सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी –
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, “मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते.”
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत. डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
– ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद