महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,073

गंडकी नदी, शाळीग्राम शिळा आणि छत्रपती शिवाजी महाराज

Views: 1501
7 Min Read

गंडकी नदी, शाळीग्राम शिळा आणि छत्रपती शिवाजी महाराज –

नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणल्या गेल्या आहेत. या शिळांमधून समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्रीराम आणि सीतामाता यांच्या मूर्ती घडविल्या जाणार आहेत. या दोन्ही शिळा नेपाळमधील पोखरा येथे असलेल्या शालिग्रामी नदीतून (म्हणजेच काली गंडकी) भूगर्भीय आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखी खाली काढण्यात आल्या आहेत. अधिकृत कागदपत्रांमध्ये तिचे नाव ‘बुढी गंडकी नदी’ असे असले तरी तिचा इतिहास व तिचे पावित्र्य फार फार मोलाचे आहे.. या नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी करण्यात आले. तिची विशेष पूजा करण्यात आली आणि त्यानंतरच या शिळा अयोध्येला आणल्या गेल्या. गंडकी नदीच्या या दोन भव्य शिळा वाजत गाजत हिंदुस्थानात, अयोध्येत दाखल होत आहेत. ठिकठिकाणी श्रद्धेने त्यांचं पूजन होतंय. रस्त्यांवर दुतर्फा फुलांचे सडे पडताहेत. श्रीरामांचे आणि सीतामाईचे मूर्तरूप आकार घेण्याआधीच या शिळांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दुतर्फा गर्दी लोटत आहे.(गंडकी नदी, शाळीग्राम शिळा आणि छत्रपती शिवाजी महाराज)

मात्र, आजपासून साडेतीनशे वर्षांपूर्वी हाच आनंदाचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. हिंदुस्थानभर त्याचा गाजावाजा झाला होता. तेव्हाही नेपाळच्या याच गंडकी नदीचे आणि तिच्यातील शाळीग्राम शिळांचे महत्व सिद्ध झाले होते. निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मनीची इच्छा… होय, खुद्द शिवाजी महाराजांच्या मनानेच ते उदात्त कार्य सिद्दीस जाणे होणार होते…

त्याच असं झालं की, अफझलखानाच्या वधानंतर मिळालेले न भूतो न भविष्यती यश आणि त्यानंतर थेट पन्हाळ्यापर्यंत मारलेली यशस्वी घोडदौड, स्वराज्यात सामील झालेले एकापेक्षा एक नामी किल्ले, मिळालेली गडगंज संपत्ती, सारं सारं कसं महाराजांची कुलदेवता तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच घडत गेलं. आणि म्हणूनच महाराजांची तुळजाभवानीवरील श्रद्धा आणि तिचं दर्शन याची ओढ मात्र दिवसेंदिवस वाढत गेली. पण सततच्या मोहिमा, घोंघावणाऱ्या संकटांच्या मालिका, स्वराज्याचा वाढता व्याप यामुळे महाराजांना इच्छा असूनही तुळजापूरला जाता येत नसे. त्यांच्या मनाला सदैव रुखरुख नक्कीच लागली असणार. श्री तुळजा भवानीचे दर्शन वारंवार घडावें अशी त्यांची इच्छा असे. यावर काय उपाय करावा हा विचार ते करीत होते. आणि त्यांच्या मनांत एक फार चांगली कल्पना प्रकटली. जगदंबेची अति प्रसन्न, अति देखणी, यथाशास्त्र मूर्ती तयार करवून श्रीची स्थापना प्रतापगडावरच प्राकार, देवालय, सभामंडप, सिंहासन करून, मोठा समारंभ करून, होमहवनादि सर्वोपचारपूर्वक करावी असा संकल्प मनोमनी महाराजांनी केला. मोरोपंतांशी सल्लामसलत करून खासे सरदार मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांस महाराजांनी आज्ञा केली “हिमालयाच्या प्रदेशीं नेपाळचे सलतनतींत, त्रिशूळ गंडकींतून उत्तम शिळा शोध करून आणणें. तेणेप्रमाणें सर्व साहित्य अनकूळता करून देऊन नाईक मशारनिल्हेस हिंदुस्थानांत रवाना केलें.”

त्यानंतर शिवाजीमहाराज कोकणची मोहीम फत्ते करून राजगडावर येऊन दाखल झाले. (जुलै प्रारंभ, १६६१) आणि एके दिवशी कुळस्वामिनीची खासा स्वारी राजगडावर पालखींत बसून आली. अष्टभुजा असलेल्या या तुळजाभवानीच्या आठ भुजांमध्ये खड्‌ग, धनुष्य, बाण, ढाल, शंख, त्रिशूळ अशी आयुधे आहेत तर उजव्या हाती महिषासुराचे वक्षी उजवे हाती त्रिशूळ प्रहार करून, डावे हाती त्याची शेंडी धरून, सिंह दैत्याचे मनगट पकडले आहे. अशी ही दैत्यमर्दिनी जगदंबा म्हणजे साक्षात दैत्यांचा काळ असेच म्हणावे लागेल.

राजेश्री मंबाजीनाईक बिन गोमाजीनाईक पानसरे यांनी त्रिशूल गंडकीच्या गर्भातून उत्तम शिळा शोधून काढून हुन्नरवंत शिल्पकारांकडून नेपाळ प्रांतीच ती सुबकपणे घडवून घेतली. आणि मग वाजतगाजत ही तुळजाभवानी एका सुयोग्य मुहूर्तावर महाराष्ट्रात आणली गेली. राजगडावर आईसाहेबांच्या आणि सर्व कुटुंबियांच्या समक्ष शिवाजी महाराजांच्या समोर याचे प्रथम दर्शन दिले गेले. प्रसन्न मुखदर्शनाने महाराजांसहित सारेच श्रद्धेने मनोमनी सुखावले.

