शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन –
ज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे.(शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन)
देव आपल्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या बाजूला वासुकीच्या शेपटाचा भाग आहे. दानव डाव्या बाजूला आहेत त्या बाजूला नेमका नागाचा फणा दाखवला आहे. जेणेकरून विषाची बाधा दानवांना व्हावी.
विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात. असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे.
परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. इतरही जिल्ह्यात असा पुढाकार जिल्हाधिकार्यांनी घ्यावा. त्याला सर्व इतिहास प्रेमींनी सहकार्य करावे ही अपेक्षा.
छायाचित्र सौजन्य – Malharikant Deshmukh.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद