शिरपूर : कथा अदृश्य विष्णू मंदिराची…
पुराणात ज्याचा उल्लेख श्रीपूर असा येतो ते म्हणजे प्राचीन काळातील समृद्धशाली ऐतिहासिक नगर शिरपूर.! अगदी ब्रिटिश काळात जेथे पोलीस यंत्रणेचे प्रमुख ठाणे होते जे मालेगाव पूर्वीचे आहे.
शिरपूर येथील संत श्री जानगीर महाराज संस्थान, विश्वकर्मा मंदिर, प्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ आणि दिगंबर पवळी जैन मंदिर, तुकामाई समाधी मंदिर, श्री बसवेश्वर मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, राम मंदिर, भवानी आई मंदिर, अमानशहा बाबाची दर्गा हे सर्वास ठाऊक आहेत. मात्र याच नगरात कधीकाळी सुंदर दगडी बांधणीचे विष्णू मंदिर होते असे म्हटले तर..! तर चला भूतकाळातील अदृश्य रुपी देवालयाच्या शोधात..!
काही दिवसांपूर्वीच करंजी येथील मंदिराविषयी चर्चा करताना डॉ. विजय उल्हामाले यांनी शिरपूर येथे श्रीविष्णू मूर्ती सापडल्याचा उल्लेख केला. ऐकल्यावर मोठे कुतुहल निर्माण झाले. म्हणून ती मूर्ती व इतर अवशेषांचा शोध घेण्यासाठी दुसऱ्याच दिवशी(१२ मे) शिरपूर जाण्याची योजिले. कारण इतिहास अनुभवण्यासाठी भूगोल गाठावाच लागतो.!
सकाळी शिरपूर येथील विष्णू मूर्तीच्या शोधात भवानी संस्थान शिरपूर येथे पोहोचलो. येथे आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात एका प्रचंड मोठ्या शिळा स्तंभाचा भाग दिसला. प्रस्तुत शिळा ही मंदिराच्या द्वारावरील द्वार शाखेचा भाग असल्याचे लक्षात येते. द्वार शाखेवरील द्वारपाल आणि त्यावरील सुंदर नक्षीकाम केलेला अर्धस्तंभ कोरलेला आहे. शिळेवर तीन प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यापैकी एक प्रतिमा चतुर्भुज असून किरीट मुकुट धारण केलेली आहे. हातात गदा शंख, गदा आणि एक हात अभय मुद्रेत आहे. अर्थात हे शिल्प वैष्णव द्वारपालाचे असावे. वैष्णव द्वारपालाच्या डाव्या बाजूस निधी गदा धारण कली आहे. आणि कोना मध्ये जलदेवता गंगा/यमुना हातामध्ये कलश धारण केलेली आहे. या सर्व शिल्पांवरील कंठहार, पायातील आभूषणे खूपच सूक्ष्मरित्या कोरलेली आहेत. अर्थात समृद्धशाली कारागिरीचे हे प्रमाण आहे.
अशी ही शिल्पं द्वार शाखेचे आहेत. वैष्णव द्वारपालावरून प्रस्तुत शिल्प हे गतकाळातील विष्णू मंदिराचे असल्याचे समजते. एकूणच या क्षेत्रात कुठेतरी विष्णू मंदिर होते जे आता नष्ट पावले आहे.
अर्थात या शिळा आता भवानी मंदिराच्या आवारात असल्या तरीही त्या गावातून आणल्या आहेत.
