शनिवारवाडा –
इ.स.१७१३ पासून पुढे जवळपास शंभर वर्ष मराठी राज्याची सर्व सत्ता पंतप्रधान पेशवा बालाजी भट आणि त्यांच्या घराण्यातील पुढील ५ पिढितील पुरुष यांच्या हातात पेशवे म्हणून होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या काळात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते. मराठ्यांच्या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व १० जानेवारी १७३० रोजी त्यांनी शनिवारवाडा या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला.
अतिशय जलदरित्या शनिवारवाडा या वास्तूचे बांधकाम करून शनिवार दि. २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुपुजन केले. या सुरवातीच्या वास्तूच्या बांधकामासाठी त्यावेळेस १६,११०/- रुपये खर्च आला व १५ रुपये ८ आणे वास्तुपुजेनिमित्त ब्राम्हणांना दक्षिणा म्हणून दिले असा उल्लेख उपलब्ध आहे.
एकूण ५ एकर जागेवर बांधण्यात आलेल्या वास्तूची मुख्य इमारत सात मजली होती. वाड्यात गणेश रंगमहाल, दिवाणखाना, आरसेमहाल, हस्तीदंती महाल, हजारी कारंजे, फुलबाग अशा वेगवेगळ्या वास्तू होत्या.
उत्तराभिमुख असलेल्या शनिवारवाडा या वाड्याला उत्तरेकडे दिल्ली दरवाजा, आग्नेयेकडे गणेश दरवाजा, नैऋत्येकडे नारायण दरवाजा, पूर्वेला जांभळी दरवाजा व ईशान्येकडे मस्तानी दरवाजा अशी एकूण ५ प्रवेशद्वारे व तटबंदीच्या भिंतीला एकूण ९ बुरुज होते. त्यातील उत्तरेकडील दिल्ली दरवाजा हे मुख्य प्रवेशद्वार होते. पुढे २४ फेब्रुवारी १८२७ साली लागलेल्या भयानक आगीत वाड्याच्या आतील सर्व प्रासाद भस्मसात झाले. दोन महाकाय षट्कोनी बुरुजामध्ये असलेला हा दरवाजा व त्यावरील नगारखाना आजही सुस्थितीत आहेत.
Shailesh Gaikwad