महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,581

शिवा काशीद | शिवरायांचे शिलेदार

Views: 2904
3 Min Read

शिवरायांचे शिलेदार – शिवा काशीद

शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशहाच्या अमलातील प्रदेशात चालू होता. शिवराय आणि आदिलशहा यांच्या पहिल्या उघड संघर्षात पुरंदरावर विजापुरी सेना पराभूत झाली. आदिलशाहीच्या सामर्थ्याला न जुमानता शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून जावळी बळकावली. स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच उरात धडकी भरलेल्या आदिलशाहीने प्रचंड फौज फाटा देऊन स्वराज्यावर पाठविलेला अफझलखान शिवरायांनी प्रतापगडाजवळ ससैन्य संपविला. हा प्रचंड पराभव आदिलशहाला अतिशय झोंबला. अफझल वधानंतर स्वराज्याच्या सीमा विजापूरच्या दिशेने वाढवत शिवरायांनी पन्हाळा हा बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला जिंकला.

आदिलशहाने पुन्हा फौज देऊन सिद्दी जौहर या चिवट लढवय्या सरदारास शिवरायांवर पाठविले. सिद्दीने पन्हाळ्यास वेध घातला. या परिसरातील प्रचंड पावसाळ्यात वेढा चालविणे विजापुरी फौजेला अशक्य होईल हा पन्हाळ्यावर असलेल्या महाराजांचा अंदाज चिवट सिद्दी जौहरने खोटा ठरविला. वेध अधिकच कडेकोट करून सिद्दी गडाखाली ठाण मांडून बसला. मराठ्यांनी वेढ्याबाहेरून केलेल्या हल्ल्यांना मोडून काढीत सिद्दी गडावर मारा करू लागला. वेढ्यात अडकून चार महिने झाले आणि शिवरायांनी यापुढे पन्हाळ्यात रहाणे स्वत:ला आणि राज्याला अपायकारक ठरणार हे ओळखून वेढ्यातून निसटून जायचे ठरवले. तहाची बोलणी चालू करून काही प्रमाणात शिवरायांनी सिद्धीचे सैन्य गाफील बनविले. पन्हाळ्यातून बाहेर पडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला.

निवडक एक हजार मावळे बरोबर घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या अंधारात गुपचूप निसटण्याच्या या योजनेत चाहूल लागून शत्रू पाठीवर आलाच तर त्याला हूल देण्यासाठी शिवा काशीद यांची एक वेगळ्या कामावर योजना करण्यात आली. पन्हाळ्या शेजारच्या नेबापूर गावच्या नाभिक समाजाच्या शिवा काशीद या वीराने महाराजांच्या पेहरावात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले. विजापुरी सैन्याला चकवा देऊन महाराज वेढ्याबाहेर पडले पण सिद्दीच्या गस्ती पथकांना त्यांची चाहूल लागली आणि विजापुरी सैन्य पाठलागावर निघाले. घोड्यावरून पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या सेनेच्या तावडीत शिवा काशीद सापडले. महाराज सापडले या आनंदात त्यांना सिद्दीसमोर आणण्यात आले. पण महाराजांना ओळखणाऱ्या फाजलखानाने हे महाराज नाहीत असे सांगताच सिद्दी हाधरला.

ते महाराज नसून शिवा काशिद आहे.
सिध्दीने त्यास विचारले , ” मरणाचे भय वाटत नाही का? “.
त्यावर शिवा काशिद म्हणाला, ” शिवाजी राजेसाठी मी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत “.
हे उत्तर ऐकून रागाने चिडून सिद्दीने भाल्याने भोसकून शिवा काशिदचे शीर कलम केले. पण या सर्व घटनांनी शिवरायांना विशाळगड गाठण्यास लागणारा बहुमोल जादा वेळ मिळवून दिला.

महाराजांचे रूप घेऊन विजापुरी सैन्याला फसविण्याचे पर्यवसान आपल्या मृत्यूमध्ये होणार हि पूर्व कल्पना असूनही मृत्यूला सामोरे जाण्याचे साहस दाखविणारे हे शिवा काशीद .इतिहास ही त्याचा पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. यांना मनाचा मुजरा……….!!!

मृत्यू – १३ जुलै १६६०
समाधीस्थान – पन्हाळा, जि. कोल्हापूर

Leave a Comment