पण मुख्य प्रश्न राहिला तो शेतामध्ये सापडलेल्या विष्णू मूर्तीचा. त्याविषयी परिसरात विचारणा केली असता तेथील स्थानिक श्री भागवतभाऊ बोराटे यांनी प्रस्तुत मूर्ती नगरनाईक यांच्या शेतात असल्याचे सांगितले. तसेच ती शोधण्यासाठी सहकार्य केले. मोटरसायकलने शेलगाव (बोंदाडे) या रस्त्याने काही अंतरावर गेल्यानंतर एक रस्ता जहांगीर महाराज संस्थान कडे वळतो. संस्थांकडे जाणाऱ्या या मार्गावर नगरनाईक यांचे शेत आहे. या शेतात विहिरीजवळ काही दगडी शिळा दिसल्या. अधिक शोध घेतल्यावर एका सिमेंटच्या ओट्यावर शेषशायी विष्णूची मूर्ती दिसली. अर्थात हीच ती मूर्ती जी नगरनाईक यांना सापडली होती.
प्रस्तुत मूर्ती शिल्प हे प्राचीन असल्याचे लक्षात येते. मात्र आता त्याची बरीच झीज झाल्याने मूर्तीवरील बारकावे स्पष्ट दिसत नाहीत. तरी बघता क्षणी शेषशायी विष्णू आणि पायाशी लक्ष्मी असल्याचे लक्षात येते.
मूर्ती साधारणपणे आयताकृती असून तीन फूट लांबी व दीड फूट रुंद एवढी आहे.
शेषशायी विष्णू या प्रतिमेचा अभ्यास केल्यावर काही गोष्टी लक्षात येतात-
शास्त्रा नुसार विष्णुला ‘शांन्ताकार भुजगशयनं’ असे संबोधतले जाते. शेषशायी विष्णाचे हे रुप काळावर लक्ष ठेवण्याचे कार्य करते. शेषावर असल्याने विष्णुला ग्रह नक्षत्र तारे यावर नियंत्रण ठेवायला सोपे जाते. हे सर्व ग्रह, तारे शेषाच्या कुंडलीत बांधले गेले आहेत. शेष अर्थात अनंत(infinity). येथे अनंत अर्थात शेषावर विष्णूने शयन केले आहे असे दाखवले आहे. नाग हे आत्मा आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे.
या मूर्ती शिल्पाच्या वरील मध्यभागी कोष्टकात विष्णूच्या नाभीतून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाचे शिल्प आहे. अर्थात ते अस्पष्ट आहे. मूर्तीची बरीच झीज झाल्याने आयुधे व इतर शिल्पे लक्षात येत नाहीत.
प्रस्तुत मूर्ति चतुर्भुज असल्याचे लक्षात येते. डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्या मते विष्णूचे चार हात चार दिशांचे अर्थात विष्णूची शक्ती सर्वत्र पसरलेली आहे याचे प्रतीक आहे.
चतुर्भुज विष्णूच्या एका हातात कमळ कळी तर एक हात मानेखाली दिसतो. इतर हातांमध्ये चक्र व शंख असावेत.
प्रस्तुत मूर्ती शिल्पा मध्ये विष्णूचा एक पाय लक्ष्मीच्या मांडीवर तर एक पाय गुडघ्यातून वाकलेला आहे. शेषाच्या शय्येवर असलेल्या विष्णूच्या डोक्यावर (पंचमुखी) नाग फण आहे. पंचमुखी नाग हा पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. विष्णूने किरीट मुकुट धारण केलेला आहे. वैजयंतीमाला आणि आभूषणे अस्पष्ट आहेत. विष्णूच्या शेषशायी मूर्तीचा विविध ग्रंथात वेगळ्या नावाने उल्लेख आहे. शेषशायी, अनंतशयीन व जलशयीन या नावाने या मुर्ती ओळखल्या जातात. विष्णूधर्मोत्तर पुराणात विष्णूच्या शयन मूर्तीचा उल्लेख पद्मनाभ या नावाने झाला आहे. या ग्रंथातील वर्णनाच्या अनुसार पद्मनाभ जलात असलेल्या शेषनागाच्या शय्येवर विश्राम करीत असतो त्यावेळी त्याचा एक पाय लक्ष्मीच्या मांडीवर दुसरा समांतर असतो. विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळावर ब्रह्मा असीन झालेला आणि कमल नालाच्या समीपच असुरांच्या आकृती असतात. शेषनागाच्या समिप विष्णूची आयुधे पुरुषाच्या रूपात असतात. मात्र प्रस्तुत शिल्पात फारसे काही स्पष्ट रूपाने दिसत नाही.
