महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,231

शिवा काशीद ची स्वराज्याप्रती निष्ठा

By Discover Maharashtra Views: 2152 13 Min Read

शिवा काशीद ची स्वराज्याप्रती निष्ठा –

आषाढ पाऊस हैदोस घातल्या सारखा पन्हाळ्यावर कोसळत होता. पौर्णिमेचा चंद्र सुद्धा घाबरून ढगाआड लपून बसला होता की काय कोण जाणे. सकाळपासून सह्याद्रीच्या कडे कपारीत भीतीदायक वातावरण होतं. सर्वजण एका विचित्र विवंचनेत होते सगळ्यांच्या मनांत अनामिक हुरहूर वाटत होती. ही भयाण परिस्थिती इतकी होती की संपूर्ण सह्याद्री अश्रूंनी भिजला आहे की पावसानी याचा अंदाज येत नव्हता. रात्रीचा प्रहर जसा जसा वाढत होता तसा तसा पावसाचा जोर वाढला. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रू ओघळवेत तसा गडाच्या तटाबुरुजांवरून पावसाचे टपोरे थेंब ओघळत होते. गार गार वारा लहान मुलासारखा सैरा वैरा दऱ्या खोऱ्यातून वाहत होता.

खलबतखान्याच्या आतल्या खोलीत महाराज येरझाऱ्या घालत होते. एक गुप्त बैठक होणार होती, त्या बैठकीसाठी बहिर्जी नाईक महत्वाची खबर घेऊन येणार होते. गडावरील बहुतेक मंडळी जेवणं उरकुन मसलती साठी खलबत खान्यात जमली होती. खलबत खान्याच्या मधोमध मोठ्या घमेल्यामध्ये शेकोटि पेटवलेली त्या विस्तावाच्या उबाऱ्याला सर्व मंडळी बसली होती. त्या गंभीर वातावरणात पेटलेल्या शेकोटी खेरीज कोणीच काहीच बोलत नव्हतं. सर्व जण शांत विचार करत बसलेले. शेकोटी ला सोबत म्हणून पावसाचा, विजांच्या आणि ढगांचा आवाज साथसंगत करत होता.

महाराज येरझाऱ्या घालत असतानाच मसलती चा विचार करत होते…. इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली, दरवाज्यातून च एका पाहरेकरी महाराजांना निरोप देण्यासाठी आला.

“महाराजांचा विजय असो!!! मुजरा करत पाहरेकरी आत आला.

उजवा हात हृदयावर ठेवत महाराजांनी हुंकार देत त्यांना आत बोलावलं. “काय खबर आहे?”

राजं, कोणी तरी वैद्य बुवा आल्यात! तुम्हांसनी भेटाया, म्या म्हनलं, त्यास्नी दिस उजाडल्यावं या! पर…. त्ये ऐकतच न्हाईत राजांसोबत बोलायचं हाय…. ह्यो बगा जगदीश्वराची उदी अन कसला सा कागुद दिला हाय…. म्हाराज कायम्हंत्यात त्ये सांग मंग म्या जातू…. मला अजून ज्योतिबाच्या वाडीला जायाचं हाय… असं बोलून त्ये बाहेर ओसरीवर बसल्यात…

उदी ची पुडी आणि कागद महाराजांना देत त्या पाहरेकाऱ्याने  महाराजांची माफी मागीतली.

राजं….

माफी द्यावी….. म्या लय सांगून पन त्ये वैद्य बुवा ऐकत न्हाई….किल्लेदार मसलती साठी गेल्याती अन कोन जानकार बी न्हवतं…. म्हून म्या वैद्य बुवांचा सांगावा धाडाया आलू…. मला माफी द्यावी….

महाराजांनी त्या पाहरेकऱ्याचा हात हातात घेत म्हणाले.

अरर….! तू कशा पाई माफी मागतूस तू तर तुझं कामच करत व्हतास…. जा त्यांना आत पाठव…. मीच त्यांना बोलावलं होतं त्या पाहरेकऱ्याच्या पाठीवर हात फिरवत महाराज बोलले…

पाहरेकरी महाराजांना मुजरा करून निघाला.

वैद्य बुवा आत आले त्यांना बघताच महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज अधिक झळकू लागलं जुना सवंगडी भेटावा अश्या भावना महाराजांच्या चेहऱ्यावर उमटल्या…. वैद्य बुवा मुजरा करणार तोच महाराजांनी त्यांना रोखत आलिंगन दिलं…. किती वेळ लावला गडावर यायला बहिर्जी… या, बसा आगोदर…!

