महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,846

राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा

By Discover Maharashtra Views: 1899 3 Min Read

राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा –

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्याच्या गावी शूर मराठा सरदार राणोजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे. श्रीगोंदा हे गाव नगरपासून ६५ कि.मी अंतरावर आहे. गावात सरदार शिंदे आणि त्यांचे साथीदार मोकाशी(लांडगे), पाठक, रेगे यांचे वाडे आहेत. राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा शिंदेंच्या वाड्यात शाळा भरते. गावात बाहेर सरस्वती नदीच्या तीरावर मैनाबाईंचा महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी   मैनाबाई राणोजींच्या पत्नी, सखुबाई जयाप्पांच्या पत्नी, रतीबाई दत्ताजींच्या पत्नी यांची घडीव दगडातील तुळशीची वृदांवने आहेत. तसेच राणोजींचे स्मारक व इतर काही समाधी आहेत.

राणोजी शिंदेंचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कन्हेरखेड हे होय. सुरवातीला औरंगजेबाच्या चाकरीत असलेले शिंदे घराणे शाहूराजांची मुलगी अंबिकाबाई यांना या घराण्यात दिले व पुढे ते मराठ्यांचे निष्ठावंत सरदार झाले. पालखेडच्या लढाईत राणोजी होते. त्या वेळी बाजीरावांना  त्यांनी एका पत्रातून लिहिले की, ‘ज्या प्रकारची आज्ञा होईल, त्याप्रमाणे वर्तू भिऊन पुढे चालावयास अंतर करणार नाही. प्रसंग पडलाच तर स्वामींचे पुण्य समर्थ आहे. आमचा सांभाळ ईश्वर करीतच आहे. इ.स.२२ फेब्रुवारी १७२८ च्या सुमारास निजामाचा फाजलवेग नावाचा सरदार लोणी-पारगाव, सुपे, पाटस या ठाण्यांवर चालून आला असता राणोजी शिंदे यांनी पाटसचे ठाणे अतिशय शिकस्तीने सांभाळले. त्यासंबंधीचे वृत्त त्यांनी ज्या पत्रातून कळविले त्यातून बाणेदारपणाचे दर्शन होते. सन १७३१-३२ मध्ये माळवा प्रांताच्या सनदा पेशव्यांनी करून दिल्या, त्यात मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, तुकोजी पवार, जिवाजी पवार यांना माळवा प्रांताची वाटणी करून दिली. सन १७३४ मध्ये झालेल्या बंगशावरील मोहिमेत राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, रामचंद्रबाबा यांनी एकदम बुंदीवर हल्ला चढवून ते स्थळ मिळविले.थोरले बाजीराव पेशवे वारल्यावर त्यांची रावेरखेडी येथे समाधी बांधण्याबाबतीत राणोजींचा विशेष सहभाग होता.

राणोजी शिंदे यांचा मृत्यू इ.स.३ जुलै १७४५ रोजी मिर्झापूर प्रांत सुजालपूर भोपाळजवळ येथे झाला. यासंबंधी जयाजी शिंदे पेशव्यांना लिहितात: ‘मौजे मिर्झापूर प्रांत सुजालपूर येथे तीर्थरूपांस कैलासवास जाला. त्या स्थलावरील छत्री करावयासी दोघे सिलाट पाठविणे.’ राणोजींच्या पत्नी मीनाबाई (मैनाबाई) या श्रीगोंदे येथे राहात होत्या. त्यांना १९ जुलै १७४५ ला पेशव्यांनी दुखवटा पाठविला. मृत्यूच्या वेळी राणोजींजवळ त्यांचे पुत्र जयाप्पा होते. त्यांनी आपल्या तीर्थरूपांचे उत्तरकार्य मिर्झापूर येथे करून रक्षा उज्जनीस आणून क्षिप्रातीरी टोलेजंग छत्री बांधली. त्या गावास राणीगंज’ असे नाव ठेवले व छत्रीस इनाम दिले.

टीम – पुढची मोहीम.
साभार – डाॕ सदाशिव शिवदे सर.

Leave a Comment