महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,235

शिवराज्याभिषेक अर्थात हिंदु साम्राज्य दिन

Views: 1461
10 Min Read

शिवराज्याभिषेक अर्थात हिंदु साम्राज्य दिन –

गागाभट्टकृत शिवराजाभिषेकप्रयोग –

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर वैदिक पद्धतीने , वेदमंत्रांच्या उद्दघोष्यात गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. गागाभट्ट यांनी जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक कसा करावा या विषयी मार्गदर्शन करणारी वेगळी पोथी लिहिली. राज्याभिषेकाचे विधी कसे करावेत या विषयीचे वर्णन या पोथीत करण्यात आले आहे. कोणत्या कोणत्या मुहूर्तावर कोणते विधी कोणत्या दिवशी करावे व प्रत्येक विधीची पूर्वतयारी कशी करावी याचे वर्णन यात करण्यात आले आहे.

शिवराजाभिषेकप्रयोगाची पोथी बीकानेर राज्याच्या हस्तलिखित संग्रहात आहे. मूळ हस्तलिखिता पोथीचा क्रमांक ९५६ असून राज्याभिषेक पद्धती या नावे वीस भागात हे हस्तलिखित लिहिलेले आहे. या पोथीची नक्कल १४ जून १९४३ रोजी वा.सी.बेंद्रे यांनी बीकानेरचे दिवाण श्री. मणूभाई मेहता यांच्या मध्यस्थीने तेथील पंडितांकडून प्राप्त केली . सध्या ही प्रत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे इथे आहे. सदर ग्रंथात गागाभट्ट यांनी राज्याभिषेक कसा करावा व राज्याभिषेकाचे विधी याविषयीचे विवेचन केले आहे. गागाभट्टानि राज्याभिषेकाचे विधी भोसल्यांचे कुलोपाध्ये व पूरोहित बाळंभट्ट यांच्या हस्ते करविले. गागाभट्टानि राज्याभिषेक विधींचे मार्गदर्शन कुलोपाध्ये बाळंभट्ट यांना केले. कुलोपाध्ये बाळंभट्ट यांच्या मदतीस सर्व वेदांचे व शाखांचे विद्वान ब्राम्हण आमंत्रित केले.

श्री नृपशालिवाहन शके १५९६ , आंनद नाम संवत्सर , जेष्ठ शुद्ध चतुर्थी , शुक्रवार २९ मे १६७४ रोजी सकाळी महाराजांचे मौजीबंधन व तुलापुरुषदानादी विधी झाले. गागाभट्टानी या विधींसाठी “ तुलापुरूषदानविधि “ हा ग्रंथ तयार केला. सभासद बखरीत याविषयीचा उल्लेख येतो “ उत्तरेस क्षत्रीयांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला . शुद्ध क्षत्रिय आधी केला. “ शिवाजी महाराजांची मुंज उशिरा झाल्याबद्दल प्रायश्चित म्हणून ‘तुलादानविधी’ करण्यात आला. शिवाजी महाराजांकडून कळत नकळतपणे घडलेल्या ब्रम्हहत्या व इतर हत्यांच्या पापक्षालनार्थ प्रायश्चित म्हणून ‘तुलापुरुषदान‘ विधी करण्यात आला. तुलापुरुषदानविधित विष्णूच्या सुवर्ण मूर्तिची प्रतिष्ठा करून , होम झाल्यावर विसर्जन करून तिचे दान ब्राम्हणास करणे . तुलादान म्हणजे यजमानाच्या वजनाचे सोने, रुपे, इत्यादि धातू व इतर जिन्नस हे दान देणे. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन शिवाजी महाराजांची तुला करण्यासाठी १६००० होण लागले असे नमूद करतो .

शुक्रवार २९ मे १६७४ रोजी झालेले मौजीबंधन व तुलापुरुषदानादी विधी ह्यांचा राज्याभिषेकाशी प्रत्यक्ष संबंध न्हवता.

प्रथम दिन जेष्ठ शुकल ६ , शनिवार दि. ३० मे :- महाराज्यांचे पुन्हा समंत्रक लग्नविधी झाले. शिवाजी महाराजांचा राणी सोयराबाई यांच्याशी समंत्रक विवाह लावण्यात आला.

