महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,30,173

साहेब ए फुतूहात ए उज्जाम शहामतपनाह बाजीराव

By Discover Maharashtra Views: 2575 5 Min Read

साहेब ए फुतूहात ए उज्जाम शहामतपनाह बाजीराव –

‘ॐ त्र्यंबकं यजामहे….’ असा आरंभ असणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचा रामेश्वराच्या मंदिरात अहोरात्र जप सुरू होता. व्यक्तीच्या अखेर समयी त्याचे प्राण वाचावेत वा त्यास मुक्ती मिळावी, म्हणून सदाशिव महादेवाला प्रार्थना करणारा हा मंत्र! सहस्रावधी वर्षांपासून हिंदू धर्म संस्कृतीत याच मान्यतेसह आणि आस्थेसह उच्चारला जाणारा हा मंत्र, त्या दिवशी त्या रामेश्वराच्या देवळात कित्येक ब्राह्मणांकडून त्याचा जप सुरू होता. एका आवर्तनानंतर दुसरे आवर्तन….नंतर तिसरे असे सहस्रावधी आवर्तने जपत त्या देवांच्या देवाला महादेवाला प्रार्थना सुरू होती. महामृत्युंजय मंत्राचे सहस्रावधी आवर्तने करून देवांच्या देवाची त्या महादेवाची प्रार्थना करण्याचे त्या दिवशी एक वेगळे कारण होते.

रामेश्वराच्या त्या देवळापासून काही अंतरावर एका तंबूत एक व्यक्ती आपल्या अखेरच्या घटका मोजत होता. कित्येक शत्रूंची अखेर बघितलेला तो व्यक्ती आपल्या अखेरी बेशुद्धावस्थेत होता. हा व्यक्ती साधारण नव्हता. आणि ह्या असाधारण असलेल्या व्यक्तीची नव्हे नव्हे सेनानीची आपली अखेरची झुंज सुरू होती. आयुष्यातील प्रत्येक युद्धात कधीही न हरलेला हा ईश्वरदत्त सेनानी आपल्या अखेरच्या लढाईत विजय वा पराजयाची वाट बघत होता.

आपल्या अखेरच्या जय-पराजयाची वाट बघत असलेला हा ईश्वरदत्त सेनानी म्हणजे आपल्या कर्तुत्वाने उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत आणि पश्चिमेस गुजरातपासून तो पूर्वेस बंगाल्यापावेतो आपल्या स्वतःचा दबदबा निर्माण करणारा अजिंक्य योद्धा ज्याचे निजामासारखा व्यक्ती कौतुक करतो, तो मराठी साम्राज्याचा पंतप्रधान शहामतपनाह पेशवा बाजीराव बल्लाळ!

१८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेला पाळण्यातील हा विसाजी. पण आपल्या आयुष्यातील विजयांची ग्वाही देणारे याचे टोपणनाव बाजीराव! आणि ह्याच नावाप्रमाणे याने मराठा साम्राज्याची बाजी केली. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर यास पेशवाई मिळाली त्यावेळी, “मोगल म्हणजे काय? आज्ञा झाली असता मोठ्या काळाच्या तोंडात देखील जाऊन सरकारचे पुण्यप्रतापे करून त्याचा बंदोबस्त करून घेऊ. तेथे मोगलांची काय कथा?” असे उद्गार काढत आपल्या वीस वर्षांच्या पराक्रमाचे जणू प्रतिबिंबच छत्रपतींना दाखविले.

काळाच्याही तोंडात जाऊन पराक्रम गाजविण्याची धमक ठेवणारा हा महाप्रतापी योद्धा ज्याने बंगशासारख्या मोगल सरदाराला उपासमार घडविली, कधीकाळी मुलतानपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपली दहशत ठेवणाऱ्या मुघल बादशहाला आपल्या दहशतीत आणले, औरंगजेबासारख्या कसलेल्या सेनापतीच्या हाताखाली तयार झालेला निजाम उल मुल्क चिनकीलीजखानासारख्या मल्लास चीत करणारा, आपल्या आगमनाच्या वार्तेने नादिरशहासारख्या बादशहास हिंदुस्थान सोडण्यास भाग पाडणारा, आपल्या पराक्रमाने आपल्या आईस शत्रूमूलखातही आदर मिळवून देणारा महापराक्रमी सेनानी ज्याने छत्रपतींच्या आज्ञेत मराठा साम्राज्याचे घोडे थेट हिमालयापर्यंत नाचविले आणि बंगाल, तुंगभद्रेपावेतो मराठा राज्याचे साम्राज्य केले, थोरल्या महाराजांचे, शिवछत्रपतींचे राज्य विस्तारले असा रणधुरंधर साहेब ए फुतूहात ए उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळविणारा श्रीमंत बाजीराव पेशवा!

