आन्वा येथील यादवकालिन शिव मंदीर –
सर्व देवामधे श्रेष्ठ, मस्तकी चंद्र धारण केलेला, सर्व लोकांचा एकच अधिपती |
देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात असे देवादिदेव महादेव म्हणजेच ‘शिव’ ||
महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आढळतात बरीच मंदिरे ही यादवकालिन आहेत .असेच एक प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम अविष्कार असलेले मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे .जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .(आन्वा येथील यादवकालिन शिव मंदीर)
मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार ‘शस्त्रोंत्कीर्णा ‘हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी ‘शैलजा’ ‘हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .
तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे साहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत . उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो .आत गेल्यावर त्या मंडपात अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला होतोच.
या मंदीराला ५० गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे .ताराकृती उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण साहे .मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते .मध्यम नवतालातील यक्ष ,अप्सरा,प्राणी,पक्षी यांची शिल्पे आढळतात .उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .
मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो .दुरुस्तीचे काम सुरू दिसते पण पर्याप्त वाटत नाही .एवढा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे .त्या पाठीमागचा इ|तिहास समोर आला पाहीजे .त्या भव्य दिव्यतेची व आपल्या पूर्वजाच्या अपार मेहणतीमधून साकारलेली जागतिक दर्जाची संस्कृती जगासमोर गेली पाहीजे या उद्देशाने आमची निर्सग-इतिहास प्रेमी टिम सतत नवनवीन ठिकाणी भटकत असते.
संजय खांडवे, बुलढाणा