महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,826

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह

Views: 4461
4 Min Read

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह –

छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह १५ एप्रिल १६५३ मध्ये पुणे येथील शहाजी राजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला. पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथ्या पत्नी होत्या.त्या नेताजी पालकर यांच्या घराण्यातील  होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेले मौजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांच्याबरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडण-घडणीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठेच योगदान होते. सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचाच.

पुतळाबाई राणीसाहेब निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजीराजांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले ,संस्कारी बनवले त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी पुरेपुर काळजी घेतली .पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, मायाळू आणि छत्रपती शिवाजीमहाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या .आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा .त्यानंतर सईबाई राणीसाहेब यांचा व तद्नंतर राजांना आधार वाटत होता तो फक्त  श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणी साहेब यांचाच.

राजांनी आपल्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळा राणीसाहेबांकडे कथित केल्या होत्या. पुतळाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य  राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यतीत केले होते . कधीही खालची मान वर केली नाही .भोसले घराण्याची मान , मर्यादा, इब्रत त्यांनी प्राणापलीकडे जपली त्या योगदानामधे पुतळाबाई राणी साहेब यांचे अमूल्य योगदान आहे .ते अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या . शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपवला  पुतळा राणीचा महाराजांमध्ये खूप जीव होता .संभाजीराजांच्या मातोश्री  सईसाहेब यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रींनी मायेने जवळ केले होते .महाराजांच्या निधनानंतर  पुतळाराणीसाहेब अत्यंत शोकमग्न झाल्या . राणीसाहेब एकाकी पडल्या अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यथित होत होत्या.  मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर  कारभाऱ्यांनी शंभूराजेंविरूद कटकारस्थान सुरू केले. सत्तेसाठी प्रत्यक्ष आपल्यासोबत असे कटकारस्थान करावे हे पाहून छ.संभाजीराजे कासावीस झाले होते. जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला आहे. या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती ती म्हणजे पुतळाबाई राणीसाहेब.

सईबाई राणीसाहेब सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाईं राणीसाहेबांनीच शंभूराजांना जवळ केले, मायेने त्यांना साथ दिली. अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. म्हणूनच  संभाजी महाराजांसाठी त्याच आई आणि त्याच वडील होत्या. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ८५  दिवसांनी पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या .आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचे नाव घेतले जाते.

संभाजीराजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले, संस्कारी बनवले. शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकवेळी त्यांना समजून घेतले, त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली. ममतेचा महामेरू, वात्सल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पहिले जाते.

छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यावर राजांचा अंत्यविधी घाई-घाईने उरकण्यात आला. राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही. कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. पण पुढे पुतळाबाई राणीसाहेबी सती गेल्या. भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत. राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वत:च्या मातोश्री जिजाऊमाँसाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली.

शिवापुर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की, शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेंच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शके १६०२  (२७ जुन १६८०) रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या. शिवतिर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या. त्यानंतरच्या काळात पुतळाराणीसाहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व मृत्यूबाबतही पुरेशी खरी माहिती उपलब्ध होत नाही. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते ती वाघ्याची नसून पुतळा राणीसाहेब यांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे.
संदर्भ – शिवपत्नी महाराणी सईबाई.

Leave a Comment