अहो…. महाराज!! ह्या सिद्द्याने लय जीव काढलाय…. हातो हात माणसं बसवली आहेत…. जरा सुद्धा वेढा ढिला पडू देत नाही…. पायथ्याशी च एकेकाला अडवून त्याची चौकशी करतो…. जरा जरी संशय आला तरी त्याला तुरुंगात धाडतोय…. नायतर मस्तक मारतोय.

महिना झाला गावातच हाय…. कधी फकीर…. कधी संन्याशी…. कधी वाटे करी…. तर कधी वासुदेव बनून गावात तळ ठोकून आहे…. कशी बशी संधी मिळाली आणि गडावर पोहोचलो..

हो….!!!  या सिद्दी जोहर वेढा असा घातलाय की आम्हाला देखील गड उतार होता येत नाही…. आपल्या काही हेरांच्या मार्फत शेवटी आम्हीच अशी आरोळी उठवली की, आम्ही सिद्द्याला शरण जाणार म्हणून…. निदान त्या बातमी ने तरी वेढा ढिला पडेल पण…..काहीच नाही….आणि बाहेर धबधब्या सारखा कोसळणाऱ्या पावसात देखील पाहरा कमी होत नाहीये…. महाराज थोड्या नाराजीच्या सुरात म्हणाले.

बाकी काय खबर स्वराज्याची??? रायगडावर वातावरण कसं आहे?? आऊसाहेब कश्या आहेत??

राजं….!! तिकडं पुण्यात शास्ताखान ने बस्तान बसवलंय, हळू हळू आजूबाजूचा प्रांत गिळायला बघतोय…. माँसाहेबांनी कित्येक खलिते पाठवले…. आपली भरावश्याची माणसं पाठवली…. अगदी हेर सुद्धा पाठवले…. न राहून शेवटी माँसाहेब निघाल्या फौजफाटा घेऊन…. वाटेत नेतोजींनी त्यांना अडवलं….! आणि त्यांनी माँसाहेबांची मनधरणी करत ते तुमच्या मदतीला निघाले होते…. पण सिद्द्याने पुरता ओळखून असावा याला सगळ्या घडामोडीना… म्हणून शेवटी सिद्द्याने च मोठी फ़ौज पाठवली… नेतोजींना नाईलाजाने माघार घ्यावी लागली…. म्हणून मग मीच लगोलग निघालो…. आता इथं थांबणं धोक्याचं आहे…. आपल्या लवकरच निघावं लागेल.

ते उद्या बघू बहिर्जी….! तूम्ही आत्ता आराम करा खूप दमलेले दिसताय…. मसलती साठी आलेल्या बांदल बंधूंना, प्रमुख मंडळीना,किल्लेदारांना आणि बाजीप्रभूंना देखील आम्ही आरामासाठी पाठवतो…. उद्या सकाळी आपण पुढची योजना आखूयात… असं म्हणत महाराजांनी पाहरेकऱ्याला बोलावलं

नाही महाराज… गडाच्या उत्तरेची जी घळण आहे…. त्या वाटेचा पहरा थोडासा ढिला आहे…. वाट काट्याकुट्याची अन अवघड हाय…. पण आजच निघुयात…. मी सगळी योजना तयार केली आहे…. चला मसलखान्यात आपण तिथेच बोलूयात….

अहो पण बहिर्जी….!! बाहेर पाऊस पाहिलात ना कसा कोसळतोय ते…. काळ्या ढगांनी पौर्णिमेचं चांदणं देखील गडप केलंय…. वादळी वाऱ्यात प्रवास कसा करणार…. वाट तर दिसायला हवी.

मी तुमचं काही ऐकणार नाही…. आधीच खूप उशीर झालाय…. हा आषाढातला पाऊस आहे असाच कोसळणार…. आजची रात्र हा पाऊसच आपला पाठीराखा…. आजचं निघावं लागेल तर सुखरुप निघू शकतो…. अफझलखाना मुळं मुघल आणि आदिलशाही देखील बिथरली आहे…. अजून विषाची परीक्षा नको आधीच खूप उशीर झालाय

सर्व जण मसलत खान्यात जमा झाले….

बांदल बंधू हताश पणे खाली मान घालून शेकोटी च्या ज्वालांकडे बघत होते…. डबडबलेल्या डोळ्यांनी महाराजांची माफी मागत बोलू लागले…. आमी तुमास्नी सोडवू न्हाई शकलो…. बहिर्जी मध्येच म्हणाले

गड्यांनो…! अजून येळ गेलेली नाही…. प्रसंग बाका आहे…. प्रवास देखील खडतर आहे पण त्यातुन सुद्धा आपल्याला मार्ग काढवाच लागेल…. आपल्याला गडाच्या उत्तर दिशेला असलेली घळण आहे त्या वाटेने उतरायचं आहे.

ती वाट तर खिंडीची हाय…. काट्याकुट्याची अन कड्या कापरीची आहे मध्येच इतकावेळ शांत असलेले…. शिवा काशीद म्हणाले.

