त्यास अमात्य पदावर नेमले. प्रल्हाद निराजी यांना न्यायाधीश पद दिले. बाळाजी आवजी यांच्या कडे राज्याची चिटणीशी पुन्हा चालू ठेवली. संभाजी महाराजांनी यावेळी दाखवलेली क्षमाशीलता, औदार्य, मनाचा मोठेपणा इत्यादींना इतिहासात तोड नाही.
औरंगजेबाला एखाद्या माणसाचा फक्त संशय जरी आला तरी त्या माणसाची धडगत नसायची. त्या व्यक्तीला अनेक नरकयातनांना सामोरे जावे लागत असे. संभाजी महाराजांच्या जागी औरंगजेब असता तर सगळ्या राजद्रोहांना त्यानं कोणती शिक्षा दिली असती हे त्याने त्याच्या वडील, भाऊ, मुलगा यांना दिलेल्या वागणुकीवरुन कळते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनाचा मोठेपणा व क्षमाशीलता हे गुण शाहू महाराजांच्या अंगी पुरेपूर उतरले होते.
रवि पार्वती शिवाजी मोरे