शेगाव संस्थान एक उत्तम व्यवस्थापन केंद्र :
मंदिराचे व्यवस्थापन म्हणजे एक अत्यंत व आदर्श व्यवस्थापन व श्री शिवशंकरभाऊ पाटील. बुलडाणा या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यात असलेल्या शेगावमधील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थानचे ते प्रमुख आहेत. राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समितीचे सदस्य त्यांना भेटले. शिवशंकरभाऊंचे वय अवघे ८८ वर्षे. चेहºयावर सुरकत्या असल्या तरी प्रदीर्घकाळ केलेल्या सत्कार्याच्या समाधानाचे तेज त्या सुरकत्यांमधून सकाळच्या कोवळ्या पण ऊबदार सूर्यकिरणांसारखे पसरत असते.बोलताना क्षणाक्षणाला ते भावनिक होतात, लगेच डोळ्याच्या कडा पाणावतात. मग ते स्वत:च काहीतरी मिश्किल बोलून वातावरण हलकंफुलकं करतात. ‘भाऊ पद्मश्री, पद्मभूषण तुम्हाला सरकारनं देऊ केले पण तुम्ही ते नम्रपणे नाकारले, असं का? त्यावर भाऊंचे उत्तर हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. ते सांगतात, ‘अहो! माझा हात माऊलींच्या (गजानन महाराजांच्या) चरणांवर असतात, उद्या पुरस्कार घ्यायला गेलो तर माऊलींच्या चरणांवरील हात हटतील नं माझे! ते कधीही हटू नयेत अशी माझी मनोमन इच्छा आहे म्हणून मी कुठलाही पुरस्कार नाकारतो.
शेगावच्या अवाढव्य संस्थानचा कारभार शंभर टक्के पारदर्शक असा आहे. स्वत: भाऊ किंवा कोणीही ट्रस्टी संस्थानमधील पाणीही पित नाहीत. जेवणाचा डबा घरून आणतात. आज संस्थानमध्ये तब्बल ११ हजार सेवेकरी आहेत. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. त्यात आबालवृद्ध, गावखेड्यातील मुलामाणसांपासून नोकरदार, बड्या कंपन्यांमधील अधिकारीही असतात. ३ हजार सेवेकरी सेवेची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सेवेकºयांचे वैशिष्टय म्हणजे त्यांना नेमून दिलेलं काम ते नेटानं करतात. उगाच दुसरीकडे लुडबूड करीत नाहीत. भक्तनिवास परिसरातील झाडांची पाने उचलण्याचे काम नेमून दिलेला सेवेकरी पान झाडावरून खाली पडण्याच्या आतच झेलतो, असे शिवशंकरभाऊ कौतुकमिश्रित नजरेनं सांगतात. या सेवेकºयांच्या राहण्याजेवण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी संस्थान करते.दहा सेवेकºयांपासून या अभिनव संकल्पनेला सुरुवात झाली ती ऐंशीच्या दशकात. आजूबाजूच्या खेड्यातून आलेले दहा सेवेकरी सायंकाळी संस्थानमध्ये जमले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती त्या खोलीत जाऊन शिवशंकरभाऊंनी डोकावले तर त्यांना धक्काच बसला. लाल मिलो ज्वारीच्या भाकरीवर मीठ, पाणी टाकून ते खात होते. भाऊंनी विचारलं, अरे बाबा! तुम्ही सेवेकरी म्हणून आले आहात तर संस्थांनमध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारच आहोत ना! त्यावर, ते सेवेकरी म्हणाले, ‘भाऊ! आम्ही सेवेकऱ्याचे काम उद्यापासून सुरू करणार आहोत मग आज आम्ही संस्थानमधील जेवण कसे जेवणार? त्याच क्षणी भाऊंनी निर्णय घेतला, आजपासून संस्थांनमधील पाणीही ते पिणार नाहीत. वर्षभरातील तीन महाप्रसाद सोडले तर भाऊंनी ते व्रत आजही तंतोतंत पाळलं आहे. इतर ट्रस्टींनी त्यांचं अनुकरण केलंय. मंदिरात कमालीची शिस्त, स्वच्छता, पावित्र्य जपले आहे.
‘भक्तांचा हात धरुन त्यांना माऊलींच्या चरणी पैसे टाकण्याची जबरदस्ती करणाºया बडव्यांना इथे स्थान नाही. ते सगळे चंद्रभागेच्या तिरी. हजारो भक्तांची निवासाची सोय करणाºया भक्तनिवासांमधील टापटीप वाखाणण्यासारखी आहे. संस्थानमार्फत एकदोन नाही तर तब्बल ४२ सेवाप्रकल्प चालविले जातात.
बुलडाणा जिल्ह्यातील हजारो लोकांना मोफत आरोग्य सेवा गावोगावी दिली जाते. आबालवृद्धांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांना अध्यात्माची शिकवण देणारा आनंदसागर हा अनोखा पार्क ही शिवशंकरभाऊंच्या कर्तृत्वाची आणखी एक देण. समाजाला केवळ बोधामृत पाजण्याऐवजी कर्मयोगाचे उदाहरण घालून दिलेला हा तपस्वी आहे. शेगावच्या आधी वा नंतर ज्या संस्थांनचे नाव घेतले जाते त्याचे अध्यक्ष मध्यंतरी भाऊंच्या भेटीला आले; काही मार्गदर्शन करा म्हणाले. भाऊ एवढेच म्हणाले, ‘आमच्या संस्थानचे बजेट दीडशे कोटींचे आहे. तुमच्या संस्थानची तूप खरेदीच तीनशे कोटींची आहे असं मी ऐकतो. असे खर्च कमी करा. बाकी काय सांगू. श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवेचा हा पॅटर्न सगळ्या संस्थानांनी स्वीकारला तर सेवाकार्याचे एक मनोहारी विश्व तयार होईल यात शंका नाहीच.
vidarbha-darshan.blogspot.com