व्हय शिवा पण जोखीम आपल्याला घ्यावीच लागेल…. बहिर्जी म्हणाले.

बाजी प्रभू थोडे विचारात गुंग झाले.

खूप विचार करून बाजीप्रभू म्हणाले, ‘काही शूर सैनिक घेऊन आपण खिंडीत थांबुयात….म्हणजे यावनांना खिंडीत रोखता येईल…!

बांदल बंधू पैकी एक म्हणाले काही बांदल सैनिक महाराजांची सोबत विशाळगड पर्यंत करतील.

बरोबर…. पण महाराज…. बहिर्जी म्हणाले, शत्रुला गाफील ठेवण्यासाठी आपल्याला दोन दिशेला दोन पालख्या पाठवाव्या लागतील….

पण दुसरी पालखी त्यात कोण असेल? महाराजांनी प्रतिप्रश्न केला…

म्या जाईल त्या पालखी सोबत…. तुमची पालखी विशाळगडाच्या दिशेने जाईल.

आक्षी बरोबर शिवा…. मी तुला सांगतो काय काय करायचं ते….तुला महाराजांची कापडं घालून तयार करू…. आपल्या मध्ये शिवाजी महाराजांसारखी ठेवण आणि शरीर फक्त तुझ्या कडे आहे…. अगोदर शिवाजी महाराजांचा मेणा  निघेल आणि उशिराने तुमचा….. जर सिद्दीचे सैनिक सामोरे आलेच तर परत उलट्या पावलांनी तुम्ही  पन्हाळगड गाठायचा…. किंवा सरळ जाऊन सिद्याच्या छावणी मध्ये जाऊन तहाच्या गोष्टी करायच्या…. थोडे बोलण्यात गुंतवून ठेव आणि शेवटी सिद्दी सांगेल त्याप्रमाणे त्याच्या सर्व अटी मान्य करायच्या…. कारण तू जेवढा वेळ सिद्दीला गुंतवशील तितका जास्त वेळ महाराजांना वेढा फोडून विशाळगडावर पोहचता येईल…. आणि यात खूप मोठी जोखीम आहे पण त्या वाचून पर्याय नाही…. शिवा तू सोबत सफेद जरीपटका घे…. सिद्द्याने पाहिलंच तर तहाची बोलणी करायला राजे आलेत असं वाटेल….

नाही नाही मला ही जोखीम नकोय… आपण सर्व एकत्र निघू आणि एकत्रच विशाळगडावर सुखरूप जाऊ…. आई भवानी आपली साथ देईलच…. महाराज काळजीच्या सुरात म्हणाले.

शिवा महाराजांच्या जवळ जाऊन म्हणाला….

अहो राजं…. आम्हांस्नी कोन कश्या पाई पकडल…. आनी जरी गावलो तरी सिद्द्या काय जीवे मारनार न्हाय…. म्या तहाच्या गोष्टी करंल…. आन त्येला पायजेन तसं बोलेल…. म्हंल्याव त्येला काय गरज हाय व्हय मारायची तुम्ही कश्या पाई ईचार करताय…. चला चला तयारी ला लागा समदी

सगळे ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारी पार पडायला निघाले. महाराज मात्र शिवा काशीद आणि सिद्दी जोहर चाच विचार करत होते. महाराजांना हे पटत नव्हतं पण आता असं करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता….

पन्हाळ्यावर कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. समोर एका भल्या मोठ्या झाडाच्या पानांवरून पावसाच्या टपोऱ्या टपोऱ्या थेंबांची धार सुरू होती…. गार वाऱ्याच्या झुळकीने झाडांची पाने शहरल्या सारखी थंडी ने कुडकुड कापत होती.

इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली…. महाराज आवाजाच्या दिशेने रोखत म्हणाले कोण आहे तिकडे?

राजं म्या शिवा हाय…. आत येऊ काय…. ?

ये शिवा…… ये आत ये….महाराज बोलले

शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांचा हुबेहूब पोषाख करुन महाराजांच्या समोर उभा होता.

अंगात रेशीम मऊ अंगरखा घातलेला… डोक्यावर महाराजांचा टोप… टोपावर मोत्याची माळ…. कमरे भोवती जांभळ्या रंगाचा जरीची नक्षीकाम असलेला शेला…. त्यात पोटाच्या उजव्या बाजूला शेल्यात अडकवलेली कट्यार…. तर डाव्याबाजूला रत्नजडित तलवार…. बोटांवर रत्नजडीत अंगठ्या…. पायातल्या करकरणाऱ्या वाहणाकडे रोखत महाराज म्हणाले

आरं शिवा…. या वाहणा काढ आधी…. अन हे माझे चढाव चढव…

न्हाई न्हाई राजं ह्यो गुन्हा कशा पाई…. माझी लायकी तर हाय का यांच्या जवळ बी हुभ रायची… असं बोलत शिवा महाराजांच्या पायावर कोसळलाच कळशीतून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा तसा शिवा च्या अश्रूंनी महाराजांच्या पायावर अभिषेक केला…

अरे शिवा आता तू शिवा म्हणून न्हाई तर शिवाजी म्हणून पालखीत बसणार हायस…. महाराजांनी शिवाचा खांदा पकडत वर उठवलं आणि घट्ट आलिंगन दिलं.

