प्राचीन शिवमंदिर, टंकाई माथा, अंकाई, ता. येवला –
सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट पठार असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय.(प्राचीन शिवमंदिर टंकाई)
अंकाई किल्ल्यावर तशी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते परंतु टंकाई किल्ल्यावर सहसा कुणी फिरकत नाही. टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले असून या पठारावर एक तलाव व खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात. या पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आपले अस्तित्व आज कसेबसे टिकवून आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे छत पुर्णपणे कोसळलेले आहे. पण उर्वरीत अवशेषांवरुन मंदिरावरील कोरीवकामाची आणि त्याच्या सौंदर्याची कल्पना येते. मंदिराच्या गाभार्यात शिवपिंड आहे. सभा मंडपातील नंदीही अजुन शाबुत आहे. मंदिराच्या आजूबाजूला मंदिराचे भग्नावशेष आपल्याला विखुरलेले दिसून येतात.
Rohan Gadekar