राज्याभिषेकाच्या सुरवातीस राज्यांनी संकल्प सोडला तो असा.

मम प्रजापरिपालनाधिकारसिद्धीद्वारा परमेश्वरप्रीत्यर्थ साम्राज्यदिकफलप्राप्तर्थ गणेशपूजन
तदडगत्वेन ब्राह्मणे: पुण्याहवाचन मातृकावसोद्वारापूजन नान्दश्राद्ध पुरोहितवरणादिकंच करिष्ये /

त्याप्रमाणे पहिल्या दिवशी गणेशपूजन, कलश संस्थापन , पुण्याहवाचन , यजमानास अभिषिचंन, षोडशमातृका पूजन, नंदिश्राद्ध, पुरोहितवर्ण, रक्तसुत्रकंकण , पट्टबंधन हे विधी झाले. त्यानंतर होमसहित ऋत्विगवरणाविना विनायक शांति झाली. बली दिला गेला. आचार्याना दान, वस्त्रे व इतर ऋत्विगांना दक्षिणा दिल्यावर विनायकांबिकयोरुत्तरपुजा झाली . आचार्यास नमस्कार करून विभूति लावल्यावर अग्नि विसृज्य केला. अश्याप्रकारे पहिल्या दिवसाचा विधीसमारंभ संम्पन्न झाला.

द्वितीय दिन जेष्ठ शुकल सप्तमी रविवार दि. ३१ मे :- आदल्या रात्री महाराज्यांनी फलाहार घेतला. रात्री भूमीशय्या व ब्रम्हचर्य पालन केले. महाराजांनी ऐन्द्रिशान्ती कार्य करण्याचा संकल्प सोडून कार्यारंभ केला. “करिष्यमाणराजभिषेकांगत्वेन ऐन्द्रिशान्ती करिष्ये ”

प्रथम कुंडात अग्नीप्रतिष्ठा झाली. इंद्रायणीचे पूजन , चतु:स्कुंभ स्थापन व त्यात बलिदान होवून ऐन्द्रिशान्ती विधी संम्पन्न झाला. आचार्य व ऋत्वीग यांना यथाशक्ती हिरण्यदक्षिणा देण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी “ ऐन्द्रिशान्त्यत्वेन ऐशानयाग करिष्ये ” असा संकल्प सोडून ऐशानयाग विधी झाला. अश्याप्रकारे दुसऱ्या दिवशीचा विधीसमारंभ संम्पन्न झाला.

तृतीय दिन जेष्ठ शुकल अष्टमी सोमवार दि. १ जून :- “ ऐन्द्रिशात्यत्वेन ग्रहयज्ञ करिष्ये ” या संकल्पनेने तिसऱ्या दिवशीच्या विधिला प्रारंभ झाला. ऐन्द्रिशान्तीसाठी ग्रहयज्ञ व नक्षत्रहोम झाला. ग्रहयज्ञाबद्दल धेनूशंखादी दक्षिणा व नक्षत्र होमाबद्दल घृतादी दक्षिणा दिल्यानंतर ब्राहमणभोजन झाले.

चतुर्थ दिन जेष्ठ शुकल नवमी मंगवार दि. २ जून :- राज्याभिषेकाच्या कार्यासाठी मंगळवार व नवमी हे दोन्ही योग निषिद्ध असल्यामुळे हा दिवस भाकड दिवस म्हणून सोडून देण्यात आला.

पंचम दिन जेष्ठ शुकल दशमी बुधवार दि. ३ जून :- “ ऐन्द्रिशात्यत्वेन नक्षत्रयज्ञ करिष्ये ” असा संकल्प करून त्या दिवशीचे विधी सुरू झाले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या.

षष्ठम दिन जेष्ठ शुकल एकादशी गुरुवार दि. ४ जून :- रात्री निऋतियाग करण्यात आला. या यागात इतर यागद्रव्यासोबत पक्व व अपक्व मांस, मत्स्य व सुरा यांचे बलिदान झाले. यावेळी कृष्णवस्त्र धारण करण्यात आले. कृष्णपुष्प गंधाणे पुजा करण्यात आली. हा विधी आटोपल्यानंतर स्नान करून शुभ वस्त परिधान करून पुण्याहवाचन झाले. गाई व दक्षिणा देण्यात आल्यावर त्या दिवशीचा विधीसमारंभ संम्पन्न संपला.

