शनीदेव –
शनीदेव हा सुर्य व छाया यांचा पुत्र असून एक न्यायप्रिय देवता तथा क्रुर ग्रह म्हणून ही त्यास ओळखले जाते. शनीच्या नजरेत जी क्रुरता असते, ती त्याच्या पत्नीच्या शापामुळे असते. यासंबंधी ब्रम्ह पुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी, बालपणापासूनच शनीदेव हे भगवान श्री कृष्णाचे परमभक्त होते, ते कायम भक्तिरसात दंग असत, पुढे त्यांचा विवाह “चित्ररथकी” नावाच्या सुशील कन्येशी झाला.एके रात्री ती पुत्रप्राप्ती हेतू शनीदेवासमिप आली, मात्र शनीदेव निरंतर ध्यान,भक्तीत मग्न असल्याचे पाहून ती क्रोधीत होत शनीदेवास शाप देते की, ज्या गोष्टी ते पाहतील, त्याचे अस्तित्व च नष्ट होईल.तत्पश्चात तीला तिची चुक उमगली, मात्र दिलेल्या शापाचा प्रतिकार करण्याची शक्ती आता तिच्यात नव्हती. तेव्हापासून शनीदेव अधोमुख चालत, कारण त्यांच्या नजरेने कोणाचेही अनिष्ट होऊ नये असे त्यांना वाटत होते.
रुपमंडन या ग्रंथात शनी कृष्णवर्णीय, नीलवस्त्रे परिधान केलेला असल्याचा उल्लेख आढळतो. शनीदेवाचे अधिदेवता ब्रम्हा तर प्रत्याधिदेवता यमदेव असून शनीदेव मकर व कुंभ राशीचे स्वामी मानले जातात. ते एका एका राशीत तीस तीस महीने राहत असून त्यांची महादशा 19 वर्षाची असते. शनीच्या शांतीसाठी मृत्युंजय मंत्र,तथा शनीचे वैदीक, पौराणिक मंत्रजाप केला जातो, जप ध्यान संध्यासमयी करणे उचित असते.
शनीच्या स्वतंत्र प्रतिमा दुर्मिळ आहेत, कारण नवग्रह एकाच पाषाणावर कोरले जातात, ज्यास नवग्रह पट्ट म्हणतात. शनी शिंगणापूर या ठिकाणी सुद्धा दगडी शिळा आहे, मात्र या लहानश्या खेड्यात दुर्लक्षित अलीकडील काळातील शनी मुर्ती दिसून येते.
उपरोक्त शिल्पपटात शनीदेव द्विभुज, काक (कावळ्यावर) आसीन आहेत, तर उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्या हाताने कावळ्याच्या गळ्यातील दोरखंड पकडला आहे.
काक अर्थात कावळा हे शनीचे वाहन असण्याचे कारण म्हणजे शनीचा प्रवेश ज्याच्या आयुष्यात होतो वा ज्यास शनी ग्रासतो, त्याच्या आयुष्यात दुर्दैवाचे भय निर्माण होते. काक हा वाईट शक्ती, मृताचा आत्मा, दुर्दैवाचे भय व संदेशवाहक याचे प्रतिक आहे. कावळ्याच्या प्रतिकात्मक अर्थामूळे कावळा शनीचे वाहन आहे. परंतु काही ग्रंथात शनीदेवाचे वाहन महिष तर काही ग्रंथात गिधाड असल्याचे सांगितले आहे.
ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।
शं योरभि स्रवन्तु न:।।
Shrimala k. G.