कोकणातील शिमगोत्सव –
कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते, अगदी तसंच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव सुमारे ३० ते ४० दिवस असतो.
फाल्गुन पंचमीच्या दिवशी छोटी होळी लावली जाते महाशिवरात्रीच्या पाच ते सहा दिवसांनी सुरू होते. कोकणात काही ठिकाणी या होळीला फाग पंचमीची होळी असं म्हणतात. फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे म्हणजे देवीच्या अलंकारिक मूर्त्या ठेवून पालखी फुलांनी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची.
मुख्य होम म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. संध्याकाळपर्यंत होळीच्या माळावर म्हणजे दरवर्षी होळीचा होम जिथे असतो त्या जागेवर. १२०० ते १५०० किलो वजनापर्यंत ची लाकडं, पेंढा, गवत आणि मागच्या वर्षीचा होळीचा जो कोळशाचा मोठ्ठा खुंट राहिला असेल तो घेऊन एका मोठ्या खड्यात रोवून होळी सजवली जाते. सुमारे ३० फुटांचा व्यास असलेला वर्तुळाकार खड्डा आणि सुमारे ५० ते ७० फूट उंच होळी रचली जाते.
होळीची विधिवत पूजा करून पालखीची प्रदक्षणा होते, आणि आरती वैगेरे करून मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमाभोवती पाच प्रदक्षिणा घालत नारळ आणि दूध देतात. तो एक महत्त्वाचा विधी असतो. गावातील जाणती वयात आलेली मुलं होळी भोवती फिरून होमात टाकलेला नारळ काढण्यासाठी पुढे जातं. जेवढे जास्त नारळ तेवढा मोठा पराक्रम त्यामुळे होमात टाकलेल्या नारळ काढण्यासाठी त्यामुलांची स्वताःचा पराक्रम सिध्द करण्यासाठी स्पर्धा लागते. मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाणकार गावकरी होळी रे होळी पुरणाची पोळी…. किंवा ग्रामदेवतेच नाव घेऊन मोठ्या मोठयाने ओरडत.
दुसऱ्या दिवशी पहाटे होम झाल्यावर आंघोळ -देवपूजा उरकून गावकरी परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून “गार्हाणे” नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर गावची सभा असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. धुलीवंदनाच्या दिवसा पासून ते गुढीपाडव्या पर्यंत देव म्हणजेच देवाची पालखी देवळातून उठून गावातली प्रत्येक घरात जाते. देवळातून निघालेली पालखी वाजत, गाजत, नाचवत, संपूर्ण गावातील घरे व सामान्यांच्या घरी आपल्या भक्तांना भेटायला जाते. आपल्या घरात जर आवडता पाहुणा येणार असेल तर त्याच्या स्वागतासाठी आपली अवस्था काय करू नी काय नको अशी होते तर गावचा देवच आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावर त्या घरातला उत्साह किती असेल.
गोमंतकातील किंवा कोकणातील होलिकोत्सवाची रंगत वर्णन करताना पं. महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे – शिमगा म्हणजे पालथा हात तोंडाला लावणे, शिमगा म्हणजे बीभत्स, अर्वाच्य बोलणे हे समीकरण आम्हा गोमंतकीयांना आणि कोकणवासीयांना मान्य नाही. आमचा शिमगा गातो, नाचतो, वाजतो आणि खेळतो. आमची होळी जळत नाही, तर उभी राहते. गावोगावच्या ग्रामदेवतेच्या देवळांसमोर ती उभी केली जाते. त्यासाठी काही दिवस आधीच एखादा सडेतोड पण बेताचा वृक्ष हेरून ठेवला जातो. होळीच्या रात्री गावकरी ढोलकी वाजवत त्या वृक्षाकडे जातात, त्याची पूजा करून तो तोडतात, त्याच्या फांद्या छाटतात आणि तो पंधरा-वीस हात उंचीचा उभाच्या उभा सोट गावकरी लोक खांद्यावर घेऊन नाचवत देवळाकडे येतात. तेथे खोल दर तयार असतो. त्यात तो वृक्षाचा सोट उभा करतात. त्याच्या टोकावर एक असोला नारळ ठेवतात आणि त्याच्या शेजारी एक कागदी झेंडा अडकवतात. मग होळीला हळदकुंकू वाहतात, नारळ फोडतात आणि जी काय बोंबाबोंब करायची ती त्यावेळी करतात.
एवढे दिवस शिमगा साजरं करण्याचं कारण म्हणजे, शिमगा फाल्गुन महिन्यात येतो. हा काळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत असण्याचा काळ असतो. कारण या काळात कोकणातील शेतीची सर्व कामं संपलेली असतात. शेताची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलं जातं. जुन-जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते. पाऊस आल्या नंतर क्षणभर बसण्याची उसंत देखील नसते. तेंव्हा देवासाठी वेळ नसणार त्यामुळे या काळात शेतकरी निवांत असतो. म्हणून या निवांत कळत कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. शिवाय कोकणात विविध देवतांची मंदिरे आहेत. या निमित्ताने ग्रामदेवतांची पालखी काढून, पुजा-अर्चा करून सण साजरा केला जाते. धावपळीच्या काळात थकलेल्या जीवांना विसावण्याचं एक निमित्त मिळतं. ग्रामस्थही या काळात आपापसातील भांडण, तंटे विसरून एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात. कोकणातील शिमगोत्सव शिमग्याचं सोंग, बोंबा मारणं, दशावतार अशा गोष्टींमुळे गावी वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो.
लेखन – विजयश भोसले ©