सप्तम दिन जेष्ठ शुकल द्वादशी शुक्रवार दि. ५ जून :- सकाळी ऐन्द्रिशान्ती झाली त्यानंतर ब्राह्मणांना भोजन देण्यात आले. कर्मसंपूर्णता वाचण्यात आली . हे सर्व विधी सपत्नीक झाले . नंतर मुख्य राज्याभीषेक विधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी २२ घटिका ३५ पळे द्वादशी होती. त्रयोदशीचा मुहूर्त असल्यामुळे संध्याकाळपासून पहाटेपर्यंत हा विधी चालला . राज्याभिषेक , सिंहासनारोहण व राजदर्शन हे तीन समारंभ त्रयोदशीच्या मुहूर्तावर झाले. त्रयोदशी शनिवारी १९ घटिका ४९ पळे पर्यन्त होती. शिवराज्याभिषेक काचा हा मुख्य विधी शुक्रवार संध्याकाळपासून तो शनिवारी सकाळपर्यंत चालला. सिंहासनरोहणाचा मुहूर्त शनिवारी सकाळी होता.

गणेशपूजन, स्वस्तिवाचन , मातृकापूजन , वसोद्वारा पूजन , नंदिश्राद्ध , नारायणपूजन , आज्याहुती हे विधी झाल्यावर शिवराज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. महाराज पत्नीसह आल्यावर मंडप पुजा झाली . महावेदिभोवती पूर्वेस सुवर्णकुंभ ,दक्षिणेस रजतकुंभ , पश्चिमेस ताम्रकुंभ , उत्तरेस मातीचा कुंभ ठेऊन त्यात घृत , दुग्ध , दधी आणि जल भरण्यात आले. कुंभ फुलांनी सुशोभित करून त्यांना वस्त्राने सजवण्यात आले. औदुंबरशाखांची आसंदि स्थापण्यात आली. अनेक नद्यांच्या व सागरांच्या पाण्याचे कुंभ तसेच रत्न , गंध, पुष्प , फल इत्यादि औषधीपूर्ण जलांचे कुंभ ठेवण्यात आले. महावेदीवर अग्नी व ग्रहांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मृदु आणि कुंभ यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर “ सर्वप्रधान “ होम झाला. ह्या होमाच्या प्रसंगी सर्ववेदी व सर्वशाखी ब्राह्मणांनी वेदमंत्राचा घोष केला.

जापकाणी जप व द्वारपाळणी जयघोष केला . प्रतेकाच्या जागा व कोणी कोणते मंत्र बोलावयाचे हे ठरवून दिले होते. पूर्णाहुति झाल्यावर महाराज अभिषेक शाळेत गेले. सुगंधी तेल व उटणी लाऊन उष्णोद्काणी समंत्र स्नान झाले. नंतर महाराज्यांनी शुक्लवस्त्र , गंध , माल्यादी लेवून ते पिठावर आले. निरनिराळ्या मृदा मंत्रघोष्यात त्यांना लावण्यात आल्या. त्यानंतर पंचामृत स्नान झाले. नंतर शुक्लगंधानूलेपन करून वेदमंत्र्यांच्या मंगलघोषात मंडपात आले. वेदीनवरील आसंदीवर तळपाय लागू न देता दोन गुडघे ठेऊन विधिपूर्वक आरोहण झाले. हे झाल्यावर राज्यांवर अभिषेक सुरू झाला. आचार्यांनी , पुरोहितांनी समंत्र अभिसिंचन केले.

