शंखूपाल यक्ष | आमची ओळख आम्हाला द्या –
अजिंठा लेणी क्रमांक १९ च्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस डावीकडे शंखूपाल यक्ष आहे. मागील लेखात आपण पाहिले की पद्मपाल आणि शंखूपाल हे दोन यक्ष या ठिकाणी द्वारपालाच्या रूपात अंकित केलेले आहेत. त्यापैकी कालच्या लेखात आपण पद्मपाल यक्षाची विस्तृत माहिती घेतलेली आहे. बौद्ध धर्मात यक्षास विशेष महत्त्व आहे. धनाची देवता म्हणून ज्या पद्धतीने कुबेरास ओळखले जाते त्याच पद्धतीने पद्मपाल व शंखूपाल ह्या दोन यक्षास ओळखले जाते.
प्रस्तुत शिल्प हे लेणी क्रमांक १९ च्या डाव्या बाजूस आहे. हा शंखूपाल यक्ष देखील द्विभूज असून अर्ध समपाद-अवस्थेत उभा आहे. याच्या उजव्या खालच्या हातात मोहर सदृश्य (नाणी) वस्तू असून डावा हात मोठ्या खुबीने कमरेवर ठेवलेला आहे. डोक्यावर मुकुट असून, मुकूटातून डाव्या खांद्यावर मोकळा सोडलेला केशसंभार अवर्णनीय असाच आहे. कानात चक्राकार कुंडले, कंठाहार, ग्रीवा, उदरबंध, स्कंदमाला, केयूर, कटकवलंय, कटिसूत्र ,यज्ञोपवीतसदृश मोत्याचा अलंकार यांनी परिधान केलेला आहे.
नेसुचे वस्त्र कमरेखाली सरकले असून त्यातून त्याचे वाढलेले पोट स्पष्ट दिसत आहे. कान, नाक ,डोळे इत्यादी अवयव स्पष्ट व ठसठशीत आहे .डोळे पूर्णता मिटलेले आहेत. चेहऱ्यावर स्मितहास्य व दिव्य तेजाची उधळण करायला शिल्पकारांनी काटकसर केलेली नाही. एकंदर याचे अलंकरण पाहता ही धनाशी संबंधित देवता असल्याचे जाणवते.सुटलेले पोट, बलदंड शरीर यामुळे तो नक्कीच श्रीमंत असल्याची खात्री होते .त्याच्या उजव्या पायाजवळ त्याचा गण त्याच्या दिव्या चेहऱ्याकडे पहात उभा आहे. त्याने त्याच्या हातात देठासह पुष्प धारण केलेले आहे. याचेही शरीर लठ्ठ सुटलेले पोट मोजकेच पण नजरेत भरणारे दागिने परिधान केलेले आहेत.
शंखूपाल यक्षाच्या वरच्या बाजूस महिरपामध्ये मानवी चेहरे अंकित केल्याचे दिसून येते. शंखूपालाच्या चेहर्या मागील प्रभावलय हे ठसठशीत असल्याने चेहरा अधिकच उठावदार दिसत आहे. अशा पद्धतीने लेणी क्रमांक १९ येथील पद्मपाल व शंखूपाल या दोन्ही पक्षाची माहिती आपणास घेता येईल.
डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्तीअभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ सोलापूर.