मात्र त्यानंतर लगेचच श्रीची स्थापना प्रतापगडावरी करावयाचा सिद्धांत करून राजेश्री यांनी मोरोपंत पंडित पिंगळे यांचे सोबत श्रद्धापूर्वक देवीच्या मूर्तीस प्रतापगडी पाठवले गेले. उत्तम साहित्य केलें. एका उत्तम शुभमुहूर्तावरी श्रीची स्थापना केली. यावेळी महाराजांनी धर्मदान उदंड केला. श्रीभवानीस रत्नखचित अलंकार भूषणें केलीं. नित्य पूजा, महोत्सव, चौघडा छबिना, होमहवन, बलिदान, नैवेद्य, नंदादीप, पुराणप्रवचन, गोंधळ साऱ्या साऱ्या धार्मिक विधींचा एक मोठा सोहळाच प्रतापगडावर साजरा झाला. वेदमूर्ति विश्वनाथभट हडप यांना श्रीची पूजा सांगितली गेली. स्वतः महाराज देवीचे भोपे बनले. परंतु राज्यकर्म आणि स्वराज्यकामांमुळे नित्य वेळ देऊ शकत नसल्यानेच मंबाजीनाईक पानसरे यांना महाराजांनी आपले प्रतिनिधी म्हणून श्रीसन्निध ठेवलें. श्रीस खासा चाकरवर्ग नेमून दिला. पेशवा, पुजारी, पुराणिक, फडणीस, हवालदार, खाटीक वगैरे नेमले. दर पौर्णिमेस छबिना व बकऱ्याचा बळी आणि दर खंडेनवमीस व दसऱ्यास अजबळीची सोय केली. (स्थापना सुमारे जुलै १६६१)

आज १६६१ नंतर २०२३ मध्ये ३६२ वर्षां नंतर पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. भारतीयांच्या अखंड श्रद्धेने नेपाळच्या गंडकी नदीच्या शाळीग्राम शिळांचे महत्व पुन्हा एकदा जगासमोर आले. छत्रपतींनी याचे पावित्र्य त्यावेळीच ओळखले आणि थेट नेपाळपर्यंत आमचे स्वार दौडले होते. सरदार मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसऱ्यांनी ज्या श्रद्धेने भवानी देवी त्या शिळेतून घडवून घेतली त्या देवीच्या सुंदर रुपास आजही तोड नाही.. केव्हातरी प्रतापगडावर जाऊन नक्की पहा. महाराजांची श्रद्धा, त्यांची त्यावेळीही असणारी दूरदृष्टी, मोरोपंत, मंबाजी नाईकांसारखे हरहुन्नरी साथीदार, त्यावेळच्या रयतेने साजरा केलेला सोहळा, एका देवीच्या स्थापनेने निर्माण झालेला विश्वास, अवतीभवती सुलतान शाह्या, मुघलांचे जिहादी वातावरण, मंदिरे मुर्त्या फोडण्याच्या विकृत मूर्ती भंजकांच्या राक्षसी विळख्यात गंडकी नदीतील त्या शाळिग्रामाने भवानीच्या रुपात अवतार घेऊन जणू यवनांना इशाराच दिला की ‘होय, मी प्रतापगडावर प्रकट झाली आहे. आता तुमचा समूळ संहार केल्या शिवाय मी शांत बसणार नाही.’ महाराजांना या तुळजाभवानीच्या स्थापनेतून समस्त रयतेला हाच विश्वास द्यायचा होता.

आज याच शाळीग्राम शिळांमधून साक्षात श्रीराम या भूतलावर अवतार घेताहेत. पुन्हा एकदा रणशिंगे फुंकली जाताहेत. छत्रपतींनी ३६२ वर्षांपूर्वी निर्माण केलेला विश्वास गंडकी नदीच्या शाळीग्रामातून प्रकट होऊन श्रीरामांच्या रूपाने पुन्हा एकदा याच भूमीतील विकृत आणि सैतानी शक्तींचा विनाश केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही.

ज्यादिवशी श्रीराम आणि सीतामाईंच्या या दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना अयोध्येत होईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने रामराज्याभिषेक सोहळा साजरा व्हावयास हवा.. होय राज्याभिषेक सोहळा. कारण त्यावेळीही दि. १९ मे १६७४ च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी प्रतापगडच्या त्याच तुळजाभवानीचे दर्शन घेऊन, तिला सव्वामणाचे सोन्याचे छत्रचामर चढवून मगच स्वतःस रायगडी राजाभिषेक करून घेतला होता. इतके तिचे अनन्यसाधारण महत्व.. गंडकी नदीची ती शिळा भवानी देवीच्या प्रकट रूपाने पावन झाली होती.

म्हणूनच यासमयी हिंदुस्थानात साजरा होणारा हा श्री रामरायाचा सोहळा समस्त भारतीयांनी छत्रपतींच्या स्वप्नातील रामराज्य आणि राज्याभिषेक सोहळ्या प्रमाणेच साजरा करावयास हवा. तेव्हाच दूर दूर पर्यँत याचे पडसाद उमटतील. या शुभसंकेताचे सहर्ष स्वागत करीत एका नव्या उज्वल हिंदुस्थानच्या निर्मितीचा आगळावेगळा श्रीगणेशा करण्यास हरकत नाही…

लेखन: श्री. अनिल नलावडे

लेखासाठी ऐतिहासिक संदर्भ:
१. छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल – सर जदुनाथ सरकार
२. राजा शिवछत्रपती – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे)

Leave a Comment