गड्या कित्ती मोठं धाडस करतोस माझ्या साठी…. डोळ्यातले अश्रू पुसत महाराज म्हणाले….  हातातला सोन्याचं कड काढून त्यांनी ते शिवाच्या उजव्या मनगटात चढवलं…. गळ्यातील कवड्याची आणि मोत्यांची माळ काढून ती डोळ्यांना लावली तिला नमस्कार करून त्यांनी ती माळ शिवा च्या गळ्यात घातली…. महाराजांच्या स्निग्ध स्पर्शाने शिवा काशीद च्या अंगावरून शहारे येत होते…. महाराजांच्या माये ने दिलेल्या या वागणूकी मुळे त्याचं मन आणि डोळे भरून आले…

महाराजांनी शिवा काशीद कडे पाहिलं आणि महाराज देखील थोडे भावनिक झाले

गड्या…. माझ्या साठी एवढं जीवघेण धाडस घेत आहेस….? लेकरा मी कशी परतफेड करू याची….?

म्या तुमच्या साठी न्हाई करत काही राजं…. जे काय हाय ते माज्या सवराज्या पाई करतुय….!! आन एका येळला मला गड्या म्हंता अन परतफेडीची वार्ता बी करता…. अवो राजं हाय तुमी राजं….. तुमी फकस्त आदेश धडायचा…. मग बगा ह्यो शिवा सवराज्या पाई आपला जीव बी असा हसत हसत ववाळून टाकल….

अरे त्याची च भीती वाटते रे…. आणि कसलं स्वराज्य उभं करतोय पण माझ्या सवंगड्यांची आहुती देऊन…. कधी कधी तिटकारा येतो या राजेपणाचा…. महाराज व्याकुळतेने बोलत होते

अहो राजं…. सवराज्याच्या येवड्या मोट्या कामा साठी तुमी आमच्या सारख्या पोरासोरांवर येवढा इस्वास दावताय…. मग त्या पाई आमी आमचा जीवाच मोल घेऊन बसू व्हय…. आन दगा फटका व्हईलच कसा…. अवो ही आमच्या राजाची कापडं हायती…. आन म्या महाराज म्हनून जानार हाय कुनाची बिशाद हाय का शिवाजी राजांकडं नजर वर करून बगायची…. आनी जरी काय दगा फटका झालाच तरी म्या शिवाजीराजं म्हनून हसत हसत मरनाला सामोरा जाइल…. कारन माज्या चितेवर म्या मरताना माज्या राजाची कापडं हायत आन हे भाग्य समद्यांच्या नशिबी नसतं राजं…. अभाळायेव्हडी पुण्याई माज्या आज्या पंज्या नी केली असल….म्हून मला शिवाजी म्हून मारायचा मान मिळल….

इतक्यात आत बहिर्जी आले…. महाराज आता निघायला हवं एक एक क्षण लाख मोलाचा आहे…. मेणे तयार आहेत…. आणि बांदल सैनिक आपल्या हुकुमाची वाट पाहत आहेत….

शिवा मी तुझी वाट पाहीन विशाळगडावर…. आई भवानी आपल्याला साथ देईलच….

महाराज माजा शेवटचा मुजरा स्वीकारा…. पुन्यानंदा मुजरा करायला मिळाला तर त्यो रायगडावर आऊसाहेबांच्या समोरच…. नकळत शिवा काशीद च्या डोळ्यात आसवं जमा झाली…

महाराजांच्या डोळ्यातही अश्रू जमा झाले…. शिवा काशीद ची स्वराज्याप्रती निष्ठा पाहून महाराजांना गहिवरून आलं…. महाराजांनी शिवा काशीद ला कडकडून मिठी मारली…. माझ्या साठी हा लेकरू मृत्यू ला कवटाळायला निघाला आहे…. भवानी माते त्याला यश दे…. माते त्याला यश दे….

जगदंब….

जगदंब…..

महाराज घाई करा….. आता निघालं पाहिजे….. जड पावलांनी महाराजांनी शिवा काशीद चा निरोप घेतला…..

लेखन – विजयश श्रीकांत भोसले 

Leave a Comment