महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,38,592

शिबरा डोंगर किंवा शिब्रा डोंगर

By Discover Maharashtra Views: 1292 4 Min Read

शिबरा डोंगर किंवा शिब्रा डोंगर –

किल्ले राजगड एका बाजूने गुजंवणी तर दुसऱ्या बाजूने वेळवंडी नदी वाहते.राजगडच्या संजीवनी माची पासून ते सरळ भोर तालुक्यातील संगमनेर या गावाच्या हद्दीपर्यत जी डोंगर रांग आहे त्यास दोन्ही नदीच्या खो-यातील अनेक गावातील लोक शिब्रा डोंगर म्हणून संबोधतात.शिब्रा किंवा शिबरा म्हणजे बसकट, नकटा किंवा विशोभित असा अर्थ होतो.गुंजवणे खोरे व भुतोंडे खोरे याची विभागणी करणारा शिबरा डोंगर होय.

जागतिक महामारीचा प्रकोप सुरू झाल्याने शासनाने अडीच महिने पर्यंत कुलूपबंद सुरू केले होते. मात्र नुसतेच या कुलूपबंदच्या नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.आठवड्यापूर्वी भुतोंडे खो-यातील याच डोंगरावर असलेल्या फणस, आंबा, करवंदे, आळू इत्यादी नैसर्गिक रानमेव्याचा आनंद घेतला होता तर दोन दिवसांपूर्वी किल्ले रोहिडाचा पायथा गाठला होता.मानवी जीवनाच्या प्रत्येक गरजा हा निसर्ग पूर्ण करीत असतो. वसुंधरा ही आपली जिवनदायनी आहे, मातृभूमी आहे.अशा या वसुंधरे कडे नेहमीच आकर्षित होत असतो.निसर्गाच्या सानिध्यात तन-मनाला आलेली मळभ दूर होऊन नवचैतन्य येते.

आयुष्यातील विविध संकटांशी लढण्याची उर्जा, शक्ती मिळते.अपरिहार्य कारणांमुळे कुलूपबंदीच्या नियमा मध्ये मिळालेली सवलत व मृग नक्षत्राचा पहिला दिवस म्हणजे ७ जून. उन्हाळ्याच्या उष्णतेने भेगाळलेली वसुंधरा मृगाच्या पावसाची आतुरतेने वाट पाहते तर त्या पावसाने आसमंतात दरवळणारा मातीचा सुगंध आम्हा भटक्यांना आकर्षित करतो. असेच आमचे काही सोबत्यांच्या बरोबर भोर तालुक्यातील खंडोबाच्या माळ ( नेकलेस पाॕईंट) येथील शिब्रा डोंगरावर जाण्याचे निश्चय झाले.सकाळी ९:३० आम्ही खंडोबा माळ येथे एकत्र झालो.

प्रथम  माळावरील खंडोबाचे दर्शन घेऊन डोंगराकडे चढणीस सुरूवात केली.पुढे स्थानिकांच्या माहिती प्रमाणे असलेल्या ऐतिहासिक कोयाजी बांदल समाधीस भेट दिली. अनेक दिवसांनी आज निसर्गाच्या सानिध्यात निघालो होतो त्यामुळे विशेष उत्साह होता.अर्ध्या पाऊन तासात निम्मा डोंगर चढलो होतो. पूर्वेकडील असलेला नेकलेस पाॕईंट येथून वेगळा भासत होता तर भाटघर धरण परिसर,संगमनेर गावाचे दृश्य सुरेख होते.थंडगार वारा शरीराला मना उत्तेजित करीत होता. याच वाटेवर एका चार फूट उंचीच्या लहान झाडाला लहान लहान गुलाबी रंगाची फळे लागली होती.त्या झाडाचे नाव ज्ञात नाही मात्र त्या फळांचे प्रकाशचित्र चलभाष मध्ये घेतले.तेथून उजव्या हाताने प्रवास सुरू झाला.

काही अंतरावर गतवर्षी झालेल्या जल प्रकोपाने झालेले भूस्खलन दिसून आले.माती व दगड पाण्याच्या प्रवाहाने वाहून आले होते. यातील मातीच्या भागावर इवलेसे लहान पिवळ्या रंगाचे रोप जमिनीतून वर आले होते.कितीही संकटे आली तरी आम्ही फुलायचे थांबणार नाही असाच त्याचा थाट होता.

मग आम्ही तीव्र असलेल्या उताराने प्रवास सुरू केला. एका लहान दरीतील पाण्याच्या प्रवाह वाहणाऱ्या मोठ्या खडकात शेजारी शेजारी अशा दोन प्राचीन गुहा आहेत. यापैकी उजव्या बाजूची गुहा सुरूवातीला आठ फूट उंचीची असून पुढे अरुंद होत गेली आहे.तर दुसरी गुहा तुलनेने मोठी असून या दोन्हीही गुहा अंतर्गत भागातून एकमेकांशी जोडलेल्या आहेत.दोन्हीही गुहांच्या आतील भाग निमुळते होत गेल्यामुळे निश्चितपणे किती लांब आहेत हे सांगता येत नाही. निसर्गाने सह्याद्रीच्या डोंगर रांगात अनेक अशा गुहा निर्माण केल्या आहेत मात्र त्यांना  मानवी हातांचा स्पर्श झाल्याने निश्चित रूप आले आहे. येथील मोठ्या गुहेच्या वरील बाजूस एक पायर वृक्ष आहे.

खडकात आपले अस्तित्व सांभाळण्यासाठी त्याची मुळे दगडातून गुहेच्या एका बाजूला असलेल्या जमिनीकडे गेली आहेत. या वृक्षाच्या मुळांचे खडकात एक भुमितीय आकृती झालेली नक्कीच प्रेक्षणीय असून त्याचे चलभाषने घेतलेले प्रकाशचित्र संलग्न केले आहे. या प्राचीन निसर्ग व मानव निर्मिती गुहांनी त्याकाळी मानवाच्या जिवित्वाचे संरक्षण केले आहे. परकीय आक्रमक व पाळेगार जेव्हा गाव लुटण्यास येत तेव्हा गावातील वृद्ध ,महिला, व लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी या गुहांचा उपयोग होत होता. आज मात्र आधुनिक जगतात या गुहांचे मोल राहिले नाही म्हणून उपेक्षित आहेत. मात्र आपल्या पूर्वजांना संरक्षण देणाऱ्या या प्राचीन वारसा स्थळास नक्कीच एकदा भेट द्यायला हवी ना ?

© सुरेश नारायण शिंदे, भोर

Leave a Comment