वाशिम ही ६ व्या शतकातील वाकाटकांची राजधानी, जे विष्णूचे उपासक होते. अनेक ठीकाणी विष्णूच्या लहान-मोठ्या सुंदर मूर्ती आढळल्या आहेत. अर्थात प्रस्तुत मूर्ती वाकाटक कालीन आहे असे अनुमान काढता येत नाही. वातापिचे चालुक्य हे सुद्धा विष्णू भक्त होते. गुप्तकाळातही शेषशायी मूर्त्या निर्माण झाल्या. मूर्तीचा कालखंड सांगता येत नसला तरी तो सामान्यपणे हजार वर्षांपूर्वीचा असावा असे मत आहे दावा नाही.
असो, ज्यांच्या शेतात ही मूर्ती सापडली ते नगरनाईक त्यांच्या घरी त्यांना भेटायला आलो. घर जुन्या पद्धतीचे वाड्या सदृश्य आहे. भाऊराव नगर नाईक हे साधारणपणे ८० वर्षाचे असून वाईंडर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तुत मूर्ती २०१३ च्या सुमारास शेताच्या जवळील नाल्यांमधील वाळू काढत असताना सापडली. त्यानंतर ती शेतात स्थापन केली.
यानंतर जानगीर महाराज संस्थानच्या रस्त्याने मोठ्या चिंचेच्या शेजारी अनेक प्रकारची कोरीव शिल्पे पडलेली होती असे समजले. पण तिथे गेल्यानंतर समजले की त्या शिल्पांना लोकांनी इतरत्र हलवले. भवानी आई संस्थान येथे मिळालेल्या द्वार शाखा हा त्यातीलच एक भाग. यानंतर नागनाथ संस्थानाला भेट दिली. येथे बाजूस भव्य दगडी शिळे मध्ये साधारणपणे चार फूट उंच असलेली प्रचंड गणेश मूर्ती, जी अर्धी आहे. त्यावरून तिचा आकार बराच मोठा असावा असा अंदाज येतो. ही मूर्ती सुद्धा गतकाळातील त्याच विष्णू मंदिराचा किंवा मंदिर समूहाचा एक भाग असावी.
असो, एकूणच आई भवानी मंदिरावर मिळालेल्या द्वार शाखेवरून कधीकाळी गावामध्ये विष्णूचे प्राचीन मंदिर होते. तसेच नगर नाईक यांच्या शेताजवळील नाल्यांमध्ये सापडलेली शेषशायी मूर्ती ही त्याच मंदिरातील मूर्ती असावी. मात्र विष्णू मंदिरातील मुख्य मूर्ती ही नसावी. अर्थात नाल्याच्या आजूबाजूस उत्खनन केल्यास गतकालीन मंदिराचे अनेक पत्थर मिळू शकतील. शिवाय द्वार शाखेवरून मंदिराची चौकट सामान्यपणे सात-आठ फूट उंच असावी त्यामानाने गाभाऱ्यातील विष्णू मूर्ती सुद्धा मोठी असावी, जी आजही पृथ्वीच्या पोटात कुठेतरी विसावलेली आहे.!
असो, एकूणच शेषशायी विष्णू मूर्ती आणि वैष्णव द्वारपाल शिळा हे सर्व या गावात भूतकाळात असलेल्या एका मोठ्या वैभवशाली विष्णू मंदिराचे साक्षीदार आहेत असे नाकारता येत नाही. तर अशी ही कथा शिरपूर येथील एका अदृश्य झालेल्या विष्णू मंदिराची..!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।