महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,013

शाहजादा मुअज्जमचे निशान

By Discover Maharashtra Views: 2504 4 Min Read

शाहजादा मुअज्जमचे निशान –

निशान म्हणजे बादशाहच्या मुलाने, मुलीने किंवा त्यांच्या मुलांनी (बादशाहज़ादा) लिहिलेले पत्र किंवा आज्ञा. बादशाहाच्या पत्नीने लिहिलेल्या आज्ञेला ‘हुक्म’ असे म्हणतात. शाहजादा मुअज्जमचे निशान.
फर्मान आणि परवांचा (अधिकारी किंवा मंत्र्यांनी लिहिलेली पत्रं किंवा आज्ञा ) आणि निशान मधील साम्ये

१) फर्मानाप्रमाणेच निशान देखील ‘अहकाम-इ-दिवानी’ म्हणजेच  प्रशासकीय कामासंदर्भातील हुकुमांसंदर्भात असते (अहकाम हे ‘हुक्म’ चे अनेकवचन आहे.)

२) ज्या प्रमाणे परवांच्यामध्ये  बादशाहाने फ़र्मानात दिलेला हुकूम विदीत केलेला असतो. त्याचप्रमाणे ‘निशान’ देखील बादशहाच्या फर्मानात दिलेल्या आज्ञा विदित करते.

३) जमिनीच्या इनामाच्या सनदा  किंवा नियुक्तीच्या संदर्भात , बादशाहाने आपल्या फ़र्मानात दिलेले इनाम किंवा केलेल्या नियुक्तीची पुष्टी निशान मध्ये केलेली असते.

निशान हा फर्मानाच्या खालोखालचा , परंतु परवांचाच्या वरच्या दर्जाचा दस्तऐवज आहे.

निशान कोणाला पाठवले जाते ?

दौलतीचा नोकर, मंत्री, उमराव , मांडलिक राजे , बादशाह खेरीज मुघल घराण्यातील लोक, इतर राजसत्तांचे प्रमुख (उदाहरणार्थ :- विजापूरच्या आदिलशहाला औरंगजेबाने पाठवलेले निशान, माजमुआ-ए-मक्तुबात) काही वेळा जुन्या फर्मानातील हुकुमाला पुरवणी म्हणून काढलेली प्रशासकीय आज्ञा म्हणून निशान पाठविण्यात येते.

निशान ची वैशिष्ट्ये –

१) निशानाच्या वरच्या भागावरील मजकूर (श्रीकारा सारखा)

मुघल बादशाह अकबराच्या काळापूर्वी निशानावर वरच्या बाजूस असलेला मजकूर ‘हू अल ग़नी’ असा असल्याचे दिसून येते.
उदाहरणार्थ :- बाबाराचे फर्मान आणि त्याचा मुलगा मिर्झा अस्करी याचे १५३९ चे निशान
यानंतरच्या काळात ‘हू अल ग़नी’ ऐवजी ‘अल्लाहू अकबर’ असे लिहिले जाऊ लागलॆ
शाहजहानच्या काळापासून बहुतांश निशानांवर सुरवातीला ‘बिस्मिल्ला अल रहमान अल रहीम’ असे लिहिल्याचे आढळते.
मुअज्जमच्या प्रस्तुत निशानावर देखील सुरवातीला ‘बिस्मिल्ला अल रहमान अल रहीम’ असे लिहिलेले आहे.

२) बादशाहाचा तुघ्रा

निशान म्हणजे  राजपुत्र किंवा बादशहाचा वारसदार असणाऱ्या व्यक्तीने पाठवलेली शाही आज्ञा असल्याने त्यावर बादशाहाच्या तुघ्र्या सारखी राजचिन्ह उमटविलेली असतात.
निशानांवरील बहुतांश तुघ्र्यांमध्ये बादशाहाची बिरुदे आणि ‘ब-फर्मान-ई’ हे शब्द वाचता येतात
मुअज्जमच्या प्रस्तुत निशानावरील तुघ्र्यामध्ये देखील ‘ब-फर्मान-ई’ हे शब्द वाचता येतात.