राजांनी अग्नी जवळ पार्थना करून अभिषेक शाळेतील सुवर्ण सिंहासनावर आरुढ झाले. आसंदिवर इंद्र म्हणून केलेल्या अभिषेकाने प्रती इंद्र झालेले राजे सिंहासनाधीष्ठ झाल्यावर ब्राम्हण आमत्यांनी त्यांना आपला राजा मानून अभिषेख शाळेत मंगलघोषात नेण्याकरिता महाराज्यांचा हात हातात घेतला. “ महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जानराज्यायेष वो भरता राजा सोमोअस्माक राजा ब्राम्हणाना राजा / “ असे म्हणत समंत्र घोषात निरनिराळ्या उदकाणी अभिषिचन करण्याकरिता अभिषेक शाळेत घेऊन गेले. निरनिराळ्या कुंभातील ऊदकाणी अभिषिचन करताना महाराजांना त्यांच्या मातापित्याच्या नावाने संबोधून अभिषेकास सुरवात केली . हे अभिषिंचन सर्व वर्णांनी एकत्र येऊन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी आपल्या अष्ट दिशांना आपल्या अष्टप्रधानमंडळाचा शिवराज्याभिषेक विधित समावेश करून आपल्या अष्ट्प्रधान मंडळाला धार्मिक स्वरूप प्राप्त करून दिले.

पूर्व दिशेला प्रंतप्रधान मोरोपंत पिंगळे घृतपूर्ण सुवर्ण कलश घेऊन , पश्चिम दिशेस अमात्य रामचंद्र्पंत दधिपूर्ण ताम्रकलश घेऊन , दक्षिण दिशेस सेनापति हंबीरराव मोहिते दूग्धपूर्ण रौप्य कलश घेऊन , उत्तर दिशेस पंडितराव मोरेश्वर पंडित मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन अदबीने उभे होते . आग्नेय दिशेला पंतसचिव अनाजिपंत छत्र धारण करून , नैऋत्य दिशेला सुमंत त्र्यंबकपंत व्यंजन घेऊन , वायव्य दिशेला मंत्री दत्ताजिपंत मोर्चेल घेऊन , ईशान्य दिशेस न्यायाधीश निराजीपंत मोर्चेल घेऊन अदबीने उभे होते . अश्याप्रकारे महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराजांच्या अष्टबाजूस अष्टप्रधानमंडळ उभे होते. महाराजांच्या उजव्या बाजूस चिटनीस बाळाजी आवजी तर डाव्या बाजूस गणकलेखक चिमणाजि आवजी अदबीने उभे होते. या अभीषिंचनात नंतर पुत्रवती सुवासणींनी महाराजांना ओवाळले. राज्यांचे पुन्हा स्नान झाले. कास्यपात्रातील घृतात मुखावलोकन करून ब्राम्हनाना दक्षिणा देण्यात आली. अमात्यांना गो-अश्व-भूमी-सुवर्ण दान करण्यात आले. नंतर राजे वस्त्रालंकार लेवून मंडपात आले. रथाविषयक समंत्र विधी झाला . रथावर सविध ध्वज व छत्र स्थापण्यात आले. अश्वविषयक मंत्रानंतर बसून रथ चालविला . नंतर समंत्रीत धनू धारण केल्यानंतर रथ परत आणला. अश्ववीषयक मंत्रानंतर महाराज मंडपातील वेदीवर येऊन तेथील सुवर्णसिंहासनावर आरुढ झाले. मग अक्षक्रीडेनंतर शयंनगृहात गेले.

पहाटेच्यावेळी महाराज सिंहासनावर आरूढ होण्यासाठी सिंहासनाजवळ आले . मंगलवाद्यांच्या निनादात व मधुपर्कदी मंत्राच्या जयघोषात महाराज सिंहासनावर आरूढ झाले. सभामंडपात अष्टप्रधानमंडळ, प्रजाजन , देशविदेशातील वकील , पंडित उपस्थीत होते. पुरोहितांनी शिवाजी महाराजांच्या मातृ व पितृवंश परंपरेत उल्लेख करून सभामंडपात जमलेल्या सर्व मंडळीना “ तो क्षत्रिय राजा अभिषिक्त केल्याचे “ घोषित केले. याप्रमाणे शिवराज्याभिषेक समारंभ संपन्न झाला .

शनीवार दि. ६ जून :- सकाळी ७-८ च्या सुमारास महाराजांनी आपला पहिला दरबार भरवून व सिंहासनावर पुन्हा आरोहण करून राज्यकारभारस सुरवात केली .

“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा . मऱ्हाठा पादशाहा येवढा छत्रपती झाला, हि गोष्ट सामान्य झाली नाही “

श्री. नागेश सावंत

संदर्भ :- छत्रपती शिवाजी महाराज :- वा.सी.बेंद्रे.
मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने :- डॉ. सदाशिव शिवदे
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख

Leave a Comment