साखरखेडल्याच्या लढाईत शत्रूच्या पराभवानंतर ह्या युद्धवीरास निजामासारखा व्यक्ती कधी  ‘शहामतपनाह’ म्हणजे शौर्यनिधी म्हणतो, कधी ‘महाराजांचा एक डोळा म्हणतो’, तर कधी दक्षिणेतील एकमेव मोहरा म्हणतो, तो रणभास्कर म्हणजे बाजीराव!

ज्याची कीर्ती ऐकून आणि ज्याचा पराक्रम पाहून दिपसिंहासारखा वकील ज्यास हुजुरमुजरदा म्हणजे राजाचा खास अधिकारी आणि चलन-साहेब-फौज म्हणतो, तो ईश्वरदत्त सेनानायक म्हणजे श्रीमंत बाजीराव बल्लाळ! शत्रूच्या मुलखात जाऊन आपल्या हल्ल्यांनी त्यास त्रस्त करणारा, शिवछत्रपतींसारखाच पराक्रम गाजविणारा ज्यास पोर्तुगीज अधिकारी ‘शिवाजीचा वंशज’ आणि पुढे प्रतिशिवाजी म्हणतो तो शिवरायांचा पाइक म्हणजे पेशवा बाजीराव!

उदयपूरच्या महाराण्याची भेट घेतांना राणा प्रतापाची आठवण काढणारा आणि त्याच राणा प्रतापाचा आदर म्हणून त्याच्या सिंहासनाखालील चौरंगावर बसणारा ज्यास हिंगणे ‘हिंदूंचा महादाश्रये’ म्हणतो, तो हिंदूधर्मरक्षक सेनानी म्हणजे बाजीराव बल्लाळ पंतप्रधान! आपल्या पराक्रमाने अनेक मुलुख छत्रपतींच्या अंमलाखाली आणणारा, ज्यास कुडाळचा नागसावंत ‘स्वाभिमानी दिग्वजई पुरुष’ म्हणतो, तो दिग्विजयकार म्हणजे बाजीराव!

आपल्या कर्तुत्वाने दिल्लीची बादशाही शून्यवत करणारा आणि ‘हस्तनापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील तर आज अनुकूल आहे’, असा प्रताप असणारा महाप्रतापी सेनानी म्हणजे बाजीराव! ज्याचा पराक्रम, अफाट शौर्य आणि त्यायोगे दिगंत कीर्ती पाहून क्षत्रियकुलावतंस छत्रपतींना तो लाखभर सैन्यासारखा भासतो , ज्याच्या ‘चित्तास क्षोभ करू नये’ म्हणून छत्रपती आज्ञा देतात, तो प्रतापनिधी म्हणजे बाजीराव!

असा ईश्वरदत्त सेनानी, अतुल्य प्रतापनिधी ज्याने हिंद महासागरापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत साम्राज्यविस्तार केला, ज्यास रिचर्ड टेंपल ‘incarnation of Hindu energy’ म्हणतो, तो दिगंत किर्तीचा मालक, अत्युच्च पराक्रमाचा नायक आणि अखंड विजयाचा अधिपति आज मात्र शस्त्र-अस्त्रांना मागे टाकून वेगळ्या आणि अखेरच्या लढाईची तयारी करत होता, आपल्या आयुष्याचे अखेरचे शौर्य गाजविण्यासाठी सज्ज होता.

वैशाख शु. १३, शके १६६२, फिरंग ता. २८ एप्रिल १७४० ह्या दिवशी त्या रामेश्वराच्या देवळात त्याच महापराक्रमी सेनापतीसाठी महामृत्युंजय मंत्राचे आवर्तने सुरू होते.पण अखेर हा अजिंक्य योद्धा आपल्या अखेरच्या मोहिमेसाठी निघाला. निजामासारख्या  शत्रूंना भेटणारा हा राजकारण धुरंधर आता मृत्यूला भेटत होता आणि अखेर साक्षात मृत्यूनेही त्याच्यासमोर तह केला आणि त्याने मृत्युलाही  हरविले. आज सुमारे २८० वर्षांनंतरही त्यांची असलेली दिगंत कीर्ती त्याच्या अजिंक्यत्वाची ग्वाही देते.

©अनिकेत वाणी

Leave a Comment