शनिपार, पुणे | Shanipar, Pune –
मंडई परिसरातील बाजीराव रोडवरील शनिपार माहित नाही असा पुणेकर सापडणे विरळाच. तिथे पुण्यातील एक प्रसिद्ध आणि पुरातन असे शनि मारुती मंदिर आहे. जुन्या कागदपत्रांमध्ये इ.स. १८७१ पूर्वीपासून या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली दगडी पार होता. असा उल्लेख आढळतो. इ.स. १८९० मध्ये श्री. नारायण सदाशिव केळकर यांनी या पाराची दुरुस्ती करून इथे शनीची स्थापना केली. त्यापूर्वीची हनुमान प्रतिमा अजूनही इथे कायम आहे. सदर मंदिर हे पत्र्याने आच्छादलेले असून एका दगडी चौथऱ्यावर बांधलेलं आहे. मंदिराभोवती लोखंडी जाळी लावून ते चहुबाजूनी बंदिस्त केलेले आहे.
दोन-तीन पायऱ्या चढून मंदिरात गेल्यावर समोर मंदिरात डाव्या बाजूला मारुतीची शेंदूर-चर्चित उभी मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीवर शेंदुराची खूप आवरणे चढवल्यामुळे मुख्य मूर्ती नीट ओळखता येत नाही. मारुतीच्या मूर्ती शेजारी उजव्या बाजूला शनिदेवतेची मोठी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. सदर शनी मूर्ती हि चतुर्भुज असून, हातात आयुध व कमलपुष्प आहे. शनी देव एका पक्ष्यावर आरूढ आहे. शेजारी उंच समई सतत तेवत ठेवलेली असते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या छतास काचेच्या हंड्या टांगलेल्या आहेत. मुख्य मूर्तींच्या मागील बाजूस छोट्या देवळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हातात देवी भवानी तलवार देत आहे अशी चांदीची मूर्ती आहे. तसेच शंकराची पिंड व विठ्ठल रुक्मीणीच्या काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहेत.
शनिजयंती, हनुमान जयंती, शनिवारी, अमावास्येला आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होते.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे शहराचा ज्ञानकोश – डॉ. शां. ग. महाजन
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता : https://maps.app.goo.gl/EtgroWc8PXz3msE86
आठवणी इतिहासाच्या