३) शाहजाद्याचा तुघ्रा

बादशाहाच्या तुघ्र्याखाली शाहजाद्याचा तुघ्रा उमटविलेल्या असतो व त्यात शाहजाद्याच्या बिरुदावल्या आणि ‘निशान-ए-आलिशान-ए सुलतान…  असे शब्द असतात. याचा अर्थ.  हा हुकूम शाहजाद्याच्या निशाना खाली जारी करण्यात आला आहे असा होतो.

४) शाहजाद्याचा शिक्का

निशानावर फक्त शाहजाद्याचा शिक्का असतो. शिक्क्यामध्ये शाहजाद्याचे नाव आणि बिरुदावल्या आणि त्याच्या वडिलांचे म्हणजे बादशाहाचे नाव आणि शिक्याचे साल असते.

५) लेखनातील आणखी काही वैशिष्ट्ये

निशान हा फर्मानाच्या खालोखालचा दस्तऐवज असल्याने, परवांचा सारख्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या दस्तऐवजांपेक्षा वेगळे असलेले त्याचे रूप अधोरेखित करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने त्याचे लिखाण केले जाते. काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :-

१) मुघल फर्मानाप्रमाणेच निशानाच्या मजकुराच्या पहिल्या दोन ओळी, इतर ओळींपेक्षा आखूड असतात.

२) एखाद्यावर असलेली विशेष कृपा दाखविण्यासाठी बादशाह प्रमाणेच शाहजादा देखील आपल्या हस्ताक्षरात काही मजकूर निशानाच्या सुरवातीला किंवा खालच्या बाजूला असलेल्या ताकीद मध्ये लिहितो.

६) निशानाचा मुख्य मजकूर

निशानातील मुख्य मजकूर हा  मुख्यत्वेकरून राजकीय परिस्थिती, सोयूरघूल (धर्मादाय) देणग्या, एखाद्यावर दाखवलेला विश्वास किंवा कृपा किंवा राज्यातील प्रदेशातून मुक्तपणे ये-जा करण्यासाठी परकीय प्रवाशांना किंवा व्यापाऱ्यांना दिलेले परवाने (निशान-ए-राहदारी)     याच्याशी संबंधित असल्याने, बहुतांश वेळा निशान हे फर्मानानंतर पाठवले जाते. निशान पाठवण्याचा उद्देश, बादशाहाने फर्मानात पाठविलेल्या हुकुमांना पुष्टी देणे किंवा फर्मानात दिलेले आदेश दृढ करणे हा असतो.

निशानांचा अभ्यास करताना होणारे काही गैरसमज

निशानाचे दृश्य स्वरूप आणि फर्मानातील मजकुराप्रमाणेच असलेला आशय वगैरे फर्मानासारखेच असल्याने अनेकदा निशान हे  शाही फर्मान असल्याचे काही विद्यार्थ्यांना वाटते, परंतु निशानातील काही वैशिष्ट्यांमुळे समोर असलेला दस्तऐवज हा निशान आहे हे लक्षात येते.
उदाहरणार्थ :-

निशानातील मजकुरात ‘ हुक्म जलील अलकद्र’ , ‘अम्र जलील अलकद्र’, ‘अम्र आली’ किंवा ‘अम्र वाला’ (अम्र म्हणजे हुकुम ) असे शब्द येतात
किंवा बादशाहाची कृपा दर्शविणारे
‘इनायत शाहाना’ किंवा इनायत सुलतानी अशा स्वरूपाचे शब्द येतात
मुअज्जमच्या प्रस्तुत निशानामधल्या मजकुरातील दुसऱ्या ओळीत
‘ब-अल्ताफ़ बादशाही व इनायत-ए-आली’
म्हणजेच बादशाहने केलेल्या सर्वोच्च कृपेमुळे असे शब्द येतात

या खेरीज प्रस्तुत निशानाच्या पाचव्या ओळीत ‘ इन निशान’ म्हणजे या निशानानुसार असे स्पष्टच म्हटले आहे.

संदर्भ :- The Chancellery and Persian Epistolography under the Mughals, Dr. Momin Mohiuddin

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment