शेषशायी विष्णू मंदिर –
नारायण पेठेत #श्री_माणकेश्वर_विष्णू_मंदिराजवळ अजून एक अपिरीचीत विष्णू मंदिर आहे. माणकेश्वर विष्णू मंदिरावरून अप्पा बळवंत चौकाकडे जातांना केळकर चौकात उजव्या हाताला श्रीकृष्ण ब्रास बॅण्ड आणि माने गादी कारखाना यांच्यामधे असलेल्या बोळातून आत गेले कि समोर झाडांच्या गर्दीत असलेल एक छोटस कौलारू मंदिर दिसते, तेच अपरिचित #शेषशायी_विष्णू_मंदिर
ही विष्णुंची मूर्ती धातूची आहे. मूर्तीच्या उजव्या खालच्या हातात गदा, उजवा वरचा हात मानेखाली डोक्याला आधार देणारा उशीसारखा घेतलेला, डाव्या वरच्या हातात शंख धरलेला असून डावा खालचा हात मांडीवर ठेवलेला आहे. म्हणजे विष्णूच्या शंख, चक्र, गदा, पद्म यांपैकी चक्र व पद्म येथे नाहीत. विष्णूचा उजवा (दर्शनी) पाय लक्ष्मीच्या मांडीवर असून ती तो पाय चेपताना दाखविली आहे. लक्ष्मीची केश व वेषभूषा आणि अलंकार पेशवे काळातील स्त्रीप्रमाणे वाटतात. या धातुमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पद्मनाभ आहे. म्हणजे विष्णूच्या बेंबीतून लांब देठाचे कमळ दाखविले आहे. त्या कमळात चार तोंड, दोन हात असलेली ब्रह्मदेवाची छोटी मूर्ती आहे. ही ब्रह्मदेव मूर्ती व कमळ सुटे करता येतात. हि वैशिष्ट्य पुर्ण मूर्ती एकमेव आहे.
या मूर्तीसमोर माथ्यावर शिवलिंग असणारा संगमरवरी समाधी चौधरा आहे. केशव नारायण दामले म्हणजे स्वामीं सच्चिदानंदांची ती समाधी आहे. १९०६ मध्ये केशवराव दामल्यांनी काशीला संन्यास घेतला. १९१० मध्ये त्यांनी येथे संजीवन समाधी घेतली. हे मंदिर तेथील विश्वस्तांच्या ताब्यात आहे. देवळाची व्यवस्था ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग ठेवणे परवडत नाही. कारण मंदिराला उत्पन्न नाही. देखरेखीसाठी कोणीही नसल्याने सकाळी पूजेची ९:०० ते ९:३० हि वेळ वगळता मंदिर बंद असते. मंदिराची सध्याची अवस्था फारच वाईट आहे. लोकसहभागातून किंवा लोकप्रतिनिधींमार्फत मंदिराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे.
संदर्भ :
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/gaVW1